काँग्रेसचे ‘हात’ दाखवून अवलक्षण

    12-Jun-2026
Total Views |

 Internal infighting within the Congress in Maharashtra 
 
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पाहता, आधीच गलितगात्र झालेल्या या पक्षाने ‘हात दाखवून अवलक्षण’ ओढावून घेतले. विरोधकांशी लढण्याऐवजी काँग्रेसने पक्षातील नेते एकमेकांशीच लढण्यात मशगूल आहेत. पुण्यात पक्षाचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. कारण, रणांगण जरी विधान परिषद निवडणुकीचे असले, तरी काँग्रेस युद्धभूमीत उतरलाच नाही तर कसे चालणार, असे म्हणत अरविंद शिंदे यांनी सपकाळ यांची तक्रार थेट दिल्लीपर्यंत केली आहे. सत्ता नसतानादेखील काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण उफाळून आले. पुण्यात ‘मविआ’त काँग्रेसकडे परिषदेच्या दृष्टीने मतदान जास्त होते. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी मिळवली. पण, नंतर माघार घेतली. यावर नाराज शिंदेंनी, कोणत्या नेत्यांनी काँग्रेसच्या हिताशी तडजोड केली? असा प्रश्न विचारला आहे. मध्यंतरी तर काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्यावरदेखील पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली होती. यातूनच पुण्यात ‘काँग्रेस कार्यकर्ते’ या नावाने एक बॅनर लावले होते, ज्यात ‘आमचं ठरलंय, कोल्हापूरचे पार्सल कोल्हापूरला पाठवायचे’ असा मजकूर लिहिला होता. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख चार-पाच दिवस काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नव्हते, असे बोलले जात असतानाच आता ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यानंतर मात्र माजी आमदार यशोमती ठाकूर आणि हर्षजीत देशमुख यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
 
सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत दोन ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली असून, काँग्रेस मात्र राज्यात नेतृत्व करण्याच्या गप्पा मारत आहे. शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांना माघार घेणार्‍या उमेदवारांचे निलंबन करण्याची वेळ आली. नागपूर ग्रामीणमध्येदेखील काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष जोरात होता. यातूनच सहा महिन्यांपूर्वी माजी महासचिव मुजीब पठाण यांनी माजी मंत्री सुनील केदार यांची तक्रार राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली होती. तसेच काँग्रेसच्या २२१ पदाधिकार्‍यांनी राजीनामेदेखील सादर केले होते. एकंदरच, दुसर्‍याकडे बोट दाखवण्यापूर्वी राज्यातील काँग्रेस पक्षातूनच ‘हात’ मात्र एकमेकांवरच आरोप करत आहेत, हे दुर्दैवीच!
 
काँग्रेसचा घटकपक्षांवर डोळा
 
काही दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीतील प्रमुख पक्षांची बैठक पार पडली. त्यात सत्तेशिवाय मजबूर झालेल्या काँग्रेसने अनोखी शक्कल लढवत घटकपक्षांवरच आता डोळा ठेवून, एक नवीन प्रस्ताव त्यांच्यासमोर सादर केला.
 
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच देशातील लहान पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे उसने अवसान काँग्रेसने आणले. एकीकडे भाजपवर लहान पक्ष संपवण्याचा आरोप करणारी काँग्रेस स्वतः मात्र लहान पक्षांनी आमच्यात विलीन व्हावे, असे सांगून स्वतःचा स्वार्थ साधते आहे, असे म्हटले; तर वावगे ठरणार नाही. सत्ता येत-जात असते. पण, सत्ता गेली म्हणून सरळ आमच्यात विलीन व्हा, असे म्हणणे नैतिकतेला धरून आहे का? यात पुढे होते ते ‘उबाठा’चे संजय राऊत आणि काँग्रेसचे रशीद अल्वी. संजय राऊत ‘उबाठा’चे कमी आणि हल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जास्त वाटतात, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला तो योग्यच. काँग्रेस सत्तेत असताना घटकपक्षांसाठी किती घातक होती, हे तेव्हा सर्वांनी अनुभवले. पक्षातील ‘किचन कॅबिनेट’ला कंटाळूनच अनेकांनी तेव्हा वेगळी वाट धरली होती. ममता बॅनर्जींनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यास त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. मुळात काँग्रेसमध्ये फक्त एकच घराण्याचे चालते, ते म्हणजे गांधी. त्यामुळेच विद्यमान अध्यक्ष खर्गे यांना पक्षात किती अधिकार आहेत, हे जगजाहीर. मग, ममता बॅनर्जींना उपाध्यक्ष म्हणून काय अधिकार असणार, हे न सांगितलेलेच बरे. संजय राऊतांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ‘भाजपची बी टीम’ म्हणून संबोधले होते आणि आता तेच राऊत मात्र, शरद पवार यांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे सांगत असतील; तर ‘उबाठा’ हीच ‘काँग्रेसची बी टीम’ आहे का? असा प्रश्न पडतो. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देश आणि विविध राज्यपातळीवर सलग पराभव पाहिल्यानंतर, काँग्रेसनेच एखाद्या घटकपक्षाकडे राष्ट्रीय नेतृत्व सोपवावे, अशी अवस्था असताना काँग्रेस मात्र संधीचा फायदा घेऊन घटकपक्षांसमोर उसने अवसान आणत आहे, असेच म्हणावे लागेल.
 
- अभिनंदन परूळेकर