एसटी प्रवासात सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक!

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक

Total Views |

 NCMC Card Mandatory Travel
 
मुंबई (NCMC Card Mandatory Travel) : राज्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सवलती आणि विविध सेवांचा लाभ अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे.
 
 
 
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आजतागायत सुमारे ५१ लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास २५ लाख कार्ड कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांकडून या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात नागरिकांच्या सोयीसाठी ४ हजारांहून अधिक एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे कार्ड वितरण आणि नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू असून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरात लवकर कार्ड प्राप्त करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(NCMC Card Mandatory Travel)
 
दरम्यान, कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ज्या वितरण केंद्रांकडून शासनाने निश्चित केलेल्या विहित किंमतीपेक्षा जास्त दराने एनसीएमसी स्मार्ट कार्डची विक्री केली जात असल्याचे आढळून येईल, त्या केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर एकाच कार्डद्वारे करता येणार असून तिकीट व्यवस्थापन अधिक सुलभ होणार आहे. दि. १ ऑगस्टपूर्वी पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी व कार्ड सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.(NCMC Card Mandatory Travel)




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.