‘संगीत नाटक अकादमी’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या संस्थेच्या माध्यमातून, नुकताच कलेच्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणार्या दिग्गजांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र ही कलेची, संस्कृतीची भूमी. राज्यातील विविध कलारत्नांचा गौरव अकादमीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कलेच्या क्षेत्रात साधनेचा विचार ज्यांच्यामुळे रुजला, अशा दिग्गजांनी आपल्या कार्यकौशल्यातून त्या त्या क्षेत्रामध्ये नवीन विचार पेरला. त्यातील निवडक मान्यवरांच्या मनोविचाराचा पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर घेतलेला प्रतिक्रियारुपी मागोवा...
संगीताची अभिजातता टिकून राहील
पुरस्कारासाठी माझी निवड झाली, याचा मला आनंदच आहे. राष्ट्रीय स्तरावर ‘संगीत नाटक अकादमी’च्या माध्यामातून हा गौरव होणार असल्याने, हा मी माझा सन्मान समजतो. याबद्दल सांस्कृतिक विभागाचा मी आभारी आहे. माझे गुरुजी भीमसेन जोशी, त्याचबरोबर देशपांडे गुरुजी आणि मराठे गुरुजी यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. संगीत रंगभूमी असो किंवा अभंग गायन, मागच्या अनेक शतकांपासून ही समृद्ध परंपरा आपल्यापर्यंत चालत आली आहे. येणार्या काळातसुद्धा त्यातली अभिजातता टिकून राहील, असंच मला वाटतं. सध्या कधीकधी असं म्हटलं जातं की, या सगळ्याचं पुढे भविष्य काय? मात्र मला असं वाटतं की, या परंपरेकडे आता तरुणसुद्धा वळू लागले आहेत. त्यांनादेखील याचे शिक्षण घ्यायचे आहे, त्यामुळे ही समृद्ध परंपरा येणार्या काळात टिकून राहील, या विषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
- आनंद भाटे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक
(संगीत - हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, अभंग गायन)
शास्त्रीय नृत्यकला सर्व स्तरांपर्यंत पोहोचायला हवी!
पारितोषिकासाठी निवड केली, याचा आनंदच आहे. मात्र, त्याचबरोबर आता जबाबदारीसुद्धा वाढली आहे. आता आणखी जोमाने काम करायाला हवं, असं वाटतं. आपल्या शास्त्रीय नृत्यकलेचे संवर्धन होणे, अत्यंत आवश्यक आहे. अजूनही समाजातील सर्व स्तरांपर्यंत, विविध शास्त्रीय नृत्यकला पोहोचलेल्या नाहीत. आतासुद्धा ज्यावेळी आम्ही एखादी विशिष्ट शास्त्रीय नृत्यकला सादर करतो, त्यावेळी अनेकजण आम्हाला म्हणतात की हा एक नृत्यप्रकार प्रथमच पाहिला. त्यामुळे लोकांपर्यंत नृत्यकलेचा हा वारसा पोहोचायलाच हवा. कारण, शेवटी कलावंत आणि रसिक एकत्र आले, तरच सादरीकरण परिपूर्ण होते. आपल्या संस्कृतीची, कलेची जी समृद्ध परंपरा आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असं मला वाटतं. शासन आपल्या परीने काम करतेच आहे; मात्र समाज म्हणून आपणसुद्धा आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे.
-शुभदा वरडकर, ज्येष्ठ नृत्यांगना
(नृत्य क्षेत्रातील संशोधनासाठी)
कलाकृतींनी समाजाला विचार दिला पाहिजे
आतापर्यंत मी जे काम केलं, ते मी मनापासून केलं. त्यामुळेच हा पुरस्कार मला मिळाला आहे. कलेच्या क्षेत्रात आळस चालत नाही. कामाच्या बाबतीत सहकार्याची भावना महत्त्वाची आहे, असं माझ प्रामाणिक मत आहे. कलाकृतींच्या माध्यामतून आपण समाजाला काही तरी सांगितलं पाहिजे, समाजाला एक विचार दिला पाहिजे. तुम्ही जर बेशिस्तपणे वागलात, तर लगेचच बाहेर फेकले जाता. संघाच्या शाखेमध्ये मला शिस्त लागली, माझ्यावर संस्कार केले गेले. आपण कुणाबरोबर वावरतो, आपली संगत कुणासोबत आहे, याचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे. आपण कुणाचं ऐकतो, काय बोलतो, काय विचार करतो, याकडेही लक्ष दिलं पाहिजे. समाज आपल्याला सातत्याने नवनवीन गोष्टी शिकवत असतो; मात्र आपण डोळे उघडे ठेवून त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
-अरुण नलावडे, ज्येष्ठ अभिनेते
(अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी)
रंगभूमीसाठी काम करणार्यांचा हा सन्मान!
शाळकरी वयापासूनच संगीत रंगभूमीशी माझा परिचय झाला. लहानपणापासूनच पडेल ते काम करायचे मी शिकलो. रंगभूमीचे विविध कंगोरे, त्यातील कामांचे महत्त्व मी शिकून घेतले. याच काळात मग आपसूकच रंगभूमीचा अभ्याससुद्धा झाला. नाट्यक्षेत्रातील असंख्य दिग्गज मंडळी जसं की, गोविंदराव पटवर्धन, दाजी भाटवडेकर, यांचा सहवास लाभल्याने त्यांच्याकडूनही बर्याच गोष्टी शिकता आल्या. आपली वाणी, आपले उच्चार स्पष्ट असायाला हवेत, हे त्या काळातच कळलं. त्यानंतर विजय केंकरे, अजित भुरे असे प्रतिभासंपन्न दिग्दर्शकही लाभले. मला माझ्या जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यवस्थापन शिकवले, विनयशीलता शिकवली. ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले. या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली; ती म्हणजे संगीतकाराने दिलेली मूळ चाल बदलण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्या संगीताची, गाण्याची अस्सलता टिकून राहिली पाहिजे. आज माझा जो सन्मान होत आहे, तो वास्तविक रंगभूमीवर काम करणार्या लोकांचा सन्मान आहे, असं मी मानतो. त्यांच्या कामामुळेच हे शय झालं. सर्वांना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अजूनही मराठी रंगभूमीसाठी, संगीत रंगभूमीसाठी काम करायचे आहे आणि ते मी करत राहीन.
- पं. मुकुंद मराठे, ज्येष्ठ रंगकर्मी
(संगीत तथा पारंपरिक रंगभूमीवरील योगदानसाठी)
पुढची पिढीदेखील आश्वासकच
माझ्या दिग्दर्शनाचा प्रवास १९७८च्या आधीपासूनच सुरू झाला. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतही एकाच एकांकिकेचे अनेक प्रयोग न करता, वेगळा विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न मी केला. प्रख्यात लेखक, दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्याकडूनसुद्धा माझ्या दिग्दर्शनाची पावती मिळाली. विजयाबाई मेहतांपासून ते प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांच्यापर्यंत, अनेक दिग्गजांबरोबर साहाय्यक म्हणून मला काम करता आले. नाटक ही निरंतर शिकण्याची प्रक्रिया आहे. अजूनही मी नाटक शिकतोच आहे. आताच्या घडीला रंगभूमीवर नवनवीन विषय घेऊन येणारे तरुण, मुलखावेगळा विचार करताना दिसतात. ही नवी पिढी आश्वासक आहे. त्यांना रंगभूमीवरच त्यांचा सूर सापडतो. जर नवी पिढी काहीतरी वेगळं करू पाहात असेल, चांगला आणि सकस विषय आपल्यासमोर आणत असेल, तर जुन्या पिढीनेसुद्धा मनापासून दाद देण्याची गरज आहे
.
-प्रमोद पवार, - ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक
(दिग्दर्शन क्षेत्रातील कार्यासाठी)