मनोरंजनाच्या नावाखाली घृणास्पद वक्तव्य, अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही - रितू तावडे

    12-Jun-2026
Total Views |
Action Against Pranit More Show
 
मुंबई (Action Against Pranit More Show) : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या लाईव्ह शो मध्ये केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी सेजल पवार हिने केलेल्या घृणास्पद वक्तव्य प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली कोणतेही बीभत्स प्रकार, घृणास्पद वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत, असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
 
या संपूर्ण प्रकरणावर महापौर रितू तावडे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली असून, कलाकार आणि आशय निर्मात्यांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Action Against Pranit More Show)
 
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमधील ज्या दोन क्लिप्स समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत, त्यावरून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पहिल्या क्लिपमध्ये हिमांशू जागडा नामक एका व्यक्तीने एका महिलेसोबत केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाची घटना सांगितली, तर दुसऱ्या क्लिपमध्ये केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान केलेल्या पुरुषांच्या मृतदेहाविषयी अत्यंत घृणास्पद, अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. ह्या दोन्ही वेळी कॉमेडियन प्रणितने आक्षेप घेण्याऐवजी हसून दाद दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही क्लिप्समधील असंवेदनशीलतेची दखल घेत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. (Action Against Pranit More Show)
 
महापौर तावडे म्हणाल्या की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, मात्र त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली महिलांचा अवमान, अश्लीलता, घृणास्पद वक्तव्ये, बीभत्स प्रकार किंवा समाजात चुकीचा संदेश देणारा कंटेंट कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाऊ शकत नाही. महिलांविषयी, आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संवेदनशील विषयांवर सार्वजनिक मंचावर बोलताना प्रत्येकाने मर्यादा पाळल्या पाहिजेत. मुंबई ही संस्कृती, कला आणि विचार स्वातंत्र्याची नगरी आहे. परंतु, मनोरंजनाच्या नावाखाली कुणाच्याही सन्मानाला धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सर्व कलाकार, डिजिटल कंटेंट निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी आपली सर्जनशीलता जपताना समाजहित, संवेदनशीलता आणि नैतिकतेचे भान राखले पाहिजे. नागरिकांनाही सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे तसेच द्वेष, अश्लीलता आणि महिलांविरोधी मानसिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टींना कडाडून विरोध केला पाहिजे, असेही रितू तावडे यांनी या निमित्ताने आवाहन केले आहे. (Action Against Pranit More Show)