पर्यावरणाच्या खऱ्या रक्षकांचा सन्मान

    12-Jun-2026
Total Views |

Honouring Environmental Warriors at SFC Environmental Awards 2026
 
‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’ने आयोजित केलेल्या ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल अ‍ॅवॉर्ड फॉर स्पिसीज अ‍ॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स - २०२६’ हा भव्य पुरस्कार सोहळा सोमवार, दि. ८ जून रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात रंगला. यावेळी अनेक मान्यवरांनी पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. त्याची काही क्षणचित्रे...
 
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 'SFC Environmental Awards - Species Habitats Warriors २०२६’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नव्हता, तर पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य झोकून देणार्‍या व्यक्ती आणि संस्थांप्रति समाजाने व्यक्त केलेली कृतज्ञता होती. विविध वयोगटांतील, विविध क्षेत्रांतील आणि विविध स्तरांवर काम करणार्‍या व्यक्तींना त्यांच्या योगदानासाठी गौरविण्यात आले. काहींनी वन्यजीव संरक्षणासाठी काम केलं होतं, काहींनी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी, काहींनी जनजागृतीसाठी, तर काहींनी संशोधन आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे पर्यावरणरक्षणात मोलाची भूमिका बजावली होती.
 
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची दर्जेदार मांडणी. राज्यातील मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वनविभागातील मान्यवर अधिकारी, पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ यांची उपस्थिती लक्षणीय होती. अनेकदा आपण पाहतो की, पर्यावरणविषयक विषयांना समाजात दुय्यम स्थान दिलं जातं; परंतु या कार्यक्रमात शासन, प्रशासन आणि समाज या तिन्ही घटकांचा सहभाग पाहून आशादायक चित्र दिसलं. विशेष म्हणजे, कार्यक्रमातील प्रत्येक उपस्थित व्यक्तीला अतिथी म्हणून सन्मानाने वागणूक दिली जात होती. स्वागतापासून ते कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीत आदर, शिस्त आणि आपुलकी जाणवत होती. एखाद्या विषयाचा सन्मान करायचा असेल, तर त्या विषयासाठी काम करणार्‍या लोकांचा सन्मान प्रथम करावा लागतो, याची जाणीव आयोजकांना असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. या कार्यक्रमात मनोरंजनालाही स्थान होतं; पण ते केवळ करमणुकीसाठी नव्हतं. सांस्कृतिक सादरीकरणे आणि कलाविष्कार यांमधूनही निसर्ग, पर्यावरण आणि वनसंवर्धन यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचत होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हा ज्ञान, प्रेरणा आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरला. कार्यक्रम अनुभवताना एक विचार सतत मनात येत होता. आपल्या संतपरंपरेतील काही प्रसंग आजही समाजाच्या स्मरणात का आहेत? सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून घेणे, चालती भिंत अशा कथा केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक घटना म्हणून महत्त्वाच्या नाहीत. त्या समाजाच्या मनावर झालेल्या परिणामामुळे अमर झाल्या आहेत. त्यांनी लोकांच्या विचारांना दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य असल्याचा विश्वास निर्माण केला.
 
अशाच प्रकारे या पुरस्कार सोहळ्याचाही समाजावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. कारण प्रत्येक सन्मानित व्यक्ती ही एक प्रेरणादायी कथा असते. अनेक तरुणांना कदाचित आजपर्यंत पर्यावरण क्षेत्रात करिअर किंवा कार्याची संधी दिसत नसेल; पण अशा कार्यक्रमांमधून त्यांना आदर्श मिळतात. समाजाला हे जाणवतं की पर्यावरणासाठी केलेलं कार्य महत्त्वाचं आहे; त्याची दखल घेतली जाते आणि त्याचा सन्मान होतो. या उपक्रमामागे असलेल्या दै. ‘मुंबई तरुण भारत’चे तरुण संपादक किरण शेलार आणि पर्यावरण विषयाचे पत्रकार अक्षय मांडवकर आणि त्यांच्या संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करावे लागेल. त्यांनी केवळ एक कार्यक्रम आयोजित केला नाही, तर पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या शेकडो लोकांच्या कार्याला समाजासमोर आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे.कौतुक ही माणसाची मूलभूत गरज आहे. योग्य वेळी केलं गेलेलं कौतुक एखाद्या व्यक्तीला अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देतं. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी मंडळी अनेकदा आर्थिक लाभ, प्रसिद्धी किंवा सत्तेच्या अपेक्षेने काम करत नाहीत. त्यांना प्रेरणा मिळते, ती निसर्गावरील प्रेमातून. अशा वेळी समाजाकडून मिळणारा सन्मान हा त्यांच्या कार्याचा खरा मोबदला ठरतो. समाज ज्या गोष्टीचं कौतुक करतो, त्या गोष्टी वाढतात. पर्यावरण संवर्धन वाढाव, असं वाटत असेल, तर निसर्गासाठी झटणार्‍या माणसांचा गौरव होत राहणं ही काळाची गरज आहे
 
- नंदकुमार पटवर्धन