बुलेट ट्रेन प्रकल्पात भारतात प्रथमच ‘टनेल हूड्स’ तंत्रज्ञान; बोगद्यांतील दाबलहरी आणि आवाजावर नियंत्रण;प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होणार

Total Views |
Bullet Train Project
 
मुंबई : (Bullet Train Project) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, पर्वतीय बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर भारतात प्रथमच ‘टनेल हूड्स’ बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उच्च-वेगाच्या रेल्वे संचालनासाठी महत्त्वपूर्ण मानले जाणारे हे तंत्रज्ञान बोगद्यांतील दाबलहरी आणि आवाज नियंत्रित करण्यास मदत करणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, शांत आणि आरामदायी बनविणार आहे.
 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्र आणि गुजरातमधील डोंगराळ भागातून जात असून या प्रकल्पात महाराष्ट्रातील सात आणि गुजरातमधील एका अशा एकूण आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश आहे. या सर्व बोगद्यांच्या दोन्ही टोकांवर टनेल हूड्स बसविण्यात येत आहेत.
 
उच्च-वेगाची रेल्वे बोगद्यात प्रवेश करताना तिच्यासमोरील हवेचा मोठा भाग पुढे ढकलला जातो. या प्रक्रियेमुळे बोगद्यामध्ये दाबलहरी निर्माण होतात. या दाबलहरींचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास रेल्वे बोगद्यातून बाहेर पडताना मोठा ध्वनी निर्माण होऊ शकतो. यालाच ‘टनेल बूम’ असे म्हटले जाते. टनेल हूड्स हे खुले वातावरण आणि बोगद्याच्या मर्यादित जागेमधील संक्रमण क्षेत्र म्हणून काम करत असल्याने हवेचा प्रवाह नियंत्रित राहतो आणि दाबातील अचानक होणारे बदल कमी होतात.
 
या टनेल हूड्समध्ये विशेष प्रेशर रिलीफ ओपनिंग्ज देण्यात आली आहेत. रेल्वे बोगद्यात प्रवेश करताना संकुचित झालेल्या हवेचा काही भाग या ओपनींग्ज मधून हळूहळू बाहेर पडतो. त्यामुळे दाबलहरींची तीव्रता कमी होते, टनेल बूम नियंत्रित राहतो. या तंत्रज्ञानामुळे बोगद्यातून बाहेर पडताना निर्माण होणारा आवाज कमी होणार असून परिसरातील नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल. तसेच 320 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनाला मोठी मदत मिळणार आहे. (Bullet Train Project)
 
जपान, फ्रान्स आणि इतर प्रगत देशांतील उच्च-वेग रेल्वे प्रकल्पांमध्ये टनेल हूड्सचा वापर नियमितपणे केला जातो. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे हे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच राबविले जात असून देशातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Bullet Train Project)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.