सुशासन आणि सुप्रशासन पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळाचे महत्वाचे बलस्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मोदीजींनी देशात ३६० डिग्रीचा बदल केला

    13-Jun-2026   
Total Views |
India Development
 
मुंबई : (India Development) या १२ वर्षांमध्ये सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचे महत्वाचे बलस्थान राहिले. ज्यांनी देशात ३६० डिग्रीचा बदल केला अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने वंदन करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाच्या १२ वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे. प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकीर्दीचे १२ वर्षे पूर्ण केले. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ४ हजार ३९८ दिवसांचा रेकॉर्ड मोडत नवीन किर्तीमान स्थापित केला. देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे आणि जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचे काम त्यांनी केले.
 
आज एनडीए समूह जवळपास २२ राज्यांमध्ये आपले सरकार चालवत आहे. देशाच्या ७५ टक्के भुभागावर आज एनडीएशासित राज्य आहे. काँग्रेसलासुद्धा जेवढे यश मिळाले नव्हते तेवढे यश मोदी यांच्या नेतृत्वात भाजप-एनडीएला प्राप्त झाले आहे. विशेषत: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी असलेल्या बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्याबद्दल आम्ही अधिक आनंदित आहोत. भारताच्या नेतृत्वावर विविध देशांचा विश्वास पाहायला मिळतो. जागतिक मान्यताप्राप्त संस्थांनी यांनी मोदींचे रेटिंग ७५ टक्क्यांपर्यंत ठेवले असून जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.” (India Development)
 
ते पुढे म्हणाले की, “या १२ वर्षात २५ टक्के लोकांना गरिबी आणि तीव्र गरिबीतून बाहेर काढले. तर, ८१ कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याचे काम मोदीजींनी केले. ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ४.३ लाख कोटी रुपये दिले. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ८ लाख कोटी रुपये मिळाले. त्यांच्या कर्जाची मर्यादा ३ लाखांहून ५ लाखांपर्यंत नेण्याचे काम केले.
 
दहा वर्षात ७० टक्क्यांनी दूध उत्पादन वाढले असून भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. जनधन योजनेतून ५८ कोटींहून अधिक खातील निर्माण झाली ज्यातील ३२ कोटी महिलांची खाती आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ६० कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ कोटी घरे तयार झाली असून अजून ३ कोटी घरे तयार होत आहेत.”
 
महिलाकेंद्रित अर्थव्यवस्था
 
“महिला सक्षमीकरणासाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजना, लखपती दीदी अभियान आणि जल जीवन मिशनसारख्या उपक्रमांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील ३ कोटी महिला लखपती दीदी बनल्या असून महाराष्ट्रात हा आकडा ५० लाखांपर्यंत पोहोचला आहे. देशात ६ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे मोदींचे उद्दिष्ट आहे. महिलांना सशक्त करून महिलाकेंद्रित अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदीजींनी केले. सुशासनाच्या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे नागरिकांच्या खात्यात लाखो कोटी रुपये जमा करण्यात आले. तसेच जेम पोर्टल आणि डिजिटल व्यवहार प्रणालीमुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनले,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (India Development)
 
 
५ ट्रिलियन इकॉनॉमिकडे भारताची वेगाने वाटचाल
 
“पायाभूत सुविधा क्षेत्रात गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचे काम केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ८ लाख किमी रस्ते झाले आहेत. १३३७ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत म्हणून कायापालट होतो आहे. १६४ हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस भारतीयांच्या सेवेत आणली. देशातील मेट्रो नेटवर्क ५ शहरांवरून २६ शहरांपर्यंत गेले असून त १२६ विमानतळे बनली आहेत. आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. लोक मंदी मंदी असे सांगत होते पण देशाचा विकासदर सात टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. ५ ट्रिलियन इकॉनॉमिकडे भारताची वाटचाल वेगाने सुरू आहे. यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांमध्ये भारताने जागतिक नेतृत्व मिळवले आहे.
 
भारताने चीनसह अनेक देशांना मागे टाकले असून ३० देश आपण तयार केलेला युपीआय वापरत आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन, मेक इन इंडिया आणि सेमीकंडक्टर प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने विशेष सहकार्य केले असून अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, दिघी पोर्ट, अमरावती मेगा टेक्स्टाइल पार्क, छत्रपती संभाजीनगर येथील डीएमआयसी आणि औरिक सिटी, गडचिरोली स्टील सिटी तसेच रायगड येथील एम्ससारखे महत्त्वाचे प्रकल्प राज्यात साकार होत आहेत.”
 
काश्मीरमध्ये झालेली चूक सुधारली
 
मुख्यमंत्री म्हणाले की, “काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक सुधारून कलम ३७० आणि ३५ (ए) रद्द केले आहे. १०० टक्के काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्याचे काम मोदी सरकारने केले. वाढवण बंदर १० लाख लोकांना रोजगार देणार असून महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकणार आहे.”
  
१२ वर्षे बेदाग सरकार चालवले
 
१२ वर्षांत मोदी सरकारवर कुणीही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाही. ज्यांनी केले ते तोंडावर पडले आहेत. त्यामुळे १२ वर्षे बेदाग सरकार त्यांनी चालवले आहे. (India Development)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....