केईएममधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती;- सात दिवसांत अहवाल

    13-Jun-2026
Total Views |
Viral Video Case
 
मुंबई : (Viral Video Case) केईएम रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, समितीला सात कामकाजाच्या दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. प्राथमिक चौकशीनंतर आता सर्व बाजूंची सविस्तर तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
या प्रकरणातील विद्यार्थिनीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून तिच्या सुरक्षिततेबरोबरच समुपदेशनाची गरज असल्याचे प्रशासनाने सांगितले. विद्यार्थिनी ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असल्याने तिच्याबाबतच्या सर्व बाबी नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार हाताळल्या जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. चौकशी समितीसमोर विद्यार्थिनीला तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल, तसेच व्हिडिओतील विधानांपासून संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामापर्यंत सर्व पैलूंची तपासणी केली जाणार आहे.
 
हेही वाचा :  खासदार-संपादक संजय राऊतांवर मोदी-दीपकेचा फोटो डिलीट करण्याची वेळ का आली?
 
प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार समितीत वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असणार आहे. समितीच्या कार्यकक्षेत कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात होईल. प्राथमिक अहवालात काही आरोपांबाबत तथ्ये समोर आली असली, तरी सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याने विस्तृत समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
 
दरम्यान, विद्यार्थिनीला १५ दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने दिली. या कालावधीत चौकशी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून त्यानंतर समितीच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, विद्यार्थिनीचे वर्तन, संस्थेची प्रतिमा आणि संबंधित तक्रारी या सर्व बाबींचा चौकशीत समावेश असणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.(Viral Video Case)