मेट्रो-४ मोगरपाडा डेपो मार्गासाठी हिरवा कंदील

Total Views |
Mumbai Metro
 
मुंबई : (Mumbai Metro) मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि वेगवान बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई मेट्रो-४ आणि ४ए (वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली-गायमुख) या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी ठाणे येथील मोगरपाडा कार डेपोला जोडणाऱ्या संपर्क मार्गाच्या बांधकामासाठी ०.३९ हेक्टर कांदळवन वनजमीन हस्तांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
 
महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, ठाणे तालुक्यातील मोगरपाडा गावातील गट क्रमांक ३० मधील ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो पीआययू विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. या जमिनीचा वापर मोगरपाडा कार डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅप्रोच रोड, स्पर लाईन आणि संबंधित बांधकाम सुविधांसाठी केला जाणार आहे.
 
मुंबई मेट्रो-४ आणि ४ए हा प्रकल्प पूर्व उपनगर, ठाणे आणि विस्तारित महानगर क्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे लाखो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे. (Mumbai Metro)
 
 
या मंजुरीपूर्वी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून आवश्यक पर्यावरणीय आणि वनविषयक परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी प्रथम तत्त्वतः मंजुरी आणि त्यानंतर अंतिम मंजुरी देताना विविध पर्यावरणीय अटी घालण्यात आल्या असून त्यांचे काटेकोर पालन करणे एमएमआरडीएसाठी बंधनकारक राहणार आहे.
 
विशेष म्हणजे, हस्तांतरित करण्यात आलेली जमीन अत्यंत मर्यादित क्षेत्रफळाची असून प्रकल्पाच्या व्यापक सार्वजनिक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने वन विभागाला प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास मंजुरी मागे घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे. (Mumbai Metro)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.