मुंबई : (Digital Gram Swaraj) डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नागरिकाभिमुख सेवांच्या बळावर महाराष्ट्रातील ग्रामविकास मॉडेलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६मध्ये सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
देशभरातील १.६५ लाखांहून अधिक ग्रामपंचायतींच्या सहभागातून झालेल्या स्पर्धेत कडेपूर ग्रामपंचायतीने ‘सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरण’ या गटात सुवर्णपदक मिळवले. तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाने जिल्हास्तरीय ई-गव्हर्नन्स श्रेणीत सुवर्ण यश संपादन केले आहे.
कडेपूर ग्रामपंचायतीने ग्रामीण प्रशासनात तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करून देशासाठी आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीने १,३५५ हून अधिक सेवा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या असून ४,३०० पेक्षा अधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळाला आहे. संपूर्ण कागदरहित ई-ऑफिस, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आठ प्रशासकीय अॅप्लिकेशन्स, ब्लॉकचेनद्वारे नोंदी व्यवस्थापन आणि जीआयएस आधारित मालमत्ता जिओ-टॅगिंग अशा अत्याधुनिक सुविधांमुळे कडेपूरची देशभरात विशेष दखल घेतली जात आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, नॅनोतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि रोबोटिक्स या विषयांवरील अधिकृत धोरणे स्वीकारणारी कडेपूर ही देशातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
दुसरीकडे, आदिवासीबहुल आणि दुर्गम नंदुरबार जिल्ह्यातील ‘ई-आरोग्य धमनी’ उपक्रमाने ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये डिजिटल क्रांती घडवून आणली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्गम भागातील नागरिकांना जलद, दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात या उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. या पुरस्कारांत सुवर्ण विजेत्यांना १० लाख रुपये तर रौप्य विजेत्यांना ५ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान सार्वजनिक कल्याणकारी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी वापरले जाणार आहे.(Digital Gram Swaraj)
गतवर्षी धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीनेही राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कारात सुवर्णपदक पटकावले होते. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत ‘डिजिटल ग्रामस्वराज्य’ संकल्पनेला नवे बळ दिले आहे. ग्रामीण भारताच्या डिजिटल परिवर्तनात महाराष्ट्र पुन्हा एकदा देशासाठी दिशादर्शक ठरल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.(Digital Gram Swaraj)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.