मुंबई (ST Meeting Ends Chaos Padalkar Khot) : एसटी महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा बोलावण्यात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला. गुरुवार, दि.११ जून रोजी आयोजित या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना बैठकीतून बाहेर काढण्याची मागणी केली. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पडळकर आणि खोत यांनी एसटी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. “भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. उलट जास्त भ्रष्टाचार करणाऱ्यांना बढती मिळते आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना बाजूला केले जाते,” असा आरोप त्यांनी केला.(ST Meeting Ends Chaos Padalkar Khot)
कामगारांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा होते, पण निर्णय होत नाहीत, अशी टीका करत त्यांनी मंत्र्यांच्या आदेशांनाही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचा दावा केला. “एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. जे कर्मचारी व्यवस्थापनाविरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशा पोकळ बैठकीत बसून काहीही साध्य होणार नाही,” असे ते म्हणाले.(ST Meeting Ends Chaos Padalkar Khot)
एसटीच्या मालमत्तांच्या विक्रीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एसटीच्या जागा विकून खाल्ल्या जात आहेत. आता संडास-बाथरूम तेवढे विकायचे बाकी आहेत. ते तरी प्रवाशांसाठी सोडा,” अशी बोचरी टीका करत पडळकर आणि खोत यांनी बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.(ST Meeting Ends Chaos Padalkar Khot)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.