नागपूर (Nagpur Koradi Lake Tourism Project) : नागपूरजवळील कोराडी येथील महाजेनकोच्या २७२ हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावाचे शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कोराडी येथील तलाव परिसराची पाहणी केल्यानंतर महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. मागील वीस वर्षांपासून तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि गाळ साचल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले होते. यामुळे तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक योजना तयार करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.(Nagpur Koradi Lake Tourism Project)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तलाव एमएमआरडीएकडे सुपूर्द केला असून, तलावाच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरडीएकडे राहणार आहे. महाजेनकोकडून वीज निर्मितीसाठी या तलावातील पाण्याचा वापर सुरूच राहणार असून, वापरानंतरचे पाणी पुन्हा तलावात सोडले जाणार आहे.(Nagpur Koradi Lake Tourism Project)
तलावाच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नीरी (NEERI) संस्थेच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. भविष्यात तलावात पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. तलाव परिसरात हाउसबोट्स, रेस्टॉरंट्स, बोटिंग सुविधा तसेच बोटीच्या माध्यमातून हनुमान मंदिराचे दर्शन घेता येईल, अशा पर्यटनविषयक सुविधा उभारण्याची योजना आहे.
याच परिसरात उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीचे लवकरच लोकार्पणही लवकरच करण्यात येणार आहे. बेससह १९१ फूट उंचीची ही मूर्ती असून, प्रत्यक्ष मूर्तीची उंची १६३ फूट आहे. ही मूर्ती लवकरच सर्वसामान्य भाविक आणि पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.(Nagpur Koradi Lake Tourism Project)
नागपूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात वॉटर स्पोर्ट्स, स्कायवॉक आणि अन्य पर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, भविष्यात हे ठिकाण विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Nagpur Koradi Lake Tourism Project)