मुंबई: (Jawaharlal Nehru Port) देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने जागतिक स्तरावर आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवत भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून आपला मान कायम राखला आहे. जागतिक बँक आणि एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स यांच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये जेएनपीएने जागतिक क्रमवारीत 22 वे स्थान पटकावले आहे.
विशेष म्हणजे, 2020 ते 2025 या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या जगातील 20 प्रमुख बंदरांमध्ये जेएनपीएने 14 वे स्थान मिळवले आहे. या कालावधीत जेएनपीएच्या गुणांकनात 32 गुणांची वाढ झाली असून, त्याचे एकूण स्कोअर 66 वरून 98 पर्यंत पोहोचले आहेत. ही प्रगती बंदराच्या कार्यक्षमतेतील सातत्यपूर्ण सुधारणेचे द्योतक मानली जात आहे.
सीपीपीआय 2025 अहवालानुसार, जेएनपीएने बंदराच्या एकूण कामकाजापैकी 75 टक्के बर्थ ऑक्युपन्सी शेअर नोंदवला आहे. तसेच, सांख्यिकीय आणि प्रशासकीय मूल्यांकनांमध्ये उल्लेखनीय गुण मिळवत जागतिक कंटेनर बंदरांच्या स्पर्धेत आपले स्थान अधिक बळकट केले आहे.(Jawaharlal Nehru Port)
जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, क्षमता विस्तार, जहाजांच्या टर्नअराउंड वेळेत सुधारणा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक साखळी अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. त्यांनी बंदराशी संबंधित सर्व टर्मिनल ऑपरेटर, शिपिंग लाईन्स, सीमाशुल्क विभाग, कर्मचारी आणि भागधारकांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रासाठी हे यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. मुंबईलगत असलेले जेएनपीए देशाच्या निर्यात-आयात व्यापाराचे प्रमुख प्रवेशद्वार असून राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना देत आहे. सध्या जेएनपीएकडून अत्याधुनिक पायाभूत सुविधा, विशेष आर्थिक क्षेत्र आणि वाढवण येथे विकसित होत असलेल्या हरित बंदर प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक हब उभारण्याचे काम सुरू आहे.(Jawaharlal Nehru Port)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.