पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची प्रभाकर शिंदे यांची मागणी
13-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Prabhakar Shinde) मुंबई शहर आणि उपनगरात यंदाच्या मान्सून हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
महापौर रितू तावडे यांना पाठविलेल्या पत्रात शिंदे यांनी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाचा उल्लेख करत, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, अद्याप समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झालेली नसल्याने धरणांमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाणी वाटप व वापराचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील उपाययोजना तातडीने राबवून पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता जलस्रोतांचे संवर्धन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत, प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे.(Prabhakar Shinde)