मुंबई : (Aqua Line Metro) विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक परवडणारी आणि सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) ने अॅक्वा लाईनवरील विद्यार्थी प्रवास सवलत योजनेचा लाभ आता पदवी स्तरापर्यंत विस्तारला आहे.
सुधारित पात्रता निकषांनुसार, मुंबईतील मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये, पॉलिटेक्निक आणि आयटीआयमध्ये पूर्णवेळ शिक्षण घेणारे विद्यार्थी अॅक्वा लाईनवर प्रवासासाठी २५ टक्के सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही सवलत एमएमआरसी-एनसीएमसी कार्डद्वारे उपलब्ध असून ४५ किंवा ६० प्रवासांच्या पासच्या स्वरूपात मिळेल. विद्यार्थी पास केवळ अॅक्वा लाईन स्थानकांवरील अधिकृत विक्री केंद्रांमधून आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर एमएमआरसी-एनसीएमसी कार्डवर जारी करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासावरील आर्थिक भार कमी करण्यासोबतच त्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला चालना देण्याच्या एमएमआरसीच्या प्रयत्नांनाही या निर्णयामुळे बळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि विद्यार्थी सवलत प्रवास पाससंदर्भातील अधिक माहितीसाठी एमएमआरसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. (Aqua Line Metro)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.