स्वीकृत पाठोपाठ प्रभाग क्षेत्र अध्यक्षांच्या निवडीला मुहूर्त मिळणार कधी?

    14-Jun-2026
Total Views |

Municipal Corporation Politics
 
कल्याण : ( Municipal Corporation Politics) कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पार पडून साडे चार महिन्याचा कालावधी लोटला. स्वीकृत सदस्य निवड होत नसताना प्रभाग स्तरावर नेमल्या जाणाऱ्या अध्यक्षांच्या निवडी देखील झालेल्या नाहीत. स्वीकृतसह प्रभाग क्षेत्र अध्यक्षांच्या निवडी होत नसल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
 
केडीएमसीच्या निवडणूक जानेवारी महिन्यात झाल्या. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य आणि सभापती निवड, त्याचबरोबर शिक्षण समिती सदस्य आणि सभापती निवडले गेले. महापौर निवडणुकीनंतर एका महिन्याच्या आत स्वीकृत सदस्य आणि प्रभाग क्षेत्र समिती अध्यक्ष निवडणे आवश्यक होते.
 
 
मात्र स्विकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळत नसताना प्रभाग क्षेत्र समिती अध्यक्ष निवड देखील लांबणीवर पडली आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे प्रभागामधील कामे, नालेसफाई, धोकादायक बांधकामे आदी प्रश्न गंभीर आहेत. समितीच्या बैठकींमध्ये याबाबतचे प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केले जातात. परंतु समिती अस्तित्वात नसल्याने प्रभाग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याबाबतच्या तक्रारी मांडाव्या लागत आहेत. नियमानुसार महापौर निवडीनंतर महिन्याभरात या समित्या स्थापन होणे आवश्यक होते मात्र त्यांचा विसर प्रशासन आणि महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांना पडला आहे.(Municipal Corporation Politics)