हिंदूंच्या स्वाभिमानाचा जागतिक विजय

    12-Jun-2026
Total Views |

 Modi Referred To The
 
परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या ‘हिंदू ग्रोथ रेट’ या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश करत देशाला कमी लेखण्याच्या त्यांच्या देशविघातक षड्यंत्रावर सणसणीत प्रहार केला. पण, एकेकाळी प्रचंड घोटाळे आणि महागाईत खितपत पडलेली भारतीय अर्थव्यवस्था, आजच्या काळात मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या सुशासनामुळे जगातील सर्वांत वेगाने वाढणारी महासत्ता ठरली आहे, ती याच बहुसंख्य हिंदूंमुळे!
 
काँग्रेसने स्वतःच्या अपयशाचे खापर हिंदूंच्या माथी फोडण्यासाठी देशाच्या संथ विकासाला ‘हिंदू ग्रोथ रेट’ असे नाव दिले. हा केवळ देशाचा नाही, तर संपूर्ण हिंदू-परंपरेचा घोर अपमान होता आणि आज तोच भारत जगाला दिशा दाखवत आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसी मानसिकतेचा खरपूस समाचार घेतला. जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर, ‘रालोआ’च्या बैठकीत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या अपयशावर नेमकेपणाने कठोर शब्दांत प्रहार केला. अपयश काँग्रेसचे होते; पण दोष हिंदूंवर होता. त्याला ‘काँग्रेसचा विकासदर’ असे म्हणायला हवे होते असे म्हणत, ‘हिंदू ग्रोथ रेट’ या काँग्रेसी संकल्पनेवर त्यांनी घणाघात केला. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या आणि विशेषतः हिंदूंच्या माथी मारल्या गेलेल्या एका अत्यंत खोट्या आणि अपमानजनक आख्यायिकेचा समाचार घेतला. मोदींच्या या भाषणाचा अन्वयार्थ काढायचा झाल्यास, तो वसाहतवादी मानसिकतेविरुद्ध पुकारलेला भारताच्या स्वाभिमानाचा हुंकार होता. या संपूर्ण भाषणाच्या केंद्रस्थानी होता तो, ‘हिंदू ग्रोथ रेट’! स्वातंत्र्यानंतर अनेक दशके भारताचा आर्थिक विकासदर अवघ्या साडेतीन टक्क्यांच्या आसपास रेंगाळत होता. काँग्रेसच्या तत्कालीन समाजवादी, भोंगळ आणि उद्योगविरोधी आर्थिक धोरणांचे ते अपयश होते. मात्र, आपल्या धोरणांचे हे अपयश झाकण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या डाव्या ‘इकोसिस्टम’ने अत्यंत चलाखीने या संथ विकासाला ‘हिंदू ग्रोथ रेट’ असे नाव दिले.
 
हिंदूंना आणि भारताच्या प्रगतीला हिणवण्यासाठी वापरला गेलेला हा शब्दप्रयोग म्हणजे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच होते. हिंदू धर्म, हिंदूंची मानसिकता आणि हिंदूंची संस्कृतीच मुळात मागासलेली आहे, त्यांच्यात पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा नाही आणि म्हणूनच भारताचा विकास होत नाही, असे खोटे चित्र जागतिक पातळीवर उभे करण्याचे हे जाणीवपूर्वक रचलेले काँग्रेसी कारस्थान होते. स्वतःच्या सरकारचा ‘धोरणलकवा’ आणि नाकर्तेपणाचे खापर बहुसंख्य हिंदू समाजाच्या जीवनपद्धतीवर फोडून काँग्रेसने देशाचा आणि हिंदूंचा जो जागतिक अपमान केला, त्याचा हिशोब मोदींनी आपल्या भाषणातून पुराव्यांसहित चुकता केला. आज तीच हिंदू बहुसंख्य असलेली जनता आणि तीच प्राचीन हिंदू-संस्कृती भारताला जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवत आहे, हे मोदींनी संपूर्ण जगाला अतिशय ठणकावून सांगितले.
 
काँग्रेसच्या काळातील देशाची आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक भरारी यांची केवळ आकडेवारीच्या आधारे तुलना केल्यास जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो. काँग्रेसचा २००४ ते २०१४ हा कालखंड केवळ आणि केवळ महाघोटाळ्यांनी गाजला. ‘टू-जी’ घोटाळा, कोळसा घोटाळा, ‘राष्ट्रकुल’ घोटाळा अशा लाखो कोटींच्या भ्रष्टाचाराने देशाची अर्थव्यवस्था आतून पोखरून काढली होती. त्याकाळात महागाईचा दर अनेकदा दोन अंकी म्हणजेच, दहा ते १२ टक्क्यांच्या घरात राहिला आणि बेरोजगारीने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले. विदेशी गुंतवणूकदारांनी धोरणशून्य भारताकडे पाठ फिरवली होती आणि देशाला जगातील पाच सर्वांत कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये गणले जाऊ लागले होते. याउलट, मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कालखंडात भारताने कमकुवत अर्थव्यवस्थांमधून थेट जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये अभिमानास्पद झेप घेतली आहे.
 
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचा ढोंगीपणा उघडा पाडला. काँग्रेसच्या काळात महागाई वाढायची, तेव्हा जागतिक परिस्थितीचे कारण देऊन काँग्रेसचे नेते जनतेला वार्‍यावर सोडून हात झटकत असत. जागतिक मंदी आहे, आम्ही काय करणार? असा त्यांचा युक्तिवाद असायचा. तथापि, आज जगात महाभयंकर युद्धे आणि संकटे असतानाही, भाजप सरकारने आपल्या अचूक धोरणात्मक निर्णय क्षमतेतून देशातील जनतेला महागाईच्या खाईत लोटले नाही. आज जागतिक पातळीवर नजर टाकल्यास आर्थिक अस्थिरता दिसून येते. महामारी, त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध आणि आता पश्चिम आशियातील संघर्ष यामुळे जगभरातील पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे. अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीसारख्या प्रगत आणि विकसित देशांमध्ये आज मंदीचे सावट आहे आणि तिथली महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे.
 
अशा या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक संकटकाळातही भारतीय अर्थव्यवस्था का आणि कशी तग धरून आहे, हा संपूर्ण जगासाठी एक मोठा अभ्यासाचा विषय ठरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, मोदी सरकारने राबवलेली दूरदृष्टीची धोरणे आणि घेतलेले धाडसी निर्णय. पाश्चात्त्य जगाने मंदीच्या भीतीने नोटा छापून लोकांच्या हातात फुकटचे पैसे दिले, तेव्हा भारताने पायाभूत सुविधांवर आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. महामार्गांचे अफाट जाळे, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि नवीन विमानतळांची बांधणी यामुळे अर्थव्यवस्थेत रोजगार आणि गती दोन्ही निर्माण झाले. ‘मेक इन इंडिया’, ‘पीएलआय’ योजना आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारख्या धोरणांमुळे देशांतर्गत उत्पादनाला प्रचंड चालना मिळाली. ‘यूपीआय’ प्रणालीमुळे भारतात जी ‘डिजिटल क्रांती’ झाली आहे, ती पाहून अमेरिका आणि युरोपही अचंबित झाला आहे.
 
‘जीएसटी’च्या विक्रमी संकलनामुळे सरकारी तिजोरी भक्कम झाली असून, विदेशी गंगाजळीने आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. बँकांमधील थकीत कर्जांचे प्रमाण नीचांकी पातळीवर आले असून, बँका नफ्यात आल्या आहेत. आज भारताचा विकासदर सात ते आठ टक्क्यांच्या घरात आहे, जो जगातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. थेट विदेशी गुंतवणुकीत झालेली अभूतपूर्व वाढ, शेअर बाजाराने गाठलेले नवनवीन उच्चांक आणि गेल्या दहा वर्षांत गरिबी रेषेखालून बाहेर आलेल्या २५ कोटी भारतीयांची आकडेवारी, या सर्व घडामोडी भारताची अर्थव्यवस्था केवळ सुदृढच नाही; तर ती संपूर्ण जगाच्या विकासाचे ‘इंजिन’ बनली असल्याचा स्पष्ट अर्थ दर्शवतात. हिंदूंच्या प्रगतीला ‘हिंदू ग्रोथ रेट’ म्हणून हिणवणारी ती वसाहतवादी आणि काँग्रेसी मानसिकता आता कायमची गाडली गेली आहे. आज भारताच्या अर्थव्यवस्थेत जो वेग, जो उत्साह आणि जो आत्मविश्वास दिसून येत आहे; तो खर्‍या अर्थाने या प्राचीन संस्कृतीच्या नव्या उत्थानाचा साक्षात पुरावा आहे. हे यश आकडेवारीपुरते मर्यादित नाही, तर हा भारताच्या आणि प्रत्येक हिंदूच्या स्वाभिमानाचाच तो जागतिक विजय आहे.