धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन

    13-Jun-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
एनसीपीए येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित माजी खासदार दिवंगत अण्णासाहेब उपाख्य चुडामण पाटील यांच्या 'अजिंक्य' या जीवनचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार शोभाताई बच्छाव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धुळे जिल्ह्याने अनेक दशकांपासून महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. या भागातील मानवी संसाधने, उद्योग, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील क्षमता लक्षात घेऊन राज्याच्या नव्या विकास आराखड्यात या दोन्ही जिल्ह्यांना महत्वाचे स्थान दिले जाणार आहे.”
 
ते पुढे म्हणाले की, “दिवंगत अण्णासाहेब चुडामण पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास आहे. आर्थिक संकटामुळे गिरणीत नोकरी स्वीकारलेल्या अण्णासाहेबांनी अन्यायाविरोधात लढा उभारला. स्वातंत्र्यलढ्यात मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह आणि ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेत दोन वर्षांचा कारावास भोगला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि पंडित नेहरू यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्यामुळे शाळा, महाविद्यालये, तसेच पुढे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे जाळे उभे राहिले. अण्णासाहेबांनी रोवलेले हे बीज पुढील पिढ्यांनी जोपासत मोठा विस्तार घडवून आणला.” (Devendra Fadnavis)
 
लोकांच्या मनावर राज्य करणारे ‘अजिंक्य’ नेतृत्व
 
मुख्यमंत्री म्हणाले की, “अण्णासाहेब सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आले. मात्र ‘अजिंक्य’ ही उपाधी त्यांना केवळ निवडणूक विजयांमुळे मिळालेली नाही. शिक्षण, सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य, जोडलेली माणसे आणि लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हेच त्यांच्या अजिंक्यत्वाचे खरे कारण आहे. समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे. ‘अजिंक्य’ या चरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल.” (Devendra Fadnavis)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....