काळाच्या पानांवर पुढचा अध्याय मेस्सी की रोनाल्डोचा?

    14-Jun-2026   
Total Views |

 Messi Ronaldo Fifa World Cup Legacy 
 
मोक्सिको सिटीपासून ४८ किलोमीटर दूर थिओतीहुकान हे जागतिक वारसास्थळ आहे. इ.स. पूर्व १००व्या शतकात येथे नागरी सभ्यता आढळून आली आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचे ‘सूर्य पिरॅमिड’ येथे आहेत. या थिओतीहुकानला देवांची जन्मभूमी म्हटले जाते. मेक्सिकोच्या या मातीतच दैवत्व घडविण्याची ताकद आहे.
 
मोक्सिकोमध्ये ‘विश्वचषक’ म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही; तर तो इतिहास, भावना आणि अमरत्वाचा उत्सव आहे. जगातील पहिला असा देश, ज्याने तब्बल तीनवेळा ‘फुटबॉल विश्वचषका’चे यजमानपद भूषविले. त्याहूनही मोठा मान म्हणजे मोक्सिको सिटीतील ‘एस्टादिओ अ‍ॅझ्टेका’ हे जगातील एकमेव स्टेडियम ठरले आहे, ज्याने तीन विश्वचषकांच्या उद्घाटन सामन्यांचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला आहे. या स्टेडियमची खरी ओळख तिच्या विटा-दगडांत नाही; तर तिने जगाला दिलेल्या त्या दोन अमर क्षणांत आहे, ज्यांनी फुटबॉलला दोन दैवते दिली.
 
१९७०च्या वर्ल्डकप फायनलमध्ये याच स्टेडियमवर पेलेने ब्राझीलला विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलचा सम्राट म्हणून अजरामर केले. त्यानंतर १९८६ मध्ये दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला याच मैदानावर विश्वविजेते बनवले. ‘हॅण्ड ऑफ गॉड’ असो किंवा ‘गोल ऑफ द सेंच्युरी‘ त्या स्पर्धेने मॅराडोनाला केवळ महान खेळाडू नाही, तर फुटबॉलच्या दैवत्वाचा दर्जा मिळवून दिला.
 
योगायोग इतकाच नाही, तर फुटबॉलच्या या दोन्ही देवांनी आपल्या अमरत्वासाठी निवडलेली भूमी एकच होती- मोक्सिको. आज पुन्हा इतिहास एका नव्या वळणावर उभा आहे. या विश्वचषकात संपूर्ण जगाच्या नजरा दोन नावांवर खिळल्या आहेत, लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो.
 
एक जादूगार... ज्याच्या पायाशी चेंडू आला की, वेळ थांबल्यासारखी वाटते. दुसरा असा योद्धा... ज्याच्या निर्धारापुढे वयही शरण जाते. एकाकडे कल्पनातीत दृष्टी, पासिंग आणि कलात्मकता आहे; दुसर्‍याकडे अद्भुत ताकद, वेग, हवेतली सत्ता आणि गोल करण्याची अमर्याद भूक.
 
फुटबॉलच्या गेल्या दोन दशकांचा इतिहास लिहायचा झाला, तर प्रत्येक पानावर ही दोन नावे उमटलेली दिसतील. पण, नियतीचा सर्वांत मोठा खेळ म्हणजे आजवर विश्वचषकाच्या मैदानावर अर्जेंटिना आणि पोर्तुगाल कधीही एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. यंदा मात्र ही शक्यता आहे. यंदाचा वर्ल्डकप मेसिको, अमेरिका आणि कॅनडा अशा तीन देशांत होत आहे. त्यांपैकी अर्जेंटिना आणि पोर्तुगालच्या ‘लीग मॅचेस’ मेसिकोत नाही; पण जर बादफेरीत हे आमने-सामने ठाकले, तर त्यांची मॅच याच ‘एस्टादिओ अ‍ॅझ्टेका’ स्टेडियमवर होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. जर दोन्ही संघांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले आणि बाद फेरीतील सामने जिंकले, तर उपांत्यपूर्व फेरीत जगाला ‘लॅश ऑफ टायटन्स’ पाहायला मिळू शकतो. जर दोघेही उपविजेते ठरले, तर सामना आणखी लवकर रंगू शकतो. नियतीने वेगळीच पटकथा लिहिली, तर कदाचित अंतिम सामन्यातच फुटबॉल इतिहासातील सर्वांत भावनिक द्वंद्व रंगू शकते.
 
हा सामना केवळ अर्जेंटिना विरुद्ध पोर्तुगाल नसेल. तो फुटबॉलमधील दोन शैलींचा संघर्ष असेल आणि कदाचित... फुटबॉलमधील दोन युगांचा निरोपही असेल. कारण, मेस्सी आणि रोनाल्डो यांचा हा अखेरचा विश्वचषक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्श, प्रत्येक धाव, प्रत्येक गोल आणि प्रत्येक अश्रू इतिहासात कायमचा कोरला जाणार आहे.
 
मोक्सिकोने एकेकाळी पेलेला अमरत्व दिले. मेसिकोनेच मॅराडोनाला देवत्व दिले. आता काळाच्या पानांवर पुढचा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे. तो अध्याय मेस्सी लिहिणार की रोनाल्डो? की नियती या दोघांनाही एका अखेरच्या सामन्यात आमने-सामने उभे करून फुटबॉलप्रेमींना आयुष्यभर विसरता न येणारी भेट देणार? उत्तर अजून भविष्याच्या गर्भात आहे. पण, एवढे मात्र निश्चित आहे की, मोक्सिकोमध्ये विश्वचषकाची गोष्ट फक्त चषक जिंकण्याची नसते; ती दंतकथा जन्माला घालण्याची असते.