नवी दिल्ली (Shraddha Walkar Case Update): मे २०२२ मध्ये आफताबने श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून ते मेहरोलीच्या जंगलात फेकले होते. तीच्या हत्याकांडातील खटल्यात गुगल, व्हॉट्सअॅप, बंबल, जीमेल आणि हॉपर यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टेक कंपन्यांच्या नोडल अधिकार्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. हे अधिकारी अमेरिका, ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडमध्ये राहतात. २०२१ च्या जुन्या नियमांमध्ये परदेशी साक्षीदाराची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यापूर्वी आरोपीची संमती घेणे बंधनकारक होते.
आरोपी आफताबच्या वकिलांनी याच मुद्द्याचा आधार घेत साक्षीदारांच्या साक्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार विरोध केला होता. मात्र, नवीन २०२५ च्या नियमांमधून आरोपीच्या संमतीची ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे श्रद्धाच्या हत्याकांडाच्या खटल्याला गती मिळणार आहे. न्यायालयाने या बदलाला मोठा कायदेशीर बदल म्हटले आहे. या खटल्यादरम्यान ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या नवीन नियमांची चर्चा सुरू झाली आहे. या नवीन नियमांमुळे श्रद्धा वालकर खटल्यासह इतर प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांचा निकाल जलद गतीने लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Shraddha Walkar Case Update)
या खटल्यामध्ये श्रद्धा वालकर तपास अधिकारी इन्स्पेक्टर राम सिंग यांनी या परदेशी अधिकार्यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यासाठी न्यायालयात अर्ज केले होते. हे अर्ज गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते. विशेष सरकारी वकील मधुकर पांडे यांनी युक्तिवाद केला की, या आंतरराष्ट्रीय साक्षीदारांना भारतात प्रत्यक्ष बोलावणे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे आणि यामुळे खटल्याचा निकाल लागण्यास खूप उशीर होईल. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरगुरवरिंदर सिंग जग्गी यांनी १ जून रोजी जुने अर्ज फेटाळले, परंतु पोलिसांना नवीन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियम, २०२५ अंतर्गत नवीन अर्ज सादर करण्याची मुभा दिली. त्यामुळे आता या खटल्यातील परदेशी साक्षीदारांची साक्ष ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेता येणार आहे.(Shraddha Walkar Case Update)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.