आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लॅन करा;मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या सूचना

    13-Jun-2026   
Total Views |

ashish shelar
 
मुंबई : (Aashish Shelar) पावसाळ्यात पूर परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी इंटिग्रेटेड प्लॅन तयार करुन समन्वयाने काम करा, अशा सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केल्या आहेत.
 
मुंबईतील रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा व मान्सून पुर्व कामाचा आढावा घेण्यासाठी दि. १२ जून रोजी मंत्री आशिष शेलार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मिणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे, फायर ब्रिगेडचे अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "दुर्दैवाने पूर परिस्थिती निर्माण झाली तर गर्दी होणाऱ्या रेल्वे स्टेशनमधून गर्दी बाहेर काढणे, बाहेरच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवाशांना पाणी, अन्नपदार्थ देणे या एकूण परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन तयार करा. तसेच दोन्ही प्राधिकरणाच्या सीसीटीव्ही आणि सुचना देणारी यंत्रणा, आपत्कालीन कक्ष यामध्ये समन्वय ठेवा. रेल्वे स्टेशन मधील आणि बाहेरील पादचारी पुल, वाहतूकीचे पुल, रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंग या सगळ्यांचे स्ट्रक्चरल आँडिट करा.
 
 
रेल्वे आणि महापालिका यांचे पंप यांचा ही इंटिग्रेटेड प्लँन तयार करण्यात यावा. तसेच मस्जिद बंदर आणि परिसरातील रेल्वे हद्दीत येणाऱ्या व धोकादायक ठरलेल्या २४ इमारती आणि काही झोपड्या यांचे पुनर्वसन तसेच तेथील रहिवासी याबाबतही सविस्तर अहवाल तयार करुन शासनाकडे पाठवा."
 
१६० नाले व गटारांची सफाई पूर्ण
 
पश्चिम रेल्वेने सांगितले की, पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरार या दरम्यान एकुण १५ मायक्रो टनेल रेल्वे ट्रँक खालून करण्यात आले असून या वर्षात ४ मायक्रो टनेल पूर्ण करण्यात आले आहे. तर पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्या वाढवून यावेळी १२६ पंप बसवण्यात आले आहेत. तसेच २४०० व्हॅगन इतका गाळ काढण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरही पंपाची संख्या वाढवून २२० पंप बसवण्यात आले आहेत.
 
३५० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १६० नाले व गटारांची सफाई करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कँमेरे आणि पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. यावेळी कांजूर मार्ग येथील उषा नगर नाला आणि कुर्ला येथील ब्राम्हणवाडी नाल्याच्या खोली करण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आल्याने पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. (Aashish Shelar)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....