पाऊसप्रतीक्षेच्या नोंदी...

    13-Jun-2026   
Total Views |

 Art of Monsoon Anticipation 
 
निसर्गचक्राचा अविभाज्य घटक असणारा पाऊस जीवनचक्रासाठी नवा ऋतू घेऊन येतो. पाऊस माणसाला निसर्गातील चैतन्य अनुभवण्याची संधी देतो. पावसाच्या संजीवनीचे हे रूप, आजपर्यंत असंख्य कलावंतांनी कलाकृतीमधून साकारले. मात्र, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, या पावसाच्या प्रतीक्षेतसुद्धा एक वेगळाच भाव दडलेला आहे. या अमृतघनांची शीतलता टिपण्यासाठी, तितयाच हळव्या मनाच्या कलाकाराचीही गरज आहे. अशाच आगळ्या-वेगळ्या चित्रांच्या माध्यमातून पावसाचे हे अनोखे रूप आपल्याला बघता येणार आहे, ‘लॅण्डस्केप मॉन्सून शो’ प्रदर्शनाच्या माध्यमातून! दि. ८ जून ते १८ जून या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये, |शींल. दुकान क्रमांक ३६, रुकी महल, सोराब भरुचा रोड, कुलाबा येथे अनुभवायला मिळणार आहे. या आगळ्या वेगळ्या चित्रप्रदर्शनाचा वेध घेणारा हा लेख...

पाऊस सोहळा झाला
कोसळत्या आठवणींचा
कधी उधाणता अन् केव्हा
थेंबांच्या संथ लयीचा
 
- संदीप खरे
 
पावसाचे विलोभनीय रूप अनुभवण्यासाठी, आपण सगळेच आतुर आहोत. पाऊस हा केवळ आपल्या निसर्गचक्राचा अविभाज्य भाग नसून, व्यक्तीच्या जीवनचक्रासाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. अशातच आता हुलकावणी देणार्‍या पावसाच्या सरी काही ठिकाणीच रिमझिम सरी बरसल्या आहेत. उन्हाच्या झळांमध्ये पोळून निघालेले कष्टकरी, लहान मुलं पावसाच्या प्रतीक्षेत आहेतच; मात्र त्याचबरोबर, निसर्गालासुद्धा कात टाकायची आहे. पावसाचं बेभान रूप, मनाला मोहून टाकणार असतं. या रूपाची सावली वेळोवेळी आपण संगीताच्या, चित्रांच्या माध्यमातून बघतो. मात्र दुसर्‍या बाजूला, पावसाचं एक वेगळंच रूप काही कलाकारांच्या मनात घर करतं. इथे पाऊस दिसत नाही, मात्र अबोध पातळीवर त्याचा स्पर्श जाणवतो. एका बाजूला ही निसर्गाची जीवनरेखा मूर्त स्वरूपात आभाळातून कोसळताना आपल्याला दिसते. मात्र, दुसर्‍या बाजूला आपल्या याच निसर्गामध्ये पाऊस ‘कारण’ आणि ‘परिणाम’ अशा दोन्ही पातळ्यांवर वावरताना असतो. हे ‘कारण’ आणि ‘परिणाम’ शोधण्याचे काम काही कलाकारांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या साध्य केले आहे.
 
एखाद्या वादळवार्‍यामध्ये निसर्ग, पाणी, आभाळ अशा सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये विरून जातात आणि समोर केवळ हलकल्लोळ उभा असतो. बर्‍याचदा पावसाच्या येण्यापूर्वी हा वादळ-वारा जणू इथल्या भोवतालाचा कानोसाच घेत आहे, अशा रितीने सारं काही लपेटून आपल्याबरोबर नेत राहतो. प्रदर्शनामध्ये असलेले हे पहिलेच चित्र बघणार्‍यांची उत्सुकता वाढवते. समोर पसरलेला अथांग समुद्र पावसाच्या प्रतीक्षेत असतो. त्या समुद्राची निश्चलता आपल्याला या चित्रांमध्ये बघायला मिळते. समुद्रातील लाटांवर हिंदोळे घेत डौलाने वावरणार्‍या लहान लहान बोटी, पाऊस आणि वादळवार्‍यामुळे किनार्‍याला लागल्या आहेत. ज्या बोटींचा जन्मच मुळी समुद्रात विहार करण्यासाठी झाला होता, त्यांच्या जीवनाचे तुटलेपण अत्यंत खुबीने चित्रकाराने रंगवले आहे. अशा या विविधरंगी चित्रांच्या मांदियाळीमध्ये, गंगेचा घाटसुद्धा अवचित प्रवेश करतो.
 
भूषण उदगीरकर यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून, पावसाच्या कोमल स्पर्शाने तयार झालेले हिरवे पठार दाखवले आहे. जमिनीवरून एखाद्या रुद्रावताराच्या दर्शनासमान भासणारा डोंगर, पावसाच्या आगमनामुळे निसर्गाच्या कुशीत आनंदाने विसावलेला आहे, असे दिसते. इथे पाऊस ‘परिणाम’ म्हणून आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूला स्थूल पातळीवर निसर्ग आहे, तर दुसर्‍या बाजूला सूक्ष्म पातळीवर शेतीच्या रूपात माळामध्ये उतरलेल्या पावसाचे चित्र अरविंद राणे यांनी साकारले आहे. इथे शेतजमीन आणि तळ्याच्या संगमातून गावातल्या एका छोट्या घराची सुंदर नक्षी तयार झाल्याचेही आपल्याला दिसून येते. सुनील विनकर यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून, पावसाळी वातावरणातील घरकुल उभे केले आहे. अशातच, एका चित्रामध्ये आपल्याला पावसाळ्यातल्या मुंबईचे दर्शनही घडते. त्याचबरोबर पावसाळ्यातील उन्हाच्यासुद्धा वेगवेगळ्या छटा आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळतात.
 
शंकर परब यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून पावसाळ्यातील संध्या दाखवली आहे. किनार्‍याच्या आसपास पडलेल्या होड्या एकाचवेळी पाण्यावर तरंगत असतात, तर दुसर्‍या बाजूला सूर्यकिरणांच्या अवकाशात त्यांच्या अस्तित्वाची नवलाई अत्यंत सर्जनशीलतेने म्हटल्याचे आपल्याला बघायला मिळते.
 
अशातच, पावसाच्या प्रतीक्षेचे रूप नेमकेपणाने उमटले आहे, ते प्रकाश खारकर आणि श्रीधर बादेकर यांच्या चित्रांच्या माध्यमातून! प्रकाश खारकर यांनी रणरणत्या उन्हामध्ये तापलेल्या प्रवेशद्वाराला वाचा फोडली आहे. निखळत जाणार्‍या कुंपणांची तार आणि त्यातून भवताली उमटणारी अस्वस्थता, एकाचवेळी विलोभनीय आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या वातावरणाचा विचार देणारी आहे. बादेकर यांनी आपल्या चित्राच्या माध्यमातून, उन्हाच्या सुवर्णकिरणांनी मंदिरांना व्यापून टाकणारे अवकाश कागदावर उमटवलेले आहे. मंदिरांच्या भव्यतेसमोर रचलेल्या माणसांच्या छोट्या छोट्या राशी म्हणजे, निसर्ग तत्त्वासमोर माणसाचे असलेले अस्तित्वच एका अर्थी दाखवून दिले आहे.
 
सबंध सृष्टीला तारणारा पाऊस, मानवी जीवनात चैतन्य निर्माण करणारा पाऊस, पावसाच्या अशा वेगवेगळ्या रूपांचे आपल्याला नियमितपणे दर्शन घडत असते. आताच्या घडीला आपण सर्वच लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. ही प्रतीक्षा एकाचवेळी उत्कंठा आणि भीती घेऊन येते. मात्र भावनांवर स्वार न होता, अत्यंत संयमाने या प्रतीक्षेच्या नोंदी कागदावर उमटवण्याचे महत्त्वाचे कामही याच माध्यमातून करण्यात आल्याचे आपल्याला बघायला मिळते. पावसाच्या प्रतीक्षेचा सोहळा अनुभवण्यासाठी ही चित्रसंपदा महत्त्वाची आहे.




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.