तंतू अर्थव्यवस्था : भविष्यातील मोठी जागतिक संधी

    13-Jun-2026
Total Views |
 
 India
 
देशातील बहुसंख्यांना रोजगार देणारा उद्योग म्हणजेच वस्त्रोद्योग. भारतातील वस्त्रोद्योगाला अन्य कोणत्याही उद्योगापेक्षा मोठा इतिहास लाभला आहे. असे असले, तरीही या उद्योगाने कालौघात स्वत:मध्ये अनेक बदल केले. आता भारत वस्त्रतंतूंची निर्मिती करत असून, हा बदल भारतीय वस्त्रोद्योगाच्या कथेचा सुवर्ण अध्याय ठरणार आहे.
 
वस्त्रतंतू हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचाच भाग आहे. त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास असून, त्याचे धागे आपल्या ग्रामीण जीवनशैलीत, परंपरांमध्ये गुंफलेले आहेत. यातूनच आपल्या सर्वांची भारतीय म्हणून एक सामूहिक ओळख तयार झाली. ‘मोहेंजोदारो’मधील प्राचीन वारसा सांगणारे मलमलचे कापड अर्थात ‘व्होवन एअर’ जगभर पोहोचवलेल्या भारतीय वस्त्र कारागिरीपर्यंत, हे तंतू हे नेहमीच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधार राहिले आहेत. आज जेव्हा आपण जागतिक शाश्वततेच्या उंबरठ्यावर उभे आहोत, त्यावेळी या स्पर्धेत हेच प्राचीन ज्ञान आपली सर्वांत मोठी ताकद आहे.
 
कित्येक दशके केळ्याच्या फांद्यांना कचरा म्हणून फेकून दिले जात असे. आज त्याच जैवकचर्‍यापासून उत्तम दर्जाची वस्त्रे तयार होत आहेत. याची निर्यात बाजारात महत्त्वाची ठरली असून, ग्रामीण उपजीविकेसाठीही हे एक शाश्वत साधन आणि कृषी-कचर्‍याचे राष्ट्रीय उत्पन्नात रूपांतर करणारा महत्त्वाचा घटक ठरले. ‘कचर्‍यापासून सोने, स्थानिक विपुलतेपासून जागतिक संधीकडे’ हेच भारताच्या वस्त्र चळवळीचे मर्म आहे. यातूनच नैसर्गिक वस्त्रे आणि जागतिक नेतृत्वाचा भारताचा मार्ग प्रशस्त होणार आहे.
 
या नव्या युगातील वस्त्रतंतूंची निर्मिती शाश्वत, वनस्पतीजन्य घटकांपासून होते. यामध्ये भारताचे प्राचीन परंपरागत ज्ञान आणि आधुनिक नवोन्मेषाचा संगम आहे. बांबू, भांगेच्या फांद्या, केळी, अननसाच्या पानाचे तंतू, फ्लॅस, रॅमी, सिसल, मिल्कवीड आणि कापोकसारखे तंतू, शतकानुशतके अस्तित्वात आहेत. मात्र, आज त्यांचा वस्त्रोद्योग, संरक्षण क्षेत्र, जैवविघटनशील साहित्यासारख्या उच्च-मूल्य उत्पादनांमध्ये उपयोग होत आहे. हे तंतू देशाच्या नैसर्गिक तंतूंच्या विविधतेत भर घालत असून, अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देत आहेत.
 
उत्पन्नात वाढ, जागतिक शाश्वततेच्या गरजांची पूर्तता आणि उत्पादनांच्या निर्मितीचा मागोवा गरज, यांमुळे जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये मूलभूत बदल झाला. यातूनच, नव्या तंतूआधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. ग्राहकही आता त्यांच्या वापरातील प्रत्येक वस्तू आरामदायक आणि पर्यावरणपूरक असण्याला प्राधान्य देत आहेत. या बदलांमुळे, भारतातील तंतूंचा वापर सध्याच्या १५ दशलक्ष मेट्रिक टनांवरून, २०३० पर्यंत २३ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जगाला आज अशाच उत्पादनांची गरज असून, ज्याची पूर्तता भारत निश्चित करु शकतो. यामध्ये शाश्वत आणि उच्च कार्यक्षमतेची नैसर्गिक तंतूवस्त्रे भारताचे खरे सामर्थ्य असून; यांना शतकानुशतकांच्या कौशल्यपूर्ण परंपरेचा मजबूत आधारही लाभलेला आहे.
 
आमच्या या दृष्टिकोनाला, संस्थात्मक व्यवस्था आणि स्वच्छ धोरणात्मक आराखड्याचेही पाठबळ लाभले आहे. कापूस उत्पादकता अभियानाअंतर्गत, वर्ष २०२६-२०३१ साठी पाच हजार, ६६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ३०० कोटी नव्या युगातील तंतूंसाठी समर्पित असून, हा निधी वेगळा राखून ठेवण्यात आला आहे. याच प्रयत्नांना पूरक म्हणून, वर्ष २०२६-२७च्या अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय फायबर मिशन’चीही घोषणा करण्यात आली. हे अभियान चार स्तंभांवर आधारित असून, त्यात कृषिसूत्र- लागवड आणि कच्चा माल विकासासाठी, अमर्यादित्व- संशोधन आणि नवोन्मेषासाठी, ग्रामसेतू- पायाभूत सुविधा आणि उद्योग उभारणीसाठी आणि ‘जीएमपीएस’, ब्रॅण्डिंग आणि बाजारपेठ विकासासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
 
या धोरणाची खरी शक्ती कित्येक दशकांच्या शास्त्रीय संशोधनात असून, त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. भगवान शिवाला अर्पण केली जाणारी वनस्पती ‘मिल्कवीड’ म्हणजेच, आक/मदार आज वस्त्रोद्योग आणि संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण शोध म्हणून समोर आली आहे. ‘नॉर्दर्न इंडिया टेसटाईल रिसर्च असोसिएशन’ अर्थात ’नित्रा’ यांनी, १८ वर्षांच्या अथक संशोधनानंतर या वनस्पतीच्या तंतूंचा यशस्वी विकास केला. याचा वापर उणे २० अंश सेल्सिअसमध्ये कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांच्या, ‘स्लीपिंग बॅग्ज’मध्ये होतो.
 
या ‘स्लीपिंग बॅग्ज’ पॉलिस्टरच्या पर्यायांपेक्षा सुमारे दहा टक्के हलया, लोकरपेक्षा अधिक उबदार असून, त्यांना सीएलओ/सेल प्रमाणपत्रही मिळाले आहे. विशेष म्हणजे, ही वनस्पती कोणत्याही रासायनिक खतांशिवाय देशातील सुमारे ५५ दशलक्ष हेटर पडीक जमिनीवर सहजपणे वाढू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांना, प्रतिएकर दरवर्षी अंदाजे दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता यात आहे.
 
केळीच्या तंतूंपासूनही वार्षिक सुमारे १.८ दशलक्ष टन उत्पादन शक्य असल्याने, शेतीतील टाकाऊ अवशेषांपासूनही शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. दुसरीकडे बांबूच्या शेतीतून प्रतिहेटर ६० टनांपर्यंत बायोमास मिळू शकत असल्याने, ईशान्य भारतासाठीही मोठ्या संधी निर्माण होत आहेत. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात लागवडीला परवानगी मिळालेल्या भांग (हेम्प) या पिकाची बाजारपेठदेखील, जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. अळशी (जवस), सिसल, रॅमी, पाल्फ (अननसाच्या पानांचे सूत), नेटल आणि कापॉक (शाल्मली/कापूस) यांसारख्या तंतू पिकांमुळे, भारताच्या शाश्वत तंतू पीक उत्पादनांचा विस्तार सातत्याने होत आहे.
 
या वैज्ञानिक गतीच्या आधारावर, ‘नॅशनल सेमिनार ऑन न्यू एज फायबर्स’ हा तंतूंवरील राष्ट्रीय परिसंवाद विज्ञान, धोरण आणि उद्योगांना एकत्र आणणारा एक मोठा मंच ठरला आहे. याने संशोधक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी संघटना, उद्योग क्षेत्रातील नेते आणि धोरणकर्ते यांना एकाच छताखाली आणले. सर्व दहा प्राधान्य क्रमाच्या तंतूंचा समावेश असलेले, तीन कृतिदल अहवालही प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये विज्ञानाचे रूपांतर योजनांच्या आराखड्यात आणि गुंतवणुकीच्या प्राधान्यांमध्ये झाले.
 
या परिसंवादाने मानके, प्रक्रिया पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक वित्तपुरवठा यांमधील त्रुटी उघडपणे मांडल्या. केवळ यशाची चर्चा न करता, वास्तविक अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले. यादरम्यान, काही प्रमुख प्राधान्य क्रमही समोर आले असून, पुढील पाच वर्षांत उत्पादन दहा हजार मेट्रिक टनांवरून दहा लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढवणे, गुणवत्ता मानके विकसित करणे, यंत्रसामग्रीच्या स्वदेशीकरणाला चालना देणे, आयात केलेल्या प्रक्रिया तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आणि लागवडीपासून ते मूल्यवर्धनापर्यंत ‘लस्टर’आधारित फायबर परिसंस्था निर्माण करण्यावर एकमत झाले. यातून ‘न्यू एज फायबर्स’ला ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत विकासासाठी, एक एकत्रित मोहीम म्हणून सरकारने स्थापित केले आहे.
 
कदाचित, सर्वांत क्रांतिकारी किंवा परिवर्तनात्मक क्षेत्र म्हणजे ‘फायबर ब्लेंडिंग’ अर्थात तंतूंचे मिश्रण असेल. भारताची खरी ताकद कोणत्याही एका तंतूमध्ये नसून, त्यांचे अतिशय हुशारीने मिश्रण करण्यात आहे. याची उदाहरणे म्हणजे, उष्णता कमी करण्यासाठी रुई, उबदारपणासाठी लोकर, हवा खेळती राहण्यासाठी बांबू आणि मऊपणासाठी कापूस एकत्र करणे. मिश्रित कापड अर्थात ब्लेंडेड फॅब्रिक ही कोणतीही तडजोड नसून, ती एक गुणवत्ता वाढवणारी प्रक्रिया आहे. यामुळे अधिक मजबूत, स्मार्ट आणि शाश्वत कापडाची निर्मिती होते; जे उत्तम आराम, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता, टिकाऊपणा आणि फॅशन, जीवनशैली, तसेच तांत्रिक वस्त्रोद्योगामध्ये विविध प्रकारच्या उपयोगांचा पर्याय म्हणून समोर येते.
 
संपूर्ण मूल्य साखळीत, सर्वच स्तरांवर एकापासून दुसर्‍यापर्यंत अशा स्वरूपात याचे लाभ मिळतात. ग्राहकांना उत्तम आराम आणि कार्यक्षमता मिळते, उत्पादकांना उच्च दर्जाची व विविधता असलेली उत्पादने मिळतात आणि शेतकर्‍यांना अधिक शाश्वत उत्पन्नाचा फायदा होतो. भारतासाठी हे मिश्रण तांत्रिक नवोन्मेषापेक्षाही अधिक महत्त्वाचे असून, कच्च्या तंतूंच्या पुरवठ्यापासून ते भारतीय अस्मितेशी जोडल्या गेलेल्या जागतिक स्तरावरील ब्रॅण्ड्सना जोडणारा एक सेतू आहे.
 
अतिशय सखोल विचार केल्यास, ‘न्यू एज फायबर’ चळवळ ही जीवनात बदल घडवणारी, शेतकर्‍यांसाठी संधी निर्माण करणारी, ग्रामीण उपजीविका मजबूत करणारी, महिलांचे सक्षमीकरण करणारी आणि स्थानिक संसाधनांतून जागतिक उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना सक्षम करणारी एक परिवर्तनकारक चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘५-एफ व्हिजन’ म्हणजेच, ‘फार्म ते फायबर, फॅब्रिक ते फॅशन ते फॉरेन’ यावर आधारित, भारताची ही ‘हरित फायबर क्रांती’ काही स्वप्न नाही. यासाठीची रणनीती निश्चित झाली असून, संस्थाही याच्या यशासाठी कार्यरत आहेत. यासाठीचे विज्ञान सिद्ध झाले आहे, उद्योजक सज्ज आहेत. भारत आता प्रत्येक फायबर, प्रत्येक मिश्रण, प्रत्येक प्रदेश आणि प्रत्येक शेताच्या माध्यमातून, आपल्या वस्त्रोद्योगाच्या कथेचा पुढचा सुवर्ण अध्याय लिहिण्यास सज्ज झाला आहे.
 
गिरीराज सिंह
(लेखक केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आहेत.)