साहित्य संमेलनांनी अभिजात मराठीचा उद्घोष करायला हवा! - योगेश सोमण

    14-Jun-2026   
Total Views |
 Classical Marathi Literary Vision
 
मराठी साहित्यविश्वाचा मानबिंदू’ अशी ओळख असणारे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा दरवर्षी चर्चेचा विषय असतो. आगामी काळात पुण्यामध्ये, शंभरावे मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. राज्यातील सांस्कृतिक तथा साहित्य संस्था, या संस्थांमधील निवडणुका, राजकारण आदी गोष्टींमुळे मागच्या काही काळापासून, महाराष्ट्रात विचारमंथन घडून आले. याच पार्श्वभूमीवर ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे अध्यक्षपद भूषवणार्‍या, योगेश सोमण यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
 
‘आनंदडोह’ कार्यक्रमाचा प्रयोग आपण मागील अनेक काळ करत आहात, सध्या प्रयोग करताना नेमकी काय अनुभूती आहे?
 
मला ‘आनंदडोह’च्या सादरीकरणाच्या बाबतीत नेहमीच हे म्हणावसे वाटते की, माझे सद्गुरू जे की या नाटकाचे दिग्दर्शकसुद्धा आहेत; ते मला असे सांगतात की, ही माझ्या साधनेची पुढची पायरी आहे. म्हणजे, आध्यात्मिक साधना ही माझ्या आयुष्यात साधारण २००३-४, जेव्हा सद्गुरू माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून सुरू झाली. ध्यानधारणा असेल, काही वाचन असेल आणि मग त्याची ही पुढची पायरी एक नट म्हणून माझ्याकडून काय साधना करून घेतली जाते ही असते. मला असे वाटते की, तुकाराम महाराजांचे भक्तिमार्गावरचे विचार, पांडुरंगाच्या ईश्वराविषयक विचार हे सगळेच ‘आनंदडोह’मधून सादर होतात आणि लोकांना ते भावतात. कारण, माझ्या मते ते खूप थेट अनुभूती लोकांना देतात. आम्ही नेहमीच त्या नाटकाच्या बाबतीत असे म्हणतो की, हा केवळ नाट्यानुभव नाही; तर ही अनुभूती आहे. आणि ‘आनंदडोह’तून आतापर्यंत ती अनुभूती सगळ्यांनाच मिळाली. म्हणूनच, अलोट प्रेम गेले दहा वर्षे त्या नाट्य-प्रयोगाला मिळत आहे.
 
आपण याआधी सावरकरांची भूमिका साकारली होती. आता संत तुकारामांच्या भूमिकेत आपण लोकांच्या समोर आलात, याव्यतिरिक्तही आम्ही आपल्याला विविध माध्यमातून बघत असतो. या भूमिका आपल्याला काय देतात?
 
आतापर्यंत मी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने आणि त्यांच्या विचारांनी, मला वैचारिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. माझ्या कायिक आणि वाचिक सादरीकरणाला, या भूमिकांच्या अभ्यासाचा नेहमीच मोठा फायदा झाला. संत तुकाराम महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, ‘श्रीमंत योगी’मधील शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि चाणय (विष्णुगुप्त) अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करताना, मला त्यावेळच्या सामाजिक आणि ऐतिहासिक परिस्थितीचे अचूक आकलन झाले. इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता आणि त्यानिमित्ताने होणारा माझा अभ्यास, हे सर्वच मला या भूमिकांमुळेच लाभले.
 
‘मसाप’च्या निवडणुकीत आपला विजय झाला आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शंभरी, आपल्याच कारकिर्दीमध्ये पार पडणार आहे. काय भावना आहेत?
 
सध्या मनात अतिशय संमिश्र भावना आहेत. कुठलीही निवडणूक जिंकल्यानंतर आनंद होणे स्वाभाविकच आहे. त्यातही संपूर्ण मराठी सारस्वतांचे लक्ष लागून राहिलेल्या अशा अत्यंत महत्त्वाच्या पदावर सर्व मतदारांच्या शुभेच्छांमुळे मी आलो आहे, याचाही आनंद मोठाच आहे. पण, त्यासोबतच आलेल्या जबाबदारीचीही जाणीव आहे. मी एरव्ही दडपण घेत नाही. पण, इथे ‘दडपण’ एका चांगल्या अर्थाने आहे की, आपल्याकडून कुठलीही चूक किंवा वावगी गोष्ट घडता कामा नये. वैचारिक मतभेद असूच शकतात पण, कामात कोणतीही घोडचूक होणार नाही, ती सांभाळण्याची मोठीच जबाबदारी माझ्यावर आहे.
 
दुसरी गोष्ट म्हणजे, हे एक प्रशासकीय पदही आहे. प्रशासकीय निर्णय घेण्याचा मला याआधीचा थेट किंवा टप्प्याटप्प्याने आलेला अनुभव नाही. ‘साहित्य परिषदे’च्या आजीव सदस्यत्वाव्यतिरिक्त आणि नाटकाच्या काही उपक्रमांशिवाय, परिषदेच्या थेट प्रशासकीय कामकाजात मी आधी कधीही सहभागी नव्हतो. त्यामुळे सध्या या गोष्टी समजून घेण्यात आणि शिकण्यातच माझा थोडा वेळ जात आहे. म्हणूनच, भावना संमिश्र आहेत. पण, मनात एक ठाम विश्वास नक्की आहे; एवढ्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत आणि समोर इतके मोठे काम आहे. त्यामुळे ही सर्व जबाबदारी आपण उत्तम पद्धतीने पार पाडू, असा मला पूर्ण विश्वास वाटतो.
 
आपण एकेकाळी अलीकडे होतात आणि आता निवडणुकीच्या नंतर पलीकडे आला आहात, हा जो बदल आहे, तो बदल आपल्याला कसा वाटतो आहे?
 
माझ्यासाठी हा बदल अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक आहे. जेव्हा मी (पदाच्या) पलीकडे होतो, तेव्हा मनात काही अपेक्षा, काही स्वप्ने आणि काही निश्चित उद्दिष्टे होती. आता जेव्हा मी या बाजूला आलो आहे, तेव्हा ती सगळी स्वप्ने आणि नियोजित कामे प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच आलो आहे. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, मला या पदाचा आणि माझ्या सर्व सहकार्‍यांचा नक्कीच मोठा पाठिंबा मिळेल. आम्ही सगळेजण एका उत्तम सांघिक भावनेने हे काम एकत्र मिळून पूर्ण करू, असा मला ठाम विश्वास वाटतो.
 
यावर्षीचे साहित्य संमेलन पुण्यामध्ये होत आहे. त्यामुळे ते साहित्य संमेलन विशेष असणार आहे. या साहित्य संमेलनात, कुठल्या नवीन संकल्पना राबवण्याचा आपला मानस आहे?
 
माझे वैयक्तिक मत कदाचित खूप पुढचा विचार करणारे वाटेल. पण मला असे वाटते की, हे शंभरावे साहित्य संमेलन म्हणजे एक ‘वेस’ आहे आणि आता ही वेस ओलांडून आपल्याला पुढे जायला पाहिजे. आपण परंपरांचे फार अवडंबर माजवायला नको. साहित्य हे कायमच प्रवाही असते, ते कधीच परंपरांच्या चौकटीत अडकून राहू शकत नाही. ज्यांनी नेहमी परंपरा पाळल्या पाहिजेत असे सांगितले, त्यांनीही अनेकदा जुन्या परंपरा मोडूनच नवीन वाटा शोधल्या आहेत. त्यामुळे संमेलनाचे संपूर्ण डिझाईन याच मुक्त आणि प्रवाही विचाराने व्हावे, असा माझा प्रयत्न असेल.
 
एक साधे उदाहरण देतो; मराठी भाषा विभागाच्या अभ्यासानुसार, मराठीत जवळजवळ २२५ पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत. यांपैकी १०० ते १२५ बोलीभाषांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. मग, या बोलीभाषांचे प्रातिनिधिक रूप संमेलनात दिसणार की नाही? का साहित्य फक्त कागदावर लिहिलेल्या प्रमाणित भाषेतच अडकून राहणार? मुळात साहित्याचे मूळ हे बोलीभाषेतच असते. मनात येणारे विचार आधी बोलीभाषेत आकाराला येतात, नंतर ते कागदावर उतरताना प्रमाणित भाषेत प्रकट होतात. या वाङ्मयामध्ये एक ‘वाचिकता’ आणि जिवंतपणा आहे. आपण या संमेलनाच्या माध्यमातून माणसामाणसांना जोडणार्‍या, बोलल्या जाणार्‍या याच बोलीभाषेपर्यंत पोहोचणार आहोत की नाही? या बोलीभाषांना संमेलनात एक मोठे व्यासपीठ मिळाले पाहिजे, असे मला ठामपणे वाटते.
 
उद्घाटनाची सत्रे, भाषणे, प्रमुख पाहुणे हे तर दरवर्षीच्या नियमाप्रमाणे होणारच आहेत. पण, अध्यक्ष म्हणून माझी काही निश्चित उद्दिष्टे आहेत. आता आपण ज्या १०० ते १२५ बोलीभाषांपर्यंत पोहोचलो आहोत, त्यांच्या प्रतिनिधींचे काही ना काही मूर्त स्वरूप या संमेलनाच्या परिसरात प्रकट व्हायला हवे. तंत्रज्ञानाचा वापर करून, या तीन-चार दिवसांत ती बोलीभाषा, ती बोलणारे लोक आणि त्यावर अभ्यास करणारे संशोधक सामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.तरुण पिढीला जोडण्यासाठी आम्ही शंभराव्या संमेलनाची नांदी म्हणून, ९९ एकदिवसीय संमेलने घेणार आहोत. आतापर्यंत ज्या ५० शहरांमध्ये संमेलने झाली आहेत तिथे, तसेच परदेशातील इच्छुक महाराष्ट्र मंडळे आणि साहित्य परिषदेच्या विविध शाखांमध्येही हा उपक्रम राबवला जाईल. यात स्थानिक कथालेखक आणि कवींना जास्तीत जास्त संधी दिली जाईल. ही ‘नांदी’ म्हणजे, महामंडळाकडून सर्वांना शंभराव्या संमेलनाचे निमंत्रण असेल. या संपूर्ण उपक्रमाचा आपल्याकडे एक व्यवस्थित दस्तऐवज (डॉयुमेंटेड डेटा) तयार होईल.
 
तिसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लहान मुलांमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण करणे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, जर आपल्याला परंपरांच्या चौकटी मोडायच्या असतील, तर आजच्या बालकांकडे लक्ष दिले पाहिजे. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी ‘प्रोटोकॉल’नुसार सर्व गोष्टी करेनच पण, माझे वैयक्तिक लक्ष बालसाहित्याकडे आणि ते वाचणार्‍या बालकांकडे असेल. केवळ साहित्य छापून उपयोग नाही, तर ते वाचणारे हातही तयार झाले पाहिजेत. आज जर १० ते १६ वयोगटांतील मुले मोठ्या संख्येने या संमेलनात आली, तर सव्वाशेवे संमेलन त्यांच्याच हातात सुरक्षित असेल आणि ते अभिमानाने सांगू शकतील की, आम्ही शंभराव्या संमेलनाचे साक्षीदार होतो! असे हे संमेलन घडावे, असेच मला वाटते.
 
साहित्य संमेलन आणि राजकारण या दोन गोष्टींना वेगळे काढता येत नाही, हे मागच्या काही काळापासून आपण अनुभवत आलोच आहोत. साहित्याच्या व्यासपीठावरील या राजकीय अवकाशाकडे आपण कसे बघता?
 
मी या समाजाचा एक भाग आहे आणि एका प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख पदाधिकारीही. इथल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये, मी माझ्या विचारांनी आणि परीने नेहमीच सक्रिय असतो. ‘आम्ही राजकारणापासून दूर असतो,’ असे म्हणणे अत्यंत खोटे आणि भंपक आहे. सत्ताकारण हा भाग वेगळा; पण राजकारण कुठे नाही? अगदी घरातसुद्धा राजकारण असतेच. आपली संस्था तर लोकशाही प्रक्रिया स्वीकारलेली एक धर्मादाय संस्था आहे. इथे निवडणुका होणारच, भिन्न मतांची माणसे आपापल्या विचारांचा आग्रह धरून निवडणूक लढवणारच आणि पद मिळवून, संस्थाही चालवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे तिथे त्या-त्या पद्धतीचे राजकारण असणारच. मग, हा खोटेपणा कशासाठी करायचा? ‘आम्ही या सगळ्यापासून दूर आहोत’ असे म्हणणे, हे स्वतःच एक राजकीय स्टेटमेंट असे मला वाटते. तुम्ही ज्या विचारांचे आहात, ज्या संस्कारांचे आहात, त्यानुसार तुमची कार्यपद्धती ठेवा; पण ते विचार इतरांवर लादू नका, हे मला पूर्णपणे पटते. मी माझे विचार कोणावर लादणारही नाही; पण ते कधी लपवणारही नाही. माझ्यावर ज्या विचारसरणीचे संस्कार झाले आहेत, ते मी का लपवू? जर मी काम करताना काही चुकीचे वागलो, तर बट्टा माझ्या विचारांना लागणार आहे, या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. मग मी लपून जाणार कुठे? बोलणारे तर बोलणारच आहेत. माझा आक्षेप कशावर आहे? तर लोकांवर बदनामीकारक पद्धतीने ‘हा उजव्या विचारसरणीचा आहे’, ‘हा समाजवादी आहे’, ‘हा साम्यवादी आहे’ असे शिक्के मारण्यावर! पूर्वी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र बसून जेवायचे आणि वैचारिक मतभेद असले, तरी एकमेकांचा आदर करायचे. मग आताच ही बदनामी कशासाठी? जेव्हा काही सहकारी माझ्या पाठीशी उभे राहतात, मला मदत करतात, तेव्हा त्याला एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा कसे म्हणता येईल? आपल्याच विचारांच्या लोकांना वाटले की, साहित्य परिषदेमध्ये योग्य उमेदवार दिले पाहिजेत, म्हणून त्यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. यापूर्वी निवडणुका होत नव्हत्या का? गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या विचारांचे पदाधिकारी तिथे होतेच ना? लोकशाहीत तुम्ही ही प्रक्रिया स्वीकारली आहे, मग पराभव झाल्यावर फक्त एका विशिष्ट विचारसरणीच्याच लोकांवर दोषारोप करून शिक्का मारणे, अत्यंत चुकीचेच आहे.
 
मध्यंतरी ‘एशियाटिक सोसायटी’चे माजी उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे असे म्हणाले होते की, ‘एशियाटिक’सारख्या जुन्या संस्थेमध्ये एक वैचारिक एकारलेपणा तयार झाला आहे, जो दूर होणे गरजेचे आहे. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’सारख्या संस्थेमध्ये, अशा पद्धतीचे वातावरण होते का? आपला काय अनुभव राहिला आहे?
 
हा फरक मला वेळोवेळी जाणवत राहिला, आणि अगदी आजही काम करताना प्रकर्षाने जाणवत राहतो. याचे एकमेव कारण जे विनयजींनी सांगितले ते म्हणजे, त्यांना झालेली ‘एकारलेपणाची’ (एकांगी विचारांची) सवय! जे आधीचे पदाधिकारी, ज्येष्ठ-अनुभवी साहित्यिक किंवा कार्यकर्ते तिथे बसलेले आहेत, त्यांनी काम केले का? तर नक्कीच केले, यात काही शंका नाही. त्यांनी त्यांच्या परीने उत्तम काम केले आहे. पण, इतकी वर्षे सतत एकाच विचारांचे लोक एकत्र काम करत असल्यामुळे आणि त्यांचे सहकारीही समविचारी असल्यामुळे, आता काहीतरी नवीन समोर आले की, त्यांना ते सहन होत नाही.
काहीजण लगेच ‘परंपरांच्या चौकटी मोडल्या’ म्हणून ओरड करायला लागतात. विनयजी म्हणतात त्याप्रमाणे, हा जो ‘एकारलेपणा’ आहे, तोच इतर विचारांना जागा देत नाही. व्यासपीठावर, परिसंवादांमध्ये तर ही मंडळी साहित्याबद्दल ‘साहित्य म्हणजे, विविध प्रवाहांचा एकत्र खळबळणारा प्रवाह आहे’ अशी मोठीमोठी आणि लांबलचक भाषणे ठोकतात. पण, ज्यावेळी प्रत्यक्षात काळाचा नवा प्रवाह त्यांच्या समोर यायला लागतो, त्यावेळी नेमकी त्यांची पंचायत का होते? त्यावेळी त्यांना वातावरण गढूळ झाल्यासारखे का वाटते? अहो, तुम्ही त्यांना सामील करून घ्या ना! त्यांचे काय म्हणणे आहे, ते खुल्या मनाने ऐका ना! मी नेहमी म्हणतो, साहित्यिक काय फक्त तुम्हीच? आम्ही जे लिहितो ते साहित्य नाही, असे कसे होऊ शकते?
 
साहित्य संमेलनांनी महाराष्ट्राला राज्य म्हणून आताच्या घडीला काय द्यायला हवे, असे आपल्याला वाटते?
 
साहित्य संमेलनांनी महाराष्ट्रासाठी अभिजात मराठीचा जेवढा म्हणून प्रसार-प्रचार, संवर्धन, उद्घोष करता येईल; तेवढा प्रत्येक व्यासपीठावरून केला पाहिजे, हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, असे मला वाटते.
 
एका बाजूला आताचे जे युवा लेखक-लेखिका लिहितात, त्यांच्यामध्ये दोन प्रवाह आपल्याला बघायला मिळतात. एकतर कुठेतरी त्यांच्या लिखाणाला बाजूला सारून, एकेकाळी किती छान साहित्य लिहिले गेले होते आणि आता हे काय लिहिले जातेय, अशा पद्धतीचा प्रवाद असतो. तर दुसर्‍या बाजूला हे जे वेगळेपण आहे, ते वेगळेपण कुठेतरी हळूहळू स्वीकारणारी माणसे आहेत. तुम्ही स्वतःला या प्रवाहात कुठे बघता?
 
माझा कल हा १०० टक्के सर्वसमावेशक प्रवासाकडे आहे. आपण जास्तीत जास्त नव्या प्रवाहांना स्वीकारलेच पाहिजे. आज जर ‘फेसबुक’ किंवा इतर डिजिटल माध्यमांवर कोणी अतिशय सुंदर ललित लेखन करत असेल, तर त्याला ललित लेखक मानलेच गेले पाहिजे. त्या लेखक-लेखिकांना लोकांसमोर आणणे आणि त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे साहित्य परिषदेचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे, असे मला वाटते. जोपर्यंत मी आणि माझे सहकारी या पदावर आहोत, तोपर्यंत आम्ही हे काम १०० टक्के चोखपणे पार पाडू. फक्त पुस्तकात पांढर्‍यावर काळे छापून आले म्हणजेच साहित्य, ही जुनी व्याख्या आता बदलली पाहिजे. आज अनेक नवी व्यासपीठे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स तयार झाले आहेत. जुन्या मंडळींकडे पाहून कधीकधी मला वाटते, ‘अरे, कुठे गुहेत बसून आहात तुम्ही? एकदा बाहेर या आणि आज जे वैश्विक जाळे तयार झाले आहे, त्यात मराठी शोधा!’ आजची पिढी किती वेगवेगळ्या विषयांवर लिहीत आहे, व्यक्त होत आहे. तुम्ही तुमच्या साहित्याचा परीघ कधीतरी रुंदावणार आहात की नाही? हा परीघ वाढवण्यासाठी आमचे १०० टक्के प्रयत्न असणारच आहेत आणि तो वाढवलाच पाहिजे.
 
येणार्‍या काळात संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार्‍या व्यक्तीकडून, आपल्या काय अपेक्षा असतील?
 
मी माझ्या अपेक्षा आता तुमच्यासमोर व्यक्त केल्या आहेत आणि आगामी संमेलनाचे जे कोणी अध्यक्ष असतील, त्यांच्यासमोरही मी त्या अशाच पद्धतीने मांडणार आहे. शेवटी, पुढचे वर्षभर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणत्या पद्धतीने मते व्यक्त करावीत, संमेलनाला कुठल्या दिशेला घेऊन जावे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. परंतु, संस्थेचा एक मुख्य पदाधिकारी म्हणून मी या पदावर आल्या-आल्या कोणती उद्दिष्टे समोर ठेवून काम करतो आहे, हे मी त्यांना नक्कीच सांगेन आणि ती वारंवार त्यांच्या निदर्शनासही आणून देत राहीन. आमच्यात मतैय (विचारांची एकवायता) झाले, तर नक्कीच खूप आनंद आहे. ते वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असणार, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभतीलच. पण समजा, एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाले, तरी ते त्यांचे वैयक्तिक मत असेल; मी माझे वैयक्तिक आणि संस्थात्मक मत मांडायला नेहमीच स्वतंत्र असेन आणि तेही त्यांच्या मतावर ठाम राहू शकतील. लोकशाहीत मतभेदांचा आदर राखत काम करणे महत्त्वाचे असते.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.