निसर्ग हा माणसाचा पहिला मित्र आणि मार्गदर्शक. वाहणारी नदी सातत्य शिकवते, डोंगर खंबीरपणा शिकवतो, वृक्ष निःस्वार्थ दानाचा संदेश देतात, तर मधमाशी परिश्रम, शिस्त आणि संघभावनेचे धडे देते. निसर्गातील प्रत्येक घटक जीवनाचे एखादे तत्त्व उलगडत असतो. मधाचे पोळे आणि त्यामागील मधमाश्यांचे जगणे हे अशाच जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून मानवी आयुष्याला मिळणार्या ज्ञानाचा मागोवा घेणारा लेख...
आयुष्य एक मधाचे पोळे
त्यात सुखाचे कण गोड
दु:खाच्या डंखालाही
असते जगण्याची ओढ
माणसाचे जीवन ही निसर्गाची सर्वांत सुंदर आणि तितकीच गुंतागुंतीची निर्मिती. आयुष्यातील अनेक रंग समजून घेण्यासाठी विविध रूपकांचा वापर, अनेक दिग्गजांकडून केला जातो. त्यातीलच एक अर्थपूर्ण रूपक म्हणजे, ‘आयुष्य एक मधाचं पोळं’! मधाचे पोळे दुरून जितके साधे वाटते, त्यामागे तितकीच मेहनत आणि शिस्त असते. तसेच त्यामागे जीवनमूल्येही दडलेली असतात. हेच मानवी आयुष्याचेही वास्तव आहे. पोळ्यातील मधाचा प्रत्येक थेंब हा मधमाश्यांच्या अखंड कष्टाचे फळ असते. मधाच्या एका थेंबासाठी, मधमाश्यांना हजारो फुलांवर भटकावे लागते. मानवी आयुष्यही काहीसे असेच आहे.
मानवालाही त्याच्या आयुष्यात सहज काहीही मिळत नाही. सुख, यश, समृद्धी, नावलौकिक मिळवण्यासाठी अविरत कष्ट करावे लागतात. कष्टाचा हाच प्रवास मानवी आयुष्यातल्या अनुभवांचा मध तयार करतो. मधाच्या पोळ्याकडे बघताना मला त्यातील दोन गोष्टी नेहमी जाणवतात. एक म्हणजे पोळ्यातील गोड मध आणि दुसरे म्हणजे तिथे असणारी डंख मारणारी मधमाशी. आपल्या आयुष्यातही सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पोळ्यातील मधाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर मधमाश्यांच्या डंखांचा धोका पत्करावाच लागतो. त्याचप्रमाणे जीवनात सुख अनुभवयाचे असेल, तर संकटांशी दोन हात करावेच लागतात. संकटांचा हा डंख आपल्याला अधिक परिपक्व करतो. कोणाचेही आयुष्य साधे, सरळ नसते. विविध आपत्ती, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. प्रश्न हाच की, या संकटांना आपण सामोरे कसे जातो आणि त्यासाठी स्वत:ला तयार कसे करतो?
मधाच्या पोळ्यामधून आणखी शिकता येणारी गोष्ट म्हणजे संघटनकौशल्य! मधमाश्या या एकतेचेही प्रतीक आहेत. ज्यावेळी सगळ्या मधमाश्या एकाच वेळी एखाद्या माणसाला डंख करतात, त्यावेळी एकटा माणूस त्यांचा प्रतिकार करू शकत नाही. पोळ्यातील सगळ्या माश्या त्यांची कामे चोख बजावतात. त्यात त्या आळस करत नाहीत. मानवी आयुष्यामध्येसुद्धा कुटुंब, मित्र, समाजाच्या सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण नाही. आपण एकमेकांच्या सुख-दुःखामध्ये धावून जातो, एकमेकांना साथ देतो, तेव्हाच समाजाचे आयुष्याचे पोळे समृद्ध होते.
आज नेमका याच परिस्थितीचा अभाव समाजामध्ये जाणवतो. आज प्रत्येक माणसाने स्वत:च्या पद्धतीने एक स्वार्थाचे, स्वत:पुरते एक बेट तयार केले आहे. या बेटाच्या कोशामध्येच आज तो आहे. जर माणसाने स्वार्थविरहीत समूहामध्ये जगण्याचा आनंद घेतला; तर त्याचे आयुष्य जास्त समृद्ध होते. जसे वय वाढत जाते, त्याचप्रमाणे माणसाला आयुष्याचे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात चांगले-वाईट प्रसंग, यश-अपयशाचाही समावेश होतो. यातून तावून सुलाखून निघाल्यावरच, माणसाच्या पदरामध्ये अनुभवाचा मध पडतो. हा मध अमृतासारखा गोड असतो. हा माणसाला समाधानी आणि शांत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमध्ये ही शांतता, मेंदूला लाभणारी स्थिरता, बौद्धिक स्थिरता ही अत्यंत आवश्यक आहे. आयुष्याच्या शेवटी, भौतिक गोष्टींपेक्षा आपण गोळा केलेल्या आठवणी आणि जोडलेली माणसेच खरा मधाचा साठा ठरतो.
मधाच्या पोळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना! मधाच्या पोळ्याचा प्रत्येक कप्पा अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असतो. कोणतीही अव्यवस्था आपल्याला त्यात दिसत नाही. मानवी आयुष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी, नियोजन आणि शिस्तीचे महत्त्व मधाच्या पोळ्याकडूनच शिकायला मिळते. वेळेचे योग्य नियोजन, जबाबदारीची जाणीव आणि कामाप्रतिच्या निष्ठेमुळे, जीवन अधिक अर्थपूर्ण झालेली अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. निसर्गातील प्रत्येक घटक मानवाला शिकवतो. मधमाश्या आपल्याला परिश्रम, शिस्त, चिकाटी, सहकार्य आणि दूरदृष्टी यांचे महत्त्व शिकवतात. ते भविष्याचा विचार करून मध साठवतात. त्याचप्रमाणे माणसानेही आपल्या भविष्याचा विचार करून, योग्य नियोजन करायला हवे. शिक्षण, बचत, आरोग्य आणि चांगल्या संस्कारांमध्ये माणसाने गुंतवणूक केल्यास त्याचे भविष्य सुरक्षित आणि अधिक सुखी होत.
शेवटी असे म्हणता येईल की, ‘आयुष्य मधाचे पोळे’ ही उपमा जीवनाचे गहन तत्त्वज्ञान उलगडून दाखवणारी ठरते.
मधमाश्यांप्रमाणे परिश्रम, शिस्तपालन, एकीने राहणे, प्रेम आणि माणुसकी जपणे, आयुष्यात येणार्या संकटांचा धैर्याने सामना करणे, यामुळे मानवी जीवन मधासारखेच गोड आणि समृद्ध होते. प्रत्येकाने जीवनामध्ये या गुणांचा विचार केला, स्वीकार केला, तर माणसाचे स्वत:चे आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचेच आयुष्य खर्या अर्थाने मधाचे पोळे होईल.
डॉ. गौरी कानिटकर
(लेखिका ‘अनुरूप’ विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक असून, ‘मॅरेज इन्रिचमेंट कौंसिलर आहेत.)