“२५ वर्षांची झोपडपट्टी हीच उबाठाची कामगिरी; पक्क्या घरांना विरोध का?” - नवनाथ बन
14-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Dharavi Redevelopment Project) भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.१४ रोजी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करणे म्हणजे धारावीतील नागरिकांच्या हक्काच्या घरांना विरोध करणे असल्याचे म्हटले. "राऊत यांचा अजेंडा धारावी वाचवण्याचा नसून स्वतःचे राजकीय हितसंबंध वाचवण्याचा आहे. धारावीतील प्रत्येक मराठी माणसाला आणि नागरिकाला पक्के घर देण्याचा सरकारचा निर्धार असून, २५ वर्षे झोपडपट्टी कायम ठेवणाऱ्या उबाठा गटाला आता विकास पहावत नाही आहे.
ज्या उद्योगपतींवर आज टीका केली जाते, त्यांचे स्वागत पूर्वी उद्धव ठाकरे यांनीच केले होते."असेही बन म्हणाले. संजय राऊत यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘ऑपरेशन लांडगा’ या वक्तव्यांवर टीका करत नवनाथ बन यांनी त्यांना ‘ऑपरेशन गिधाड’च शोभते, असे म्हटले.
पक्षातील आमदार आणि खासदारही या गिधाडी प्रवृत्तीला कंटाळले असून त्यामुळेच त्यांना पक्षफुटीची भीती वाटत असल्याचा दावा बन यांनी केला. वीकेंडच्या बैठका घेऊन पक्ष वाढत नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला."संजय राऊत यांनी बुलडोझरच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील कंगना राणावत यांचे घर, नारायण राणे यांच्या घरावरची कारवाई आणि पत्रकारांवरील दडपशाही या कारवाया राऊत यांनी आठवाव्यात." असे बन म्हणाले."मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना जनतेनेच मतपेटीतून उत्तर दिले आहे.
मुंबईतील मराठी माणसाला बाहेर हद्दपार करण्याचे पाप उबाठा गटाने केले. मात्र महायुती सरकार मुंबईतील नागरिकांना मुंबईतच घरे देत आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास हे त्याचे उदाहरण आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा उल्लेख करत संजय राऊत हे फक्त तोंडाने गोळीबार करतात." असा टोला बन यांनी लगावला.
"संजय राऊत यांनी विमानतळावर आंदोलन करण्याची घोषणा केली असली तरी मराठी कामगार आता भाजपच्या पाठीशी उभा आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार एकवटल्यामुळे उबाठा गट अस्वस्थ झाला आहे. (Dharavi Redevelopment Project)
कामगारांकडून खंडणी वसूल करून संघटना वाढवणाऱ्यांना आता कामगारांनीच नाकारले आहे."असे बन म्हणाले.बन म्हणाले की, "संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा भगवा झेंडा केव्हाच संपला असून त्यांनी काँग्रेससोबत जाऊन भगव्याऐवजी दुसऱ्याच विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारांवर ठाम आहेत आणि भगव्या झेंड्याशी त्यांची निष्ठा कायम आहे. त्यामुळे ते उबाठा गटाच्या आवाहनाला बळी पडणार नाहीत."
"मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेऊन नंतर त्यांच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम उबाठा गटाने केल आहे. युती असूनही मनसेच्या मर्यादित जागा निवडून आल्या, मात्र स्वतंत्रपणे लढले असते तर अधिक चांगले यश मिळाले असते. मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसणे हा उबाठा गटाचा स्वभाव असून राज ठाकरे यांना याचा अनुभव आल्यामुळे ते अशा आवाहनांपासून सावध राहतील."असे बन यांनी म्हटले.
"महाराष्ट्रातील जनतेने आणि मराठी माणसांनी निवडणुकांमध्ये राऊत यांच्या राजकारणाला नाकारून त्यांना उत्तर दिले आहे. विरोधकांवर वापरले जाणारे शब्द जर त्यांच्याविरोधात वापरले गेले, तर त्यांना ते सहन होणार नाहीत.राऊत यांच्या याच भाषेमुळे जनतेत त्यांच्याविषयी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःची भाषा आणि राजकीय विश्वासार्हता तपासावी." असा सल्लाही बन यांनी राऊत यांना दिला. (Dharavi Redevelopment Project)