मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी क्यूआर कोड ओळखपत्र वितरण सुरू; १५ दिवसांत पडताळणी बंधनकारक
13-Jun-2026
Total Views |
मुंबई : (BMC Hawker Registration) मुंबई महानगरपालिकेने शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्युआर कोड आधारित ओळखपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये १ जून २०२६ पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांची नावे असलेली यादी संबंधित वॉर्ड ऑफिसमध्ये प्रदर्शित करण्यात आली असून, ती वॉर्डमधील लोकप्रतिनिधी आणि फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींनाही वितरित करण्यात आली आहे. सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांनी स्वतः वॉर्ड ऑफिसमध्ये उपस्थित राहून अर्ज आणि कागदपत्रांनुसार आपले क्यूआर कोड आधारित ओळखपत्र मिळवून घ्यायचे आहे.
परंतु, आतापर्यंत प्रत्यक्ष पडताळणी केलेल्या फेरीवाल्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने पालिकेने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांना पुन्हा एकदा सूचित करण्यात आले आहे यासाठी पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित वॉर्ड ऑफिसमध्ये स्वतः हजर राहावे.
तेथे त्यांनी सादर केलेल्या अर्जाची पडताळणी करून आपले क्युआर कोड ओळखपत्र मिळवावे. या पडताळणीसाठी फेरीवाल्यांनी आपल्यासोबत सादर केलेल्या अर्जाची पोचपावती, मूळ आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईझ फोटो आणणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(BMC Hawker Registration)
दिलेल्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही फेरीवाल्याची पडताळणी केली जाणार नाही, तसेच क्यूआर कोड आधारित ओळखपत्रही दिले जाणार नाही, अशी माहिती पालिकेचे उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते यांनी दिली आहे.(BMC Hawker Registration)