एमएमआरडीएच्या आवाहनाला बीकेसीतून उस्फुर्त प्रतिसाद; एमएमआरडीए कार्यालयात आज शून्य गाड्या

एमएमआरडीएच्या उपक्रमाला बीकेसीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Total Views |
Green Transport
 
मुंबई : (Green Transport)'हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो' या उक्तीप्रमाणे वांद्रे-कुर्ला संकुलाने (बीकेसी) शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने पहिले महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हरित चळवळीअंतर्गत सुरू केलेल्या 'बीकेसी शुक्रवार सार्वजनिक वाहतूक दिन' उपक्रमाला शुक्रवार, दि.१२ जून रोजी पहिल्याच दिवशी उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला.
 
वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन बीकेसीतील विविध संस्था, कंपन्या आणि नागरिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कर्मचारी आणि नागरिकांनी कार्यालयात ये-जा करण्यासाठी बस, रेल्वे, मेट्रो, रिक्षा आणि टॅक्सी यांसारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर केला.
 
या उपक्रमाचे नेतृत्व स्वतः एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. जेतवन येथील निवासस्थानातून ते पायी चालत कार्यालयात आले. त्यांच्या प्रेरणादायी सहभागामुळे एमएमआरडीएच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. सुमारे १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालय गाठले. विशेष म्हणजे एमएमआरडीए मुख्यालयाच्या वाहनतळात एकही वैयक्तिक वाहन दिसून आले नाही.
 
डॉ. मुखर्जी यांनी मार्गात स्वयंसेवकांशी संवाद साधत त्यांचे प्रोत्साहन केले. "बदल घडवण्यासाठी केवळ एक छोटे पाऊल उचलण्याची गरज असते," असा संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल डॉ. मुखर्जी यांनी सर्व नागरिक, कर्मचारी तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या विविध कॉर्पोरेट आणि शासकीय संस्थांचे आभार मानले. पुढील शुक्रवारी आणखी मोठ्या संख्येने नागरिक या उपक्रमात सहभागी होतील आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणारी ही संकल्पना एक व्यापक लोकचळवळ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
मी दररोज गाडी घेऊन कार्यालयात येतो. मात्र दर शुक्रवारी आता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून आम्ही सरकारला सपोर्ट करणार आहोत. सगळीकडे युद्ध परिस्थितीची झळ पोहोचली आहे. इंधन तुटवडा आहे, त्यामुळे आम्ही जोपर्यंत सर्व सुरळीत होत नाही तोपर्यंत आपण सर्वच आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करूया.(Green Transport)
 
- कल्पेश, ब्रोकर, भारत डायमंड बोर्स
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.