बालकांचे लाडके शिक्षक ते कामगारांचे आधारस्तंभ....

    14-Jun-2026
Total Views |
Bharatiya Mazdoor Sangh
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यवाह ते कामगारांचे आधारस्तंभ; बाल-शिशूंचे लाडके शिक्षक असलेले कै. श्रीनिवास जोशी जेव्हा मजदूर संघाशी जोडले गेले, तेव्हा कामगार चळवळीला एक नवा नेता मिळाला. युनियनच्या कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या या जननायकाचा हा प्रवास.
 
श्रीनिवास जोशी यांचा जन्म त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील अंबादास हे वेदशास्त्र संपन्न होते. त्यांच्याकडे एक अत्यंत सात्विक व्यक्तीमत्त्व म्हणून संबंध त्र्यंबकेश्वरमध्ये आदराने पाहिले जात असे. १९५०-६० ची दशके देशातील सर्वच धर्मस्थळे आणि तीर्थक्षेत्रांची अवकळा पाहिलेले अनेकजण आज ही हयात आहेत. जोशी परिवाराची त्र्यंबकराजावर नितांत श्रध्दा. त्र्यंबकेश्वरचे क्षेत्र उपाध्ये असताना सुध्दा कोणत्याही यात्रस्थाला नाशिक रेल्वे स्टेशन व त्र्यंबक बस स्टॅडवर घ्यायला व सोडायला ते कधीही गेले नाहीत. त्यामुळे अनेकदा एकादशी, शिवरात्र एकत्रच घरी नांदायला येत असत.
 
त्यांच्या घरी गरीबी होती. पण दारिद्रय नव्हते. त्याही स्थितीत भुकेल्या जीवांना दोन घास देण्याचे व्रत त्या घराने कसोशीने पाळले. अशा संस्कारात वाढलेल्या जोशी यांनी माध्यमिक शिक्षणाचा काही काळ पुणे विद्यार्थीगृहाच्या वसतिगृहात काढला. पण या सर्व कालखंडामध्ये आलेले अनुभव मनावर उठलेले चरे त्यांच्या आयुष्यात कधीच कोणाला जाणवले नाहीत. जोशी यांनी सुरूवातीला कोपरगाव मध्ये टेलिफोन खात्यात रोजंदारीवर काम केले. त्यानंतर रेल्वेत नोकरीला लागले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनच संपर्क झाला होता. नोकरी सांभाळून दादरला संघाच्या छबिलदास सायम् शाखेवरती १९६० च्या दशकात गण शिक्षक ते कार्यवाह म्हणून काम करताना बाल शिशुंचे लाडके शिक्षक झाले. पुढे रेल्वेमध्ये काम करत असताना भारतीय मजदूर संघाशी संबंध आला. आणि त्यांच्यातील कार्यकर्त्यांला नवी दिशा मिळाली. दत्ताेपंत ठेंगडी, मनोहरभाई मेहता, रमणभाई शहा अशा समर्पित कार्यकर्त्यांच्या सहवासाने त्यांचे ही विचारविश्व संपन्न आणि समृध्द झाले. या सर्वांकडे पाहून त्यांना ही पूर्ण वेळ प्रचारक म्हणून जाण्याची उत्सुकता होती. परंतु घरची स्थिती आणि संघातील, मजदूर संघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गृहस्थी संघ कार्यकर्त्यांचे संघटनेतील महत्त्व सांगितले.
 
जोशी यांनी मजदूर संघाचे काम करत असताना सुध्दा अनेक जिवलग मित्र जोडले अनेक परिवार जोडले, समकालीन असलेल्या विविध कामगार संघटनांचा सुध्दा अभ्यास त्यांनी केला. आणि त्या त्या संघटनांमधील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. कार्यकर्ता कसा असावा याचे जिथे जागते उदाहरण स्वत: घालून दिले. कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतर रोज ही सारी मंडळी दादरच्या मोती भुवनमध्ये असलेल्या भारतीय रेल्वे मजदूर संघाच्या कार्यालयात जमत असत. संघटनेच्या कामाच्या वाढीसाठीच्या योजना आखत त्या अंमलात आणत असत. जोशी यांनी सहजपणे कधीतरी या सर्वच सहकार्यांचे घनिष्ट मित्र झाले.
 
श्रीनिवास यांनी युनियनच्या कामासाठी देशभर प्रवास केला. त्यामुळे कामगार क्षेत्रातील समस्यांची त्यांना जाण होती. अनेकदा कामगार क्षेत्रातील प्रश्न समस्या याचबरोबर हे माणसांचे संघटन असल्यामुळे येणाऱ्या अडचणी विविध स्वभावांची जुळणी करणे भिन्न मताच्या लोकांना मत भिन्नतेकडून मन भिन्नतेकेडे जाणार नाहीत याची ते सतत काळजी घेत असत. आणि म्हणूनच अक्षरश: शेकडो हजारो परिवारांमध्ये त्यांचा शब्द अंतिम असायचा. संघाचे तत्वज्ञान रोजच्या जीवनात अनुकरण्याचे नसून अनुसरण्याचे आहे हे जोशी यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातून न बोलता दाखवून दिले आणि ही अशी प्रत्यक्षानुभूती अनेक कार्यकर्ते स्त्री पुरूषांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी ठरली.
 
जोशी हे खूप छान बासरी वाजवत असत. संघटन वाढत असताना विस्तारत असताना कार्यकर्ता सुध्दा तसाच तोला मोलाचा बनला पाहिजे हा आग्रह आणि परिवर्तन कोणतीही भाषणे न करता त्यांनी प्रत्यक्षात जागून दाखवले. १९७४ च्या राष्ट्रीय स्तरावरच्या रेल्वे संपामध्ये भूमिगत राहून सक्रिय काम केले. इतर वामपंथी संघटनांनी भारतीय रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान होईल अशा पध्दतीची योजना तयार केल्याचे कळल्यावर माननीय दत्ताेपंत ठेंगडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत दृढपणे सांगितले की, या संपात कोणत्याही स्वरूपात राष्ट्रीय संपत्तीची हानी होऊ देणार नाही. आजवरच्या डाव्या चळवळीच्या विध्वंसक वृत्तीला राष्ट्रीय स्तरावर भारतीय मजदूर संघाने स्पष्टपणे रोखण्याचे धैर्य दाखविले. दत्ताेंपत ठेंगडी यांच्या प्रभावामुळे निवृत्ती पूर्वी सुमारे 11 वर्ष सरकारी नोकरीत मिळणारे प्रमोशन सुध्दा त्यांनी नाकारले.
 
श्रीनिवास जोशी पुरोगामी की प्रतिगामी या वादात कधीच पडले नाहीत किंवा कधी अडकले ही नाहीत. पण जे जे सदसद विवेक बुध्दीला पटलं ते ते अत्यंत शांतपणे वैयक्तिक जीवनामध्ये उतरवलं. जोशी पंढरपूरची वारी अत्यंत श्रध्देने आणि तन्मयतेने करत असत. जोशी यांनी आपल्या मृत्यूनंतर शरीरदान करण्यात यावे. शरीर सोडल्यानंतरचे कोणतेही विधी करू नयेत अशी इच्छा लिहून ठेवली आहे. जोशी यांचे चिरंजीव श्रीपाद हे सहा वर्षे संघाचे प्रचारक होते त्यांच्यासह नातू अथर्व ही तिसरी पिढी आता संघ कार्यामध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या मुली आणि जावई हे देखील संघ विचाराच्या संघटनांमध्ये सक्रीय आहेत. जोशी यांना त्यांच्या पत्नी स्व.नलिनी यांची साथ लाभली. जोशी यांच्या संपूर्ण परिवाराला संघाच्या आणि भारतीय मजदूर संघाच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आपरंपार प्रेम मिळाले आणि म्हणूनच सारा भारत हेच जोशी यांचे विस्तृत कुटुंब झाले. कै. श्रीनिवास जोशी यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.