मुंबई : (Navi Mumbai Power Supply) पनवेल परिसरातील पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, खारघर, कळंबोली व तळोजा येथील वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर करून अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने युद्ध पातळीवर काम सुरू केले असून उपकेंद्रांचा लोड विभागणे, नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करणे, अतिरिक्त उच्चदाब वीज वाहिनी सुरू करणे व अधिक क्षमतेच्या केबल टाकणे असे उपाय अंमलात आणण्यात येत आहेत. या उपायांमुळे पनवेल शहर व परिसरात वीज ग्राहकांना तातडीने दिलासा मिळेल, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महावितरणच्या पनवेल विभागातर्फे वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी विविध उपाय करण्यात आले आहेत. नवीनच कार्यान्वित करण्यात आलेल्या खांदेश्वर मास हाउसिंग सबस्टेशन मधून खांदेश्वर स्टेशन पर्यंत लिंक लाईन चालू करून कामोठे सेक्टर ९ उपकेंद्र आणि खांदा कॉलनी उपकेंद्राचा लोड कमी करण्यात आलेला आहे. कामोठे येथील भगवती फिडर चा लोड कामोठे सेक्टर ९ उपकेंद्र वरून खांदा कॉलनी सबस्टेशन मधून निघणाऱ्या रेल्वे स्टेशन फिडरवर देण्यात आला. त्यामुळे कामोठे सेक्टर ९ उपकेंद्र वरील लोड कमी करण्यात मदत झाली.
लोड व्यवस्थापनासोबत नवीन पनवेल सेक्टर १५ येथे नवीन दहा क्षमतेचा पावर ट्रांसफार्मर कार्यान्वित करून सदरच्या परिसरातील वीज वितरण यंत्रणा अधिक बळकट आणि कार्यक्षम करण्यात आली आहे. कळंबोली परिसरातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लोड व्यवस्थापनाचा उपाय करण्यात आला आहे. कळंबोली हाउसिंग सबस्टेशन मधील लोड रोड पाली सबस्टेशन म्हणजेच खारघर उपकेंद्र वर घेण्यात आला. त्यामुळे कळंबोली हाउसिंग हाउसिंग सबस्टेशन चा लोड कमी करण्यात मदत झाली.(Navi Mumbai Power Supply)
खारघर सेक्टर ३० ते ३६ परिसरात वीज पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त उच्चदाब वीज वाहिनी तळोजा पंचानंद येथून कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे सदर परिसरातील वीज यंत्रणा केवळ खारघरच्या ईएचव्ही वर अवलंबून न राहता तळोजा पंचानंद येथील अतिरिक्त वीज वाहिनी ची मदत होणार आहे.
पनवेल शहर व परिसरातील वीज ग्राहकांना तातडीने दिलासा मिळण्यासाठीच्या वरील उपायांसोबत पनवेल शहर, कामोठे, खांदा कॉलनी, कळंबोली, तळोजा व खारघर परिसरातील लघुदाब यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक तेथे अधिक क्षमतेच्या केबल टाकण्याचे काम महावितरणतर्फे सुरू आहे. कामोठे येथील वीज उपकेंद्रात एक पॉवर ट्रान्सफॉर्मर तातडीने कार्यान्वित करण्यात आल्यामुळे कामोठे परिसरातील वीज पुरवठा अधिक चांगल्या रितीने होईल.(Navi Mumbai Power Supply)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.