आजचे युग हे डिजिटल आहे. या युगामध्ये जग जवळ आले आहे. ‘एआय’ने तर या युगामध्ये ज्ञानाचा वेग प्रचंड वाढवला आहे. त्याचबरोवर नैतिकतेचे प्रश्नही निर्माण केले आहेत. या महाशक्तीचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा, यासाठी सनातन धर्मातील मूल्यांचा विचार याच्या मुळाशी असणेच अनिवार्य ठरते.
आजच्या ‘डिजिटल’युगात सनातन धर्माचे महत्त्व मानवी चेतनेसाठीची, एक चौकट म्हणून आहे. ते आपण सध्या राहत असलेल्या ‘अल्गोरिदम’ केंद्रित, यांत्रिक जगाला एक अत्यंत आवश्यक संतुलन प्रदान करते. वेग, कार्यक्षमता आणि बाह्य संपर्कांवर भर देण्याच्या या काळात, सनातन धर्म अंतर्दृष्टी आणि आंतरिक स्थिरतेसाठीचा एक मार्ग प्रशस्त करण्याचे कार्य करतो. डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांच्या उदयामुळे, गोपनीयता आणि सत्यतेवर नैतिक वादविवाद सुरू झाले आहेत. ही एक वाढती समस्या असून, सनातन धर्मातील सत्य आणि अहिंसा ही तत्त्वे या समस्यांना सामोरे जाण्यासाठी एक नैतिक अधिष्ठान प्राप्त करुन देतात. तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यास प्रोत्साहित करण्याबरोबरच, करुणा व प्रामाणिकपणावर आधारित डिजिटल-संस्कृतीचा विकासही सतानत धर्मातील तत्त्वांमुळे शक्य होतो.
‘सनातन धर्म’ हा एक स्वत:च डिजिटल मार्गदर्शक आहे. हा मानवाचे ‘वेद’, ‘उपनिषद’ आणि ‘भगवद्गीते’मधील शिकवणीवर लक्ष केंद्रित करतो. व्यापक आणि सामान्य माहिती देणार्या पारंपरिक ‘एआय’ मॉडेल्सच्या विपरीत, सनातन धर्म विशेषतः सनातन तत्त्वांवर आधारित अंतर्दृष्टी आणि सल्ला निर्माण झाला आहे. हे तंत्रज्ञान आणि परंपरेचे एक आदर्श मिश्रण असून, ज्याचा उद्देश सनातन धर्मग्रंथांचे शाश्वत ज्ञान जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. ‘डिजिटल’युगातील सनातन धर्माकडे विविध दृष्टिकोनांतून पाहिले जात असले, तरीही तंत्रज्ञान परंपरांची जागा घेत नाही, हे सत्य आहे. उलट, तंत्रज्ञान या परंपरांना अधिकच समृद्ध करते. हे लोकांना त्यांच्या मुळांशी जोडते. ज्यांना आजवर या परंपरांचा भाग होता आले नाही, त्यांच्यासाठीही साधना उपलब्ध करून देते.
आजच्या अत्याधुनिक ‘एआय’ क्रांतीदरम्यान नैतिकतेचे महत्त्व
वसाहती काळात मुद्रण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आधुनिक शैक्षणिक साहित्य प्रकाशित होऊ लागले. यातूनच असंख्य संस्कृत आणि प्रादेशिक ग्रंथांचे दस्तऐवजीकरण आणि भाषांतरही झाले. सध्याच्या ‘डिजिटल’युगाने आध्यात्मिक आणि तात्त्विक लेखनाचे मोठ्या प्रमाणावर जतन आणि जागतिक वितरण करत, या प्रयत्नांना गती दिली. डिजिटल ग्रंथालये, हस्तलिखितांचे संग्रह आणि मुक्त-प्रवेश मंच आता या ज्ञानपरंपरांचे रक्षण करताना, जगभरातील विद्यार्थी आणि आध्यात्मिक साधकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. अलीकडच्या दशकांमध्ये, पारंपरिक ज्ञानामध्येही स्वारस्य वाढले आहे. विद्यापीठे, सांस्कृतिक संस्था, स्वतंत्र संशोधकांनी एकत्र येऊन हस्तलिखितांचे ‘डिजिटायझेशन’ करणे, समीक्षेच्या विविध आवृत्त्या तयार करणे आणि शैक्षणिक ‘डेटाबेस’चा विकास करण्याासाठीही काम केले आहे. जुन्या ग्रंथातील धार्मिक ज्ञान डिजिटल पद्धतीने जतन करुन त्याचा प्रसार करताना, अनेक उपक्रमांचा उदय झालेलाही आपल्याला पाहायला मिळतो.
वसाहतवादी काळात मॅस म्युलरसारख्या विद्वानांनी महान भारतीय संस्कृती, परंपरा, विज्ञान, पर्यावरण, मानसशास्त्र, चेतना आणि जीवन व्यवस्थापनाच्या ज्ञानाविरुद्ध, भारतीय आणि उर्वरित जगाच्या मनात विष कालवण्यासाठी ‘वेद’ आणि ‘उपनिषदां’मध्ये फेरफार करत त्याचे फसवे भाषांतर केले. त्याचे हानिकारक परिणाम आजही आपल्याला जाणवत आहेत. विशेषतः तरुण भारतीयांना याचा सामाना करावा लागत आहे. आज जगात असलेली डावी विचारसरणी ‘एआय’ च्या वापराने भारतीय ज्ञानाला विकृत करत, येणार्या पिढ्यांच्या मनात भारतीय संस्कृतीच्या विरोधात विष कालवण्याचा धोका शतपटीने वाढला आहे.
सनातन धर्माच्या डिजिटल प्रसारासाठी डिजिटल तंत्रज्ञान कसे मदत करते?
समाजमाध्यमांनी, सनातन धर्माच्या वाढीसाठी एक जागतिक व्यासपीठ तयार केले आहे. वैदिक तत्त्वज्ञान, योग आणि सनातन धर्मावर लक्ष केंद्रित करणारी विविध खाती, समूह आणि प्रभावशाली व्यक्ती, जगभरातील व्यक्तींना एकत्र आणत आहेत. अशापद्धतीने ऑनलाईन जगात ‘आभासी’ सत्संगांचेही आयोजन होताना आज दिसते आहे. या ठिकाणी, पारंपारिक ज्ञानाला आधुनिक विचारसरणीशी जोडण्यात येते. अनेक लोकांसाठी ही व्यासपीठे एक संधी म्हणून काम करताना दिसतात. यामुळे, तरुणांची सनातन धर्माच्या तत्त्वज्ञानाशी तोंडओळख होऊन, या ज्ञानाविषयी त्यांची जिज्ञासा वाढीस लागते. यावरूनच तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने, आधुनिक जगातही प्राचीन प्रासंगिकता टिकवणे शक्य असल्याचे सिद्ध होते. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात, सनातन धर्माने भौगोलिक सीमा ओलांडल्या. आज हिंदू जगाच्या प्रत्येक भागात, विशेषतः अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. यामुळे सनातन धर्मही विविध सांस्कृतिक वातावरणात वाढण्यास आणि समृद्ध होण्यास मदत झाली.
सनातन धर्माचे सौंदर्य त्याच्या मूळ तत्त्वांना न गमावता, विकसित होण्याच्या इच्छेमध्ये आहे. प्राचीन ज्ञानाला आधुनिक साधनांशी जोडूनच, ही परंपरा आपल्या शिकवणीचा प्रसार करत आली आहे. ध्वनी आणि कंपनांवर असलेला या संस़्कृतीचा भर, जप किंवा मंत्रांच्या निर्मितीसाठी ‘एआय’चा वापर केला जाऊ शकतो, असे सूचित करतो. पवित्र कंपनांवर आधारित ‘एआय’ निर्मित संगीत ध्यान, आरोग्यप्राप्ती आणि आध्यात्मिक कार्याला साहाय्यभूत ठरते. ज्योतिष आणि अंकशास्त्राशी असलेले या परंपरेचे घनिष्ठ संबंध दर्शवतात की, ‘एआय’ वैदिक पद्धतीनुसार ज्योतिषही सांगू शकते. या क्षेत्रातील ‘एआय’च्या वापरन्ने, ग्रहांच्या हालचाली एखाद्या व्यक्तीच्या कर्माशी कशा जुळतात, यावर अधिक अचूक भाकित मिळू शकतील.
स्वामी विवेकानंद आणि ‘एआय’
विवेकानंदांनी पाश्चात्त्य विज्ञान आणि पारंपरिक भारतीय विज्ञानाला, वेदांताच्या तात्त्विक अंतर्दृष्टीशी जोडण्याची कल्पना केली होती. यातूनच वास्तवाविषयी एक व्यापक दृष्टिकोन निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी स्पष्ट केले होते की, वेदांत तत्त्वज्ञानाचा मुख्य केंद्रबिंदू एकतेचा शोध असून, संपूर्ण विश्व हे एकाच स्वयंविकसित कारक घटकातून निर्माण झाल्याबाबत, वेदांत आणि आधुनिक विज्ञानाची एकवाक्यता आहे. जर हे सत्य असेल तर या कारक घटकांत भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हींचा समावेश असला पाहिजे. यामुळेच अस्तित्वाची एक सुसंगत समज निर्माण होईल.
दुसरीकडे, ‘एआय’च्या युगात जिथे जग, स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची वस्तुनिष्ठ सत्ये ‘अल्गोरिदम’ने प्रभावित न होता सहज उपलब्ध होत आहेत; तिथे मानवजात स्वाभाविकपणेच सनातन धर्माकडे आकर्षित होईल. जसजसे ‘एआय’ दैनंदिन नीतिमत्तेपासून ते विश्वाच्या विसंगतीपर्यंत जीवनातील गुंतागुंतीचे सखोलपणे संशोधन करेल, तसतसे धर्माचे सर्वसमावेशक स्वरूप अधिकच प्रकाशमान होईल. हा केवळ एक अंदाज नसून; धर्माच्या साराशीच सुसंगत विचार आहे. हा एक असा मार्ग आहे, ज्याचा विकास साधकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाला आहे. हा मार्ग एका अशा पुनर्जागरणाला प्रोत्साहन देतो; जिथे तंत्रज्ञान हे साधकाच्या आध्यात्मिक विकासाला चालना देते.
नैतिक आचरण आणि दृष्टिकोनासाठी सनातन धर्म
सनातन धर्म ’धर्म’ शिकवतो; म्हणजेच सदाचारी जीवन जगण्याचे आणि नैतिक नियमांच्या पालनाचे कर्तव्य तो सांगतो. याच संकल्पनेला नैतिक ‘प्रोग्रॅमिंग’मध्येही स्थान आहे. ‘एआय’ अभ्यासकांनी अशा प्रणालींची रचना केली पाहिजे, ज्या नैतिकतेने कार्य करतील आणि दुसर्याला हानी पोहोचवणे टाळतील. आज निष्पक्षता, न्याय आणि सामूहिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी, नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार्या ‘एआय’ निर्मितीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. हे मूलतः धर्माच्या योग्य आचरणाच्या तत्त्वांशीच सुसंगत आहे.
याच दृष्टिकोनातून ‘एआय’मधील नैतिक कर्तव्ये ही एका यज्ञासारखी आहेत. ‘एआय’ची निर्मिती आणि वापर करणार्यांवरच हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे की, हे तंत्रज्ञान जबाबदारीने, पारदर्शकतेने आणि मानवतेच्या सेवेसाठीच विकसित होईल. ज्याप्रमाणे यज्ञ वैश्विक संतुलन राखतो, त्याचप्रमाणे ‘एआय’ची रचनाही सर्वांच्या कल्याणासाठी आणि समाजात सकारात्मक योगदानासाठी झाली पाहिजे. आजकाल ‘डेटा’चे संरक्षण करणे, हे ‘फायरवॉल’ आणि ‘पासवर्ड’सारख्या तांत्रिक सुरक्षा उपायांच्या पलीकडे गेले आहे. हे मूलतः मूल्यांशीच संबंधित आहे. समकालीन सायबर सुरक्षेचे तत्त्वज्ञान, हे सनातन धर्म आणि ‘भगवद्गीते’च्या शिकवणींनाच विविध प्रकारे प्रतिबिंबित करणारे ठरते.
-डॉ. पंकज जयस्वाल