मेक्सिकोत उतरल्यापासून त्यांच्या झेंड्यातील लाल आणि हिरव्या रंगात अक्षरशः न्हाऊन गेलोय. जगाला ‘टाको’ची चव चाखायला देणार्या मेसिकनची टेस्ट तिखट असली, तर मनाने तसे हळवे. माझ्या हॉटेलवर ब्रेकफास्टला मला लाल चटणी की हिरवी चटणी हवीय, अशी अगत्याने विचारणा करणार्या त्या वेटरच्या डोळ्यांत याला त्यातील तिखटपणा झेपणार आहे का, असा भाव मी वाचत होतो. दोन्ही चटण्यांसोबत ‘टाकोस‘ खाणे म्हणजे अहाहा! तर हे सगळं इतकं तिखट-मीठ लावून रंगवून सांगायचे, म्हणजे वर्ल्डकपच्या उद्घाटनाच्या सामन्यात यजमान मेसिकोने प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेवर लाल तिखट अन् हिरवा झणझणीत विजय मिळवला. सामन्याचा अंतिम निकाल २-० असा असला, तरी मॅच भन्नाट रंगली. एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन लाल कार्ड या मॅचमध्ये झळकली. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला दोन, तर मेसिकोच्या एका खेळाडूला लाल कार्ड दाखविल्यामुळे मॅचबाहेर जावे लागले.
विश्वचषकाच्या उद्घाटन सामन्यात लाल कार्ड मिळण्याची ही घटना १९९४ नंतर प्रथमच घडली. याआधी बोलिव्हियाच्या मार्को एचेव्हेरी याला जर्मनीविरुद्धच्या उद्घाटन सामन्यात लाल कार्ड दाखवण्यात आले होते. यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिला गोल करण्याचा मान मेसिकोच्या ज्युलियन क्विनोनेस याने पटकावला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला त्याने गोल करत मेसिकोला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण पहिल्या सत्रात मेसिकोने वर्चस्व गाजवत दहावेळा गोलपोस्टवर आक्रमण केले. त्यांपैकी दोन प्रयत्न लक्ष्यावर होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला आक्रमण उभारण्यात फारसे यश आले नाही.
दुसर्या सत्राच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेच्या याया सिथोलेने गुटिएरेझची स्पष्ट गोल करण्याची संधी हाणून पाडल्याने त्याला थेट लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला केवळ दहा खेळाडूंनी खेळावे लागले.
६६व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या गिल्बर्टो मोरा याने वयाच्या १७ वर्षे २३९ दिवसांत विश्वचषकात मेसिकोचे प्रतिनिधित्व करणारा सर्वांत युवा खेळाडू होण्याचा मान पटकावला. ‘मोरा’तील प्रतिभा त्याच्या नावाने अखंड स्टेडियमवर सुरू असलेल्या जयघोषातून दिसत होती. त्याच्या अवघ्या एका मिनिटानंतर, ६७व्या मिनिटाला अनुभवी स्ट्रायकर राउल हिमेनेझ याने हेडरद्वारे गोल करत मेसिकोची आघाडी २-० अशी भक्कम केली.
८५व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेच्या थेम्बा झ्वाने याला हिंसक वर्तनाबद्दल लाल कार्ड दाखवण्यात आले आणि दक्षिण आफ्रिकेचे मैदानावरील खेळाडू केवळ नऊवर आले. २००६च्या विश्वचषकातील पोर्तुगाल आणि नेदरलॅण्ड्स यांच्या सामन्यानंतर एका संघाचे दोन खेळाडू लाल कार्डमुळे बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या खुलिसो मुदाऊ याची स्पष्ट गोल करण्याची संधी रोखल्याबद्दल मेसिकोच्या सेझार मॉन्टेस यालाही थेट लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे मेसिकोलाही अखेर दहा खेळाडूंनी सामना पूर्ण करावा लागला. विश्वचषकाचे बिगुल तर वाजलेय! आगामी लढती कशा असतील, याची ही तर सुरुवात आहे. मेसिकोसोबत यजमान असणार्या अमेरिका आणि कॅनडातही फुटबॉलचे युद्ध रंगणार आहे. सुरुवात तर दणयात झाली, इतके नक्की!