गिरगाव-मलबार हिलमधील वीजपुरवठा होणार अधिक मजबूत; बेस्टकडून 33,000 व्होल्ट क्षमतेची नवी केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात
13-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Girgaon Malabar Hill) गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने जुन्या व जीर्ण झालेल्या 33,000 व्होल्ट क्षमतेच्या उच्च-दाब वीज केबलांच्या जागी नवीन केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा गिरगाव आणि संभाजी केंद्रातून दोन 33,000 व्होल्ट क्षमतेच्या केबलद्वारे केला जातो. यापैकी एक केबल रेल्वे रुळांखालून जात असून ती जुनी झाल्यामुळे वारंवार बिघाड होऊ लागला होता. त्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होत होता. दुसऱ्या केबलमध्येही बिघाड झाल्याने गिरगाव परिसरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही केबल्स अत्यंत जुन्या झाल्या असून भविष्यात पुन्हा बिघाड होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नवीन केबल टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नेताजी सुभाष रोड, ए. के. रोड, महर्षी कर्वे रोड आणि श्यामलदास गांधी रोड येथे खोदकाम करून भूमिगत डक्टद्वारे नवीन केबल टाकण्यात येणार आहे.(Girgaon Malabar Hill)
या कामासाठी महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांकडून आवश्यक परवानग्या प्राप्त करण्यात आल्या असून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.
बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले की, गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह करण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच या भागात दोन नवीन वीज वितरण केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पासाठी सुमारे 20 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.(Girgaon Malabar Hill)