‘इंडोटेक फाऊंडेशन’च्या माध्यमातून हजारो महिला, युवक आणि विद्यार्थ्यांपर्यंत स्वावलंबनाच्या संधी पोहोचविणार्या रेश्मा शशिकांत खरात यांचा जीवनप्रवास...
समाजात अनेक व्यक्ती स्वतःच्या संघर्षावर मात करून यश संपादन करतात, तर काहीजण स्वानुभवांना समाजोपयोगी कार्याची दिशा देतात. रेश्मा यांचा प्रवास हा अशाच वाटेवरचा. लहान वयातच कुटुंबावर आलेले आर्थिक संकट, वडिलांच्या मानसिक आजारामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती आणि संपूर्ण कुटुंबाचा भार समर्थपणे सांभाळणार्या आईचा संघर्ष, या सर्वांचा त्यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला. घरातील परिस्थितीमुळे बालपणापासूनच कष्टांची ओळख झाली. शिक्षण घेत असतानाच, घरखर्चाला हातभार लावण्यासाठी विविध छोटी-मोठी कामे करावी लागली. मोठ्या भावांसोबत मिळून उदरनिर्वाहासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, या सगळ्या संघर्षात शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले नाही. आईने शिक्षणाचे महत्त्व जपले आणि त्याच संस्कारांतून समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण झाली.
शालेय शिक्षण घेत असतानाच, रेश्मा यांनी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ देताना समाजातील महिलांची आर्थिक परावलंबित्वाची स्थिती, युवकांमधील बेरोजगारी आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या अभावामुळे निर्माण होणार्या समस्या त्यांना जवळून पाहता आल्या. महिलांना आणि युवकांना रोजगारक्षम बनविल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येणार नाही, ही जाणीव त्यातून अधिक दृढ झाली. याच विचारातून पुढे ‘इंडोटेक फाऊंडेशन’ची स्थापना झाली. सुरुवातीपासूनच संस्थेने महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मिती या विषयांना प्राधान्य दिले. महिलांसाठी बचत गट उभारणे, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, शैक्षणिक साहित्याचे वितरण, रोजगार मेळावे घेणे आणि विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे काम सुरू झाले.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, शहापूर, मुरबाड, रायगड, नाशिक आणि इतर भागांमध्ये संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायती, शासकीय विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हजारो महिला आणि युवकांपर्यंत कौशल्याधारित प्रशिक्षण पोहोचविण्यात आले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विविध सामाजिक दायित्व निधीच्या सहकार्याने रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात आले. रोजगार मेळावे आणि मुलाखत शिबिरांच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. महिलांसाठी, युवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, रोजगार मेळावे, मार्गदर्शन शिबिरे, जनजागृती उपक्रम, तृतीयपंथीयांसाठी विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना साहित्य वाटप, दिव्यांगांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
रेश्मा खरात यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुयातील कोनगाव, पिंपळास, पिंपळनेर, गोवे, अंजूर, दिवे-अंजूर, कोपर, केवणी-दिवे, काल्हेर, पूर्णा, आवळे, खारबाव, कांबे आणि खानिवली या ग्रामपंचायतींमध्ये १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. ब्युटीपार्लर, शिवणकला, नेल आर्ट, केक मेकिंग, फास्ट फूड, ज्वेलरी मेकिंग, ब्रोच मेकिंग आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या विविध विषयांमध्ये हजारो महिला आणि मुलींना प्रशिक्षण देण्यात आले.
विशेष म्हणजे, शहरी भागांपुरते काम मर्यादित न ठेवता शहापूर, मुरबाडसारख्या आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागांमध्ये जाऊन प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. अनेक महिलांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करण्यात आले, तर अनेक युवकांना रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. कौशल्य आणि रोजगार यांच्यातील दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेच्या विविध उपक्रमांतून सातत्याने दिसून येतो.
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या कार्यातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. कौशल्य, शिक्षण आणि स्वावलंबन यांच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा प्रयत्न ‘इंडोटेक फाऊंडेशन’च्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी आणि समाजातील गरजू घटकांना स्वावलंबनाची दिशा देण्यासाठी रेश्मा खरात आणि ‘इंडोटेक फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेल्या या समाजोपयोगी उपक्रमास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने शुभेच्छा!