रामदासस्वामीविरचित ‘मनाचे श्लोक’ मराठीजनांपुरते मर्यादित न राहता, सकल जगापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांचा संस्कृत आणि इंग्रजी अनुवाद करणार्या सानिका चिदंबरेश्वर साखरे यांच्याविषयी...
प्रभू श्रीरामांची अखंड भक्ती, रामदासस्वामींवरील अपार श्रद्धा आणि पूर्वकर्माची पुण्याई पाठीशी असली की, मनुष्याला आपोआप सारेकाही साध्य होते. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे ‘मनाच्या श्लोकां’चा संस्कृत पद्यानुवाद करणार्या सानिका साखरे!
सानिका बापट मूळच्या यवतमाळच्या. सुशिक्षित आईवडील आणि स्वखुशीने निवडलेला शेतीचा व्यवसाय. सानिका आणि त्यांचा मोठा भाऊ त्यांच्या आजोळी म्हणजेच, यवतमाळजवळील खानगांव येथे सहस्रबुद्धे कुटुंबात लहानाचे मोठे झाले. त्यांच्या आजोळी पणजोबांपासूनची आध्यात्मिक आणि विशेषतः रामदासस्वामींच्या भक्तीची परंपरा होती. त्यांचे पणजोबा ॐबाबा हे संस्कृत-अभ्यासक. त्यांनी घालून दिलेल्या रीतीप्रमाणे, घरात ‘महिषासुरमर्दिनीस्तोत्र’, ‘शिवतांडवस्तोत्र’, ‘रामरक्षा’, ‘अथर्वशीर्ष’ म्हटले जाई. त्या पाठांतरामुळे सानिका यांच्या मनावर आणि वाणीवर संस्कार होत गेले. त्यांचे आजोबा भैयाजी सहस्रबुद्धे, हे रा. स्व. संघाला समर्पित असे एक नामांकित कार्यकर्ते होते. ते जणू मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत अशा चारही भाषांचे एक चालते-बोलते विद्यापीठच. सानिका यांचे बालपण अधिकतर त्यांच्याच सहवासात गेल्याने, सानिका यांनाही भाषांचीच गोडी लागली. सानिका यांचा भाऊ आजोबांसमोर अभ्यासाला बसला की, सानिका आवर्जून त्याच्या शेजारी बसत. त्यामुळे भाषेतील बारकावे, अलंकार, छंद-वृत्त सानिका यांना तिसरी-चौथीतच नीट उमगले होते.
सानिका यांच्या आजोळच्या सहस्रबुद्धे कुटुंबाची, रामदासस्वामींवर अपार भक्ती होती. त्यांच्याकडे दर सोमवारी, एक रामदासी बुवा भिक्षा मागायला येत. त्यांच्या ताम्हणामध्ये तांदूळ देत बुवांचा आशीर्वाद घेण्याचे आजीने केलेले संस्कार म्हणजे, जणू सानिका यांना लाभलेली पुण्याई कमावण्याची गुरुकिल्लीच होती.
वयाच्या दहाव्या वर्षी सानिका, आजोळहून पुन्हा यवतमाळला स्वगृही आल्या. त्यांचे माध्यमिक शिक्षण यवतमाळलाच झाले. शाळेतील पिंगळे बाईंच्या संस्कृत शिकवण्याच्या प्रभावामुळे, सानिका यांना संस्कृतची विशेष गोडी लागली. दररोज बाई वर्गात येण्यापूर्वी, संस्कृत व्याकरणातील शब्द आणि क्रियापदांचे तक्ते विशिष्ट तालावर म्हणायला सानिका यांना खूप आवडे. तसेच डॉ. शैलजा रानडे यांच्या शिकवणी वर्गातील विशेष मार्गदर्शनामुळे, त्यांना संस्कृतमध्येच पुढील शिक्षण घेण्याचा आत्मविश्वासदेखील मिळाला. त्यांच्याच प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने सानिका यांनी, संस्कृतात पदवी संपादन केली. उच्चशिक्षणासाठी मात्र त्यांना यवतमाळहून पुण्यात जावे लागले.
संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांचा विवाह आळंदीच्या साखरे महाराजांच्या पुत्राशी झाला. त्यांच्या सासरीदेखील वेदांतशास्त्राचा अभ्यास आणि वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे, त्यांच्या संस्कृतविकासाला चालनाच मिळाली. सानिका यांच्या सासर्यांनी, त्यांना लिखाण करण्याची प्रेरणा दिली. त्याप्रमाणे त्या काही लहान-मोठे श्लोकांचे संस्कृत भाषांतर करू लागल्या. दूरदर्शनच्या ‘संस्कृत वार्तावली’मध्ये, हिंदी गाण्याचा संस्कृत अनुवाद करण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहज म्हणून भाग घेतला. या स्पर्धेत मिळालेल्या पारितोषिकाने, सानिका यांना आणखीच प्रोत्साहन मिळाले.
आधुनिक संस्कृत साहित्यात आणखी भर घालण्याची ऊर्मी आता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच एक दिवस त्यांना रामदासस्वामीविरचित ‘मनाच्या श्लोकां’चा, संस्कृतानुवाद करायची कल्पना सुचली.
श्रीरामं च समर्थं च श्रीगुरुं चाभिवादये|
साधितुं यजनं वाचा यत्नसिद्ध्यर्थमाह्वये॥
असे म्हणत त्यांनी कार्यारंभ केला.पुढ या कार्यासाठी लगणारी एवढी शब्दसंपदा, आत्मविश्वास आणि बळ त्यांच्यात कोठून आले, हे त्यांच्या स्वतःसाठीही एक कोडेच आहे. ‘अमरकोश’सारख्या विविध कोशांचा अभ्यास करण्याची स्फूर्तीही त्यांना आपोआप मिळत गेली. तब्बल एक वर्षाच्या साधनेनंतर रामदासस्वामींच्या आशीर्वादाने, २०१८मध्ये त्यांचा संपूर्ण संस्कृतानुवाद तयार झाला. याकाळात त्यांना कधीही सुचेनासे झाल्यावर, त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या दिवंगत सासर्यांच्या आश्रमातील आसनासमोर बसून नामस्मरण करताच त्यांना पुढील श्लोकाचा अनुवाद स्फुरत असे.
संस्कृत अनुवादानंतर त्यांनी इंग्रजी अनुवादालाही सुरुवात केली. त्यात आर्य-संस्कृतीतले संस्कार इंग्रजीत मांडणे, ही त्यांच्यासाठी मोठीच कसोटी होती. संस्कृतातील ‘मोक्ष’, ‘विवेक’ यांसारखे शब्द इंग्रजीत मांडणे शक्य असले, तरी ते तेवढेसे प्रभावी वाटत नाहीत. संस्कृतात त्यांचे जेवढे आयाम आहेत, तेवढे इंग्रजीत साध्य होत नाहीत. पण, रामदासस्वामींच्या आशीर्वादाने, त्या यातूनही तरून गेल्या. पुढे २०२० मध्ये त्यांचा इंग्रजी अनुवादही पूर्ण झाला. २०२२ मध्ये त्यांनी हे दोन्ही एकत्रितपणे ‘मनोबोधबिम्बम्’ नावाने प्रसिद्ध केले. भक्तांच्या प्रचंड प्रतिसादामुळे, लगेचच दुसर्या आवृत्तीचीही मागणी होऊ लागली. यावेळी ते अधिक चित्ताकर्षक करण्यासाठी, सानिका यांनी श्लोकांशेजारी काही वारली चित्रेदेखील काढली. तसेच ही दुसरी आवृत्ती पुस्तकासारखी न उघडता, पोथीसारख्या बांधणीची ठेवल्यामुळे भक्तांच्या विशेष पसंतीस उतरली.
‘मनाचे श्लोक’ हे भक्तीचे एक साधन असल्याने ते केवळ मराठी भाषकांपुरते मर्यादित न राहता, अन्य भाषांच्या माध्यमातूनही त्याचा जगभर प्रसार व्हावा, ही सानिका साखरे यांची मनीषा आहे. त्यांची मनोकामना पूर्ण होवो, ही प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ!
- ओवी लेले
९८६९३४५७५३