कर्जतच्या सामाजिक जडणघडणीचे शिल्पकार

    13-Jun-2026
Total Views |
 Babarao Vaidya
 
कर्जतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचा इतिहास ज्या थोर व्यक्तिमत्त्वाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते नाव म्हणजे कै. विष्णू दत्तात्रय उपाख्य बाबाराव वैद्य. कर्जतमधील जवळजवळ सर्वच संस्थांचे संस्थापक, मार्गदर्शक आणि सर्वार्थाने आधारस्तंभ म्हणून बाबारावांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी व्यतीत केले.
 
बाबाराव वैद्य यांचा जन्म १४ जून १९२३ रोजी झाला. बालपणीच त्यांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले, परंतु या दुःखावर मात करत त्यांनी आपले जीवन घडवले. वसई आणि वेणगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी कर्जत आणि वेणगाव या परिसरालाच आपले मुख्य कार्यक्षेत्र बनवण्याचा संकल्प केला. बाबाराव हे तरुण वयात उत्तम पोहणारे होते. १९४७ सालापर्यंत दररोज दोन ते तीन तास पोहणे हा त्यांचा दैनंदिन परिपाठ होता. मात्र, पुढे अचानक झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हा आवडता छंद सोडून द्यावा लागला. तरीही, त्यांनी हार न मानता व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. आज कर्जतमध्ये कार्यरत असणारे 'वैद्य क्लॉथ स्टोअर्स', 'वैद्य फर्निचर्स' आणि 'वैद्य गादी कारखाना' हे उद्योग त्यांच्या याच व्यावसायिक कर्तृत्वाची आणि कष्टाची साक्ष देत आहेत.
 
बाबाराव यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जादू होती. त्यांच्या निगर्वी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी असंख्य लोकांना स्वतःशी जोडून घेतले. लोकसंग्रहाच्या बाबतीत ते प्रचंड श्रीमंत मानले जात. याच अफाट जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी कर्जतमध्ये सार्वजनिक कार्याचा श्रीगणेशा केला. कर्जतकर नागरिकांना वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी त्यांनी 'उल्हास मंडळा'ची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामवंत विचारवंतांना, वक्त्यांना कर्जतमध्ये आणून त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले. लोकांमध्ये एकजूट आणि राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या संघटन कौशल्याचे हे एक उत्तम उदाहरण होते.
 
बाबाराव केवळ माणसांचाच संग्रह करत नव्हते, तर ते उत्तम ज्ञानसंग्राहक होते. फुरसतीच्या वेळी ते नेहमी हातात एखादे पुस्तक घेऊन वाचनात मग्न असायचे. आपले हे पुस्तकप्रेम केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता, समाजातील प्रत्येकाला वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने कर्जतमध्ये सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचे ठरवले. त्यातूनच 'श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालया'चा जन्म झाला.
 
सुरुवातीला अत्यंत लहान जागेत सुरू झालेल्या या वाचनालयात बाबाराव स्वतः पुस्तके रचण्यापासून ते ग्रंथपालाला मदत करण्यापर्यंत सर्व कामे आनंदाने करत. पुढे ते या वाचनालयाचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिले. परंतु, पदाचा कोणताही अहंकार त्यांना नव्हता. कर्जतच्या शैक्षणिक विकासात 'अभिनव ज्ञान मंदिर संस्थे'चा वाटा मोलाचा आहे आणि या संस्थेच्या जडणघडणीत बाबाराव वैद्य यांचे योगदान अग्र क्रमांकाचे आहे.
 
अनेक वर्षे व्यवस्थापन समितीचे सभासद म्हणून काम केल्यानंतर, १९६२ पासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी संस्थेचे 'खजिनदार' म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या पारदर्शक आणि प्रामाणिक कारभारामुळे अनेक दात्यांनी संस्थेला सढळ हाताने मदत केली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, अशा परिस्थितीतही त्यांनी अथक प्रयत्न करून संस्थेसाठी १ लाख रुपयांची भव्य देणगी मिळवून दिली. स्वतःच्या आरोग्यापेक्षाही संस्थेचे हित कसे जपावे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.
 
सहकार क्षेत्रातही बाबारावांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. कर्जतच्या 'छत्री उत्पादन सहकारी सोसायटी'च्या स्थापनेत आणि संचालनात त्यांचा मोठा वाटा होता. बाबाराव वैद्य यांच्या या अष्टपैलू आणि विलोभनीय व्यक्तिमत्त्वाचा पाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांवर रचला गेला होता. ते स्वतः नेहमी या सर्व कर्तृत्वाचे श्रेय संघाला देत. १९३९ च्या सुमारास त्यांनी कर्जतमध्ये संघ कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली.
 
त्यांनी कर्जत शहर कार्यवाह, तालुका कार्यवाह अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी 'कर्जत शहर संघचालक' म्हणून संघकार्याची धुरा वाहिली. शारीरिक व्याधी सतावत असतानाही त्यांना शेवटपर्यंत केवळ संघकार्याचीच चिंता असे. समाजातील प्रत्येक व्यक्तीमधील सुप्त गुण हेरून, त्याला योग्य कार्यक्षेत्र सुचवून राष्ट्रकार्याला जोडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. विशेष म्हणजे, संघसंस्कारात वाढूनही मुस्लिम समाजातही त्यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे होते.
 
अशा या कर्मयोग्याचे १९ मार्च १९८९ रोजी निधन झाले. बाबाराव वैद्य आपल्यात भौतिक रूपाने नसले, तरी त्यांनी पेरलेले विचार, त्यांनी उभी केलेली कार्ये आणि कार्यकर्त्यांना दिलेली संस्कारांची शिदोरी आजही कर्जतमध्ये जिवंत आहे.