जम्मू काश्मीर वंदे भारतला अनंतनाग मध्ये थांबा मंजूर; दक्षिण काश्मीरच्या प्रवाशांना मोठा दिलासा

Total Views |
Jammu Kashmir Vande Bharat
 
मुंबई : (Jammu Kashmir Vande Bharat) जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला दक्षिण काश्मीरमधील महत्त्वाच्या अनंतनाग रेल्वे स्थानकावर व्यावसायिक थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
या निर्णयामुळे दक्षिण काश्मीरमधील प्रवासी, व्यापारी आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार असून, या भागाची रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. अनंतनाग हे काश्मीर खोऱ्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांपैकी एकाचे मुख्यालय असून, जिल्ह्याची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे.
 
अनंतनाग शहर हे केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर कुलगाम, शोपियां आणि पुलवामाच्या काही भागांसाठीही प्रमुख केंद्र मानले जाते. याशिवाय प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम हे देखील अनंतनाग जिल्ह्यातच येत असल्याने या निर्णयाचा पर्यटन क्षेत्रालाही मोठा लाभ मिळणार आहे.
 
हेही वाचा :  पेट्रोलबाबत केंद्राचा मोठा निर्णय; E22 ते E30 इथेनॉल-मिश्रित इंधनावरील उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द...
 
बनिहाल आणि श्रीनगर दरम्यानचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून अनंतनागची ओळख आहे. त्यामुळे दक्षिण काश्मीरसाठी हे स्थानक महत्त्वाचा दुवा मानले जाते. वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा मिळाल्याने या परिसरातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा अधिक सहज उपलब्ध होणार आहे.
 
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-श्रीनगर वंदे भारत सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासात मोठी क्रांती घडल्याचे नमूद केले. या सेवेने प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी केला असून प्रवाशांना आधुनिक आणि अधिक आरामदायी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनंतनाग येथे वंदे भारतचा थांबा मंजूर झाल्याने दक्षिण काश्मीरच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Jammu Kashmir Vande Bharat)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.