काँग्रेस मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विलीनीकरण पुन्हा चर्चेत!
13-Jun-2026
Total Views |
मुंबई : (Sharad Pawar) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
"शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाचा प्रस्ताव आधीच देण्यात आला होता पण काही कारणास्तव त्याला विलंब झाला."असे वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शुक्रवार दि.१२ रोजी केले आहे. त्यानंतर पटोले लगेचच दिल्लीला रवाना झाले.पण त्यांच्या या वक्तव्याची आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा ही राजकीय घडामोडीचा केंद्रबिंदू ठरली होती.
काँग्रेसमधून बाहेर प़डलेल्या घटक पक्षांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे अशी भूमिका उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी इंडी आघाडीच्या बैठकीच्या निमीत्ताने काही दिवसांपूर्वी मांडली होती.तर रशीद आल्वी यांनी याही पुढे जाऊन देशातील सर्वच लहान पक्षांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे असे मत व्यक्त केले होते.
इकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी मात्र विलिनीकरणाचा पटोले यांचा दावा फेटाळून लावला आहे.विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकीत झाली नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र विलीनीकरणावर अतिशय सावध भूमिका मांडताना स्पष्ट उत्तर देणे टाळले आहे.
"ज्या पक्षात एकाधिकारशाही,घराणेशाही चालते जिथे सार्वजनिक स्वरुपात कोणताही निर्णय होत नाही.अशा पक्षात फार कुणी जाणार नाही."अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर बोलताना दिली. आत्ताचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा निर्णय घेताना मात्र गांधी घराण्यालाच विचारून निर्णय घेत असतात हे सांगायलाच नको.
मग उद्या एखादा स्वतंत्र निर्णय घ्यायचा असेल तर शरद पवार, ममता बॅनर्जी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा गांधी घराण्याला विचारूनच निर्णय घ्यावा लागेल का आणि तो निर्णय ते स्वतः घेऊ शकणार नाहीत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे घटक पक्षांचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल याबाबत आजतरी नुसती शक्यताच आहे.
"बुडत्या जहाजात कोण पाय ठेवणार नाही आणि कूणी पाय ठेवलाच तर त्याचा आम्हाला फायदाच आहे नुकसान नाही. आमची वेट अँड वॉचची भुमिका आहे." असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि.१२ रोजी व्यक्त केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबतच्या चर्चेवर माध्यमांनी विचारले असता आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.(Sharad Pawar)