फुटबॉल विश्वचषका’च्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहीत आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमरगाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात.
आज त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. ‘मुंबई तरुण भारत’चा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या ‘प्रेस बॉक्स’मधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे.
जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे, हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण, यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. ‘मुंबई तरुण भारत’ला विश्वचषकाचे अधिकृत ‘अॅक्रिडिटेशन’ मिळाले आहे आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे.
हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल, कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून मराठी मनांपर्यंत पोहोचणार्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण, हा केवळ ‘विश्वचषक’ नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे.
- संदीप चव्हाण