हवामानबदलामुळे वाढणारी समुद्राची पातळी, चक्रीवादळे आणि पूर हा चिंतेचा विषय झाला आहे. अशा परिस्थितीत जपानच्या ओसाका शहराने उभारलेली संरक्षण व्यवस्था, संपूर्ण जगासाठीच प्रेरणादायी आहे. पश्चिम ओसाका प्रदेशातील अजिगावा, शिरिनाशिगावा आणि किझुगावा नद्यांच्या मुखाशी कमानीच्या आकाराच्या भव्य पूरद्वारांना, एकत्रितपणे ‘थ्री ग्रेट स्लुईस गेट्स’ म्हणून ओळखतात.
ओसाका हे जपानमधील औद्योगिक आणि दाट लोकवस्तीचे क्षेत्र. समुद्रसपाटीच्या जवळ असल्याने याला, आजवर अनेकदा विनाशकारी वादळी लाटांचा सामना करावा लागला. १९३४ मधील ‘मुरोटो’ चक्रीवादळ, १९५० मधील ‘जेन’ चक्रीवादळ आणि १९६१ मधील दुसरे मुरोटो चक्रीवादळांनी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी घडवली. यानंतर येथील प्रशासनाने, १९६५ मध्ये ‘स्थायी वादळी लाट प्रतिबंध योजना’ सुरू केली. या अंतर्गत समुद्रकिनारी संरक्षण भिंती, जलनिःस्सारण यंत्रणा आणि विशाल पूरद्वारांची उभारणी करण्यात आली. १९७० मध्ये पूर्ण झालेली ही तीन पूरद्वारे भरती किंवा वादळी लाटांच्या प्रसंगी बंद होतात. यामुळे समुद्राचे पाणी शहरात प्रवेश करू शकत नाही. या दारांचा आकार आणि क्षमता थक्क करणारी आहे.
अजिगावा नदीवरील मुख्य दाराची रुंदी ५७ मीटर असून, त्याचे वजन तब्बल ५३० टन आहे. हे द्वार पूर्णपणे बंद होण्यासाठी ३० मिनिटे लागतात. किझुगावा आणि शिरिनाशिगावाजवळची दारेही याच आकारमानाची आहेत. विशेष म्हणजे अजिगावा येथील कमानीच्या आकाराचे दार, जपानमधील पहिले अशाप्रकारचे दार मानले जाते. या अनोख्या डिझाईनमुळे, हे दरवाजे ओसाकाची ओळखही ठरतात. मात्र, ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिल्यानंतर, या पूरद्वारांचे आयुर्मान समाप्तीच्या टप्प्यावर असल्याचे, एका तपासणीतून समोर आले. पुढे २०११ मध्ये जपानमधील त्सुनामीने, आपत्ती व्यवस्थापन धोरणांचा नव्याने विचार करण्यास भाग पाडले.
यानंतर ओसाका प्रशासनाने व्यापक अभ्यास सुरू केला. सुरुवातीला विद्यमान पूरद्वारे, त्सुनामीच्या वेळी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे त्सुनामीमुळे होणारे नुकसान कमी होणार असले, जलदाबामुळे दरवाजांच्या नुकसाननीची भीती होती. यामुळे भविष्यात आणखीच मोठा धोका निर्माण होण्याचीही शक्यता होती.
परिणामी, २०१७ मध्ये तज्ज्ञांच्या समितीने त्सुनामी-प्रतिरोधक नवीन पूरद्वारे बांधण्याचा पर्यायच प्रभावी ठरेल, असा निष्कर्ष मांडला. त्यानंतर २०१९मध्ये ओसाका प्रांताने आधीच्या दरवाजांशेजारीच अत्याधुनिक पूरद्वारे उभारण्याचा निर्णय घेतला. नव्या पूरद्वारांची उभरणी भविष्यातील तीव्र वादळी लाटा, समुद्रपातळीतील वाढ आणि संभाव्य महात्सुनामींचा विचार करूनच केली जात आहे. यासाठी हवामानबदल अभ्यास समित्या, नदी अभियांत्रिकी तज्ज्ञ, शहरी नियोजक आणि वास्तुविशारद यांनाही सहभागी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ओसाका प्रशासनाने या प्रकल्पाला केवळ अभियांत्रिकी उपक्रम म्हणून न पाहता, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपही दिले. अजिगावा पूरद्वारासाठी सार्वजनिक कल्पना स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. ज्यामध्ये पूरद्वार शहराचे प्रतीक व्हावे, यासाठी कल्पना मागवण्यात आल्या. शिवाय, विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. परिणामी, स्थानिक नागरिक प्रकल्पाशी जोडले गेले.
सध्या किझुगावा आणि अजिगावा नद्यांवरील नवीन पूरद्वारांचा विकास टप्प्याटप्प्याने सुरू असून; शिरिनाशिगावा नदीवरच्या नियोजन अंतिम टप्प्यात आहे. नवीन पूरद्वारे विद्यमान पूरद्वारांच्या अगदीच जवळ उभारली जात असून, त्यामुळे संरक्षण व्यवस्था कार्यरत ठेवत नूतनीकरण शक्य होत आहे. न्यूयॉर्क, जकार्ता, मुंबई, बँकॉक आणि रॉटरडॅमसारख्या शहरांसाठी, ओसाकाचा हा प्रकल्प महत्त्वाचा अभ्यासविषय ठरत आहे. कारण, हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांचे नूतनीकरण नसून, भविष्यातील आपत्तींचा वेध घेऊन केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आपत्ती आल्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा, त्या येण्यापूर्वीच वैज्ञानिक नियोजन आणि आधुनिक अभियांत्रिकीच्या मदतीने संरक्षण व्यवस्था उभारणे अधिक शहाणपणाचे ठरते. जपानने हा मार्ग निवडला आणि भविष्यात अनेक देश या जपानी मार्गाचे अनुकरण करतील, यात शंका नाही.