मुंबईतील बेकायदेशीर प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी महसुलमंत्र्यांचा दणका; दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

डिजिटल सहीचा गैरवापर, आपले सरकार पोर्टल, सेतूमार्फत दिली प्रमाणपत्रे.

    13-Jun-2026   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) पद, अधिकार तसेच कनिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करत मुंबईत बनावट दाखले वितरित केल्याचा प्रकार समोर आल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चार अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाद्वारे तपासणी करून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.
 
याप्रकरणी, मुंबई शहर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल सहायक नागनाथ लोलेवार यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर व्याप्ती लक्षात घेऊन तपासणी जारी राहणार असल्याने चौकशी पथक कायम राहील असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
 
मुंबई शहर जिल्ह्यातील एफ/साऊथ आणि एफ/नॉर्थ विभागाचे तहसीलदार संदीप आवारी हे ८ मे २०२६ पासून रजेवर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार संकेत यमगर यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या संधीचा फायदा घेत उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांनी नायब तहसीलदार दीपाली कुलकर्णी यांना त्यांची डिजिटल स्वाक्षरी बनवण्याचे तोंडी आदेश दिले.(Chandrashekhar Bawankule)
 
 
त्यानुसार कुलकर्णी यांनी स्वाक्षरी बनवून सांगळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर, सांगळे यांनी कुलकर्णी यांच्या संमतीशिवाय, महसूल सहायक नागनाथ लोलेवार याच्याशी संगनमत करून एफ/साऊथ आणि एफ/नॉर्थ विभागातील शेकडो प्रमाणपत्रे वितरित केली. या संशयास्पद कारभाराचा सुगावा लागताच चार तपास पथके नेमून वितरित प्रमाणपत्राची तपासणी सुरू झाली. निम्मी प्रमाणपत्रे तपासून झाल्यावर पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले गेले.
 
महिनाभरात २ हजार ३९ प्रमाणपत्रे वितरित
 
कार्यकारी दंडाधिकारी धैर्यशिल जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, महिनाभरात २ हजार ३९ प्रमाणपत्रे वितरित झाली. त्यापैकी निम्मी म्हणजे, १ हजार २३ तपासण्यात आली. त्यातील २२१ प्रमाणपत्रे बनावट असल्याचे दिसून आले. ही प्रमाणपत्रे आवश्यक कागदपत्रांची किंवा पुराव्यांची पूर्तता नसताना, बेकायदेशीर आणि त्रुटीयुक्त पद्धतीने जारी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि नागनाथ लोलेवार यांच्याविरुद्ध कलम ३१९(२), ३३५, ३(५)आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(सी), ६६(डी) व ७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....