प्रवास मनोविकारांकडून मनोविकासाकडे

    14-Jun-2026
Total Views |

Mental Health and Rehabilitation 
 
शारीरिक आजार आपल्याला दिसतात, त्यामुळे आपल्याला रुग्णाची वेदना जाणवते. मात्र, मनोविकारांचे तसे नाही. मनोविकार दृष्टीला दिसत नाहीत, त्यामुळे होणारा त्रासही समजत नाही. त्यातच समाजाचा या विकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बाधित असल्याने, अनेकवेळा मनोरुग्णांच्या वाटेला उपेक्षाच येते. मात्र, अलीकडच्या काळात मनोविकाराकडून मनोविकास घडवण्याच्या कार्याला बळ लाभले आहे. या कार्यात अनेक संस्था कार्यरत असून, त्यापैकीच एक म्हणजे डोंबिवलीतील ‘मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’ व ‘मनोदय ट्रस्ट’ होय! मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त एक वेगळा कार्यक्रमाचे आयोजन आज डोंबिवलीमध्ये करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’ची सुरुवात दि. १६ जून २००१ रोजी झाली. ज्यावेळी हे सेंटर सुरू झाले, त्यावेळी विविध मानसिक समस्यांचे निदान व उपचार करणारे ते डोंबिवलीतील पहिले असे हे सेंटर होते. येथे उपचार करताना गरज असल्याच अ‍ॅडमिट करून घेतले जाई. या उपचारांमध्ये नुसते औषधोपचारच नाहीत; तर जोडीला विद्युत उपचार, मानसोपचार, निदान करण्यासाठीची विविध मानसिक चाचण्यांची सोय अशा सर्व सुविधाही या सेंटरमध्ये होत्या.
 
निदान, उपचाराचे मुख्य काम करतानाच तणाव नियोजन कार्यशाळा, करिअरविषयक कार्यशाळा, टिळकनगर विद्यामंदिरमध्ये कुमारवयीन मुलांसाठी ‘जाणीव’ ओसीडी, नैराश्यावर कार्यशाळा हे कामही सुरू झालेच होते. जनजागृती, तसेच'De-stress your Distress' या सूत्राप्रमाणे, लक्षणांची सुरुवात असतानाच मानसिक समस्या ओळखता याव्यात, हाच यामागील मुख्य उद्देश होता.
अ‍ॅडमिट होऊन वा ‘ओपीडी’त उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण, घरी नुसतेच बसतात, आळशी होतात. शिक्षण अर्धवट, मिळाली तरी नोकरी टिकत नाही अशा अनेक समस्या सुरु होतात. यामुळे पालकही त्रस्त होतात. अनेक पालकांनी याबाबत सांगितले.
 
त्यातूनच आपण पुढे काहीतरी करायला पाहिजे, उपचारांची गाडी पुनर्वसनाच्या स्टेशनात न्यायला पाहिजे, असे वाटले. मग, २००३ साली पहिली ‘स्किझोफ्रेनिया’ परिषद झाली, ज्याला जवळजवळ १००-१५० पालक आले होते. त्यातूनच पालकांच्या स्वमदत गटाची कल्पना पुढे मांडली गेली. याला कागदावर प्रतिसाद तर मिळाला पण, प्रत्यक्ष सभेच्या दिवशी फक्त एकजण हजर! तरीही बैठक घेतलीच. या बैठकीत त्यांनीच पुढाकार घ्यायचे मान्य केल्याने, पुढच्या बैठकीला दहाजण आले. पण, पुढे बैठक घ्यायची कुठे? जागेचा प्रश्न आला. त्यामुळे अशा कामासाठी एका ट्रस्टची स्थापना करायचे ठरले. म्हणजे जनजागृतीचे कार्य आधीच सुरू झाले होतेच पण, पुनर्वसन, आधार व मनोविकासाचे काम नीट करायचे असेल, तर ट्रस्ट असणे आवश्यक वाटले. डॉ. आनंद नाडकर्णी व शुभा थत्ते यांच्या मार्गदर्शनपर प्रोत्साहनाने, याची सुरुवातझाली.
 
पुढे जनजागृती, पुनर्वसन, आधार व मनोविकासाच्या या कामाला गती मिळत गेली. त्यातूनच पालकांचा वा शुभंकरांचा गट ‘आधारवड’. रोज असणारा व्यवसाय पुनर्वसनाचा शुभार्थींचा ‘फिनिक्स’; नोकरी, व्यवसाय करणार्‍या शुभार्थींसाठी ‘उडान’; एपिलेप्सीसह जगणार्‍यांसाठी ‘प्रोत्साहन’; ‘ओसीडी’सह जगणार्‍यांसाठी ‘चिंतन’; बायपोलर डिसॉर्डरसह जगणार्‍यांसाठी ‘इंद्रधनुष्य’; डिमेंशिया रुग्णांच्या शुभंकरांसाठी ‘उत्तररंग’; मन-मेंदू संवर्धनाचा ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मेधावि’ व विशेष मुलांच्या पालकांसाठी नुकताच सुरू झालेला ‘सक्षम’, असे स्वमदत गट सुरु झाले आणि आजही ते सुरू आहेत. आजही उपस्थितीच्या बाबतीत कमी-अधिक प्रमाण असले, तरी गट ऑनलाईन वा प्रत्यक्ष स्वरूपात सुरुच आहेत. अगदी ‘कोरोना’काळातही या सगळ्या गटांचे कार्य अव्याहतपणे सुरु होत, तेही ऑनलाईन! या सर्व गटांचे कार्य मोफतच चालते. रुग्णांचे उपचार दुसरीकडे कुठेही सुरु असले, तरीही तो या गटात सहभागी होऊ शकतो.
 
या विषयीच्या जनजागृतीचे कार्यही जोरात सुरू होते. ‘देवराई’, ‘माझी गोष्ट’, ‘कदाचित’, ‘वो लम्हे’, ‘माय डिअर यश’, ‘अस्सू’, ‘ढउॠछ’ सारख्या मनस्वास्थ्याशी संबंधित सिनेमांचे प्रदर्शन व तज्ज्ञ, कलाकारांबरोबरच्या चर्चा अशा कार्यक्रमातून जनप्रबोधन करण्यात येत होते. ‘जन्मरहस्य’ नाटक, ‘मुक्तिपत्रे’चे अभिवाचन असे विविध प्रयोगही झाले. २०२१ मध्ये मग मनोदयनेच ‘ग्रहण’ ही डॉ. अद्वैत पाध्ये लिखित लघुपटाची निर्मिती, ‘वेध अ‍ॅक्टिंग अ‍ॅकेडमी’च्या मदतीने केली. ‘कोरोना’ काळात २५ हजार जणांनी हा लघुपट पाहिला. ‘इंटरनॅशनल कल्चर’ व ‘फिल्म फेस्टिव्हल’मध्येही हा लघुपट अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. नंतर ‘वेध’च्या सहकार्याने आणखी तीन लघुपटांची निर्मिती करून, त्यावरही चर्चा केली गेली. डॉक्टरांच्या ‘तितिक्षा’ पुस्तकातील कथांवरूनच, ‘तितिक्षा’ हा दीर्घांकही सादर केला. या दीर्घांकाचेही मुंबई, पुणे, ठाणे, बदलापूर, डोंबिवली येथे एकंदर १३ प्रयोग झाले. प्रयोग व चर्चा हे सूत्र येथेही होतेच!
 
निदान व उपचारांचे कार्य चालू ठेवून, एकीकडे हे सर्व कार्य चालूच होते. पण, काही वैयक्तिक कारणामुळे, २०१९ साली डोंबिवलीतील एकमेव सायकीयाट्रिक नर्सिंग होम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण, त्याच जागी व्यवसायोपचार, चुंबकोपचार, रेमेडियल एज्युकेशन हे विभाग भव्य स्वरुपात सुरू केले. हॉस्पिटलायझेशन सोडून आज हे सर्व काम, आमची टीम अगदी जोमाने, उत्साहाने करते आहे. निदान, उपचार, आधार, पुनर्वसनाबाबत या संघकार्यामधून, आज अनेक रुग्णांना आधार मिळाला आहे. त्यातीलच आपले काही शुभार्थी व काही शुभंकर यांना ‘द्विज पुरस्कार’ देऊन, आयपीएच संस्थेतर्फे सन्मानितही करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या परिश्रमाचा होता.
 
त्याचवेळी विविध शाळांतूनही कुमारवयीन मुलांसाठीचा ‘जाणीव’ प्रकल्पही सुरु होता. या प्रकल्पातून लैंगिकता शिक्षण, व्यसनाधीनता, भावनिक शिक्षण याविषयी मार्गदर्शन केले जाते. हा प्रकल्प आजतागयत अव्याहतपणे सुरु आहे. जनजागृती व मनोविकास दोन्हींच्या दृष्टीने विविध कार्यशाळा उदा. सक्षम पालकत्व, रागदारी, शेअरिंग कट्टा (कुमारवयीन), पालवी (चाळीशी पुढच्या स्त्रिया), विवाहविषयक सूर जुळण्यासाठी, आरबीबीटी शिकवणारी कार्यशाळा, मानसमित्र,जाणीवमित्र कार्यशाळा, शिक्षकांसाठी ‘सुदृढ मन, सुदृढ शाळा’ व ङॠइढट साठी ‘अनवट’ कार्यशाळांचे आयोजन गेले अनेक वर्षे करत आहोत. वाचन, भाषा-समृद्धीद्वारे मन समृद्ध करणारे वविध कार्यक्रमदेखील , मराठी भाषा दिनानिमित्ताचे औचित्य साधून याच हेतूने आयोजित करत आहोत.
 
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भावनिक प्रगतीची वाढ जोखणारा, बुद्धिमत्तेच्या आठ पैलूंवर आधारित ‘मी अष्टपैलू’ स्पर्धात्मक कार्यक्रम २०१९ मध्ये पहिल्यांदा सुरू केला. हा कार्यक्रम तीन फेर्‍यांमध्ये घेतला जातो. त्यानंतर २०२२ पासून तो आता दरवर्षी घेण्यात येत आहे. स्पर्धा असली तरीसुद्धा, एक वेगळा समृद्ध करणारा अनुभव सहभागी विद्यार्थी यातून घेत असतात.
 
पुनर्वसनाचे कार्यही सुरूच आहे. जागा अपुरी पडल्याने तीन वर्षांपूर्वी शुभंकर बंगला, ‘एमआयडीसी’ येथे हे सेंटर स्थलांतरित झाले. तेथे नेण्या-आणण्याची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. तसेच ते ज्या वस्तू बनवतात, त्या विकून आलेल्या पैशातून त्यांना प्रोत्साहन वेतनही दिले जाते. याच कार्याची दखल एका मराठी वृत्तपत्राने घेतली होती. या कार्यात समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. त्यामुळेच आता लवकरच तिथे संगणक प्रशिक्षण, शिवणकाम वा इतर कलाशिक्षण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
मनोविकाराच्या उपचारांसोबत सुरू झालेला हा प्रवास आधार, पुनर्वसनाच्या कामातून ‘पायी शृंखला असू दे, गीत गतीचे गाई’ हा संदेश देत, त्यांना व सर्वांनाच मनोविकासाच्या विविध स्टेशनात घेऊन जातो आहे. यामध्ये खेळाडूंचे मनोबल वाढवणार्‍या ‘मेधावि’सारख्या प्रकल्पांचा विस्तार अशी महत्त्वाची कामे असतील. २५ वर्षे सुरू असलेला हा प्रवास, सर्वांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने असाच पुढे चालू राहील. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हा डॉ. आनंद नाडकर्णींनी दिलेला वसा पुढे चालूच राहील.
 
- डॉ. अद्वैत पाध्ये