मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमध-स्तस्य तदधो
हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम्|
स सद्यः सङ्क्षोभं नयति वनिता इत्यतिलघु
त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तनयुगाम्॥१९॥
शब्दशः विचार केला असता, हा श्लोक देवीच्या विराट स्थूल स्वरूपाचे वर्णन करतो. देवीचे मुखकमल हे जर आपण एक बिंदू मानले, आणि तिच्या मस्तकी विराजमान असलेली चंद्रकोर त्या बिंदूला आच्छादित करणार्या कमानीच्या स्वरूपात कल्पिली, त्या बिंदूखालील दोन बिंदू देवीचे स्तनद्वय मानले, तर या त्रिबिंदूंच्या रचनेत कामकलेचे स्वरूप प्रकट होते. त्याखालील ‘हरार्ध’ म्हणजे अर्धनारीनटेश्वरातील शिवांश, अर्थात देवीचे अधोरूप. अशा प्रकारे संपूर्ण आकृतीचे चिंतन केल्यास, साधकाला कामकला स्वरूपाचे दर्शन घडते. दुसर्या शब्दांत सांगायचे, तर ‘ईं’ या कामकला बीजाचे हे स्थूल विश्वरूपातील वर्णन आहे.
परंतु, हे वर्णन केवळ मानवी देहाच्या मर्यादेत समजून चालणार नाही. येथे आचार्यांनी देवीच्या विराट स्वरूपाची कल्पना केली आहे. या विराट स्वरूपात देवीचे स्तनद्वय म्हणजेच, सूर्य आणि चंद्र अशी भावना आहे. सूर्य आणि चंद्र हे केवळ भौतिक ग्रह नसून, ज्ञानप्रवाहाची दोन वैश्विक माध्यमे आहेत. चंद्र आपल्या षोडश कलांच्या रूपाने आणि सूर्य आपल्या द्वादश आदित्यस्वरूपाने विश्वात प्रकाश, चेतना आणि ज्ञानाचे संचार करीत असतात. जर सूर्य आणि चंद्र हे देवीचे स्तनद्वय असतील, तर त्यांच्यामधील मुखकमलस्थ बिंदू हा अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. वैदिक आणि तांत्रिक परंपरेमध्ये अग्नि हा केवळ भौतिक अग्नि नसून, ज्ञानाचा आद्य वाहक मानला जातो. देवता आणि मानव यांच्यामधील दुवा म्हणून अग्नीचे वर्णन वेदांमध्ये वारंवार आढळते. ईश्वराकडून प्रवाहित होणारे दिव्य ज्ञान, मानवापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अग्नितत्त्व करते. यामुळे कामकला बीजाच्या ध्यानाचा अधिक सूक्ष्म अर्थ उलगडतो. ‘ईं’ या बीजाचे ध्यान करणे, म्हणजे केवळ एखाद्या आकृतीचे चिंतन करणे नव्हे, तर सूर्य, चंद्र आणि अग्नि या ज्ञानाच्या त्रिविध स्रोतांचे एकात्म स्वरूप म्हणून देवीचे ध्यान करणे होय. त्या क्षणी साधक आपल्या मर्यादित बुद्धीच्या पलीकडे जाऊन, वैश्विक चेतनेतून प्रवाहित होणारे परमज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करीत असतो.
याच संदर्भात आचार्य पुढे एका अत्यंत सुंदर आलंकारिक उपमेचा उपयोग करतात. अज्ञानी साधकाला परमज्ञानाची अनुभूती काय असते, हे प्रत्यक्ष सांगणे अशय असल्याने ते लौकिक सुखाच्या उदाहरणाचा आधार घेतात. एखादी अत्यंत रूपवती स्त्रीसाधकावर मोहित होऊन त्याच्या दर्शनासाठी आतुर होते, ही कल्पनाच सामान्य मनुष्याला सहज समजू शकते. परंतु, हे वर्णन प्रत्यक्ष स्त्रीवशीकरणाचे नव्हे; तर परमशक्ती साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या अंतःकरणात प्रकट होण्याचे प्रतीक आहे. आचार्य याच उपमेचा विस्तार करीत म्हणतात की, जिचे स्तनद्वय सूर्य आणि चंद्र आहेत, अशी स्वयं श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच साधकावर प्रसन्न होते. तिच्या कृपेने साधकामध्ये असे तेज, असे आकर्षण आणि असे चैतन्य जागृत होते की, त्याच्या अस्तित्वानेच त्रैलोय चलबिचल होऊ शकते. येथे ‘चलबिचल’ हा शब्द बाह्य जगाला वश करण्याच्या अर्थाने नसून, संपूर्ण सृष्टीच्या चेतनेशी एकरूप होण्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा निर्देश करतो. अशा प्रकारे कामकला बीज ‘ईं’ हे केवळ त्रिबिंदूंचे तांत्रिक चिन्ह नसून सूर्य, चंद्र आणि अग्नि या त्रिविध ज्ञानशक्तींच्या ऐयाचे प्रतीक आहे. त्याचेच ध्यान म्हणजे, विश्वव्यापी ज्ञानप्रवाहाशी स्वतःला जोडण्याचा आणि देवीच्या परमचैतन्याशी एकरूप होण्याचा मार्ग होय.
श्रीविद्या साधनेमध्ये ‘ईं’ हे बीज अत्यंत गूढ, रहस्यमय आणि उच्च कोटीचे मानले जाते. सामान्यतः श्रीविद्येतील ‘ऐं’, ‘ह्रीं’, ‘श्रीं’ ही बीजे प्रसिद्ध असली, तरी ‘ईं’ हे बीज त्यांच्या मागील मूळ शक्तीचे प्रतिनिधित्व करते. अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये याला ‘कामकला बीज’ असे संबोधले जाते. काम म्हणजे इच्छा, संकल्प किंवा सर्जनाची प्रेरणा आणि कला म्हणजे, त्या इच्छेचे व्यक्त होण्याचे सामर्थ्य. त्यामुळे कामकला म्हणजे सृष्टीच्या निर्मितीमागील आद्य प्रेरणा आणि तिचे अभिव्यक्तीस्वरूप. परब्रह्म जेव्हा पूर्णतः निर्विकल्प, निष्क्रिय आणि निराकार अवस्थेत असते, तेव्हा कोणतीही सृष्टी अस्तित्वात नसते. परंतु त्या परब्रह्मामध्ये जेव्हा ‘बहुस्याम् प्रजायेय’ अर्थात ‘मी अनेक होईन’ असा सूक्ष्म संकल्प उदयास येतो, तेव्हाच निर्माण होणारी पहिली शक्तिस्पंदना म्हणजे कामकला होय. हीच आदिशक्ती, हीच त्रिपुरसुंदरी, हीच ललिता महात्रिपुरसुंदरीचे सूक्ष्मतम स्वरूप आहे.
‘ईं’ या बीजातील ‘दीर्घ ई’ हा ध्वनी अत्यंत महत्त्वाचा आहे. संस्कृत वर्णमालेत ‘इ’ हे ज्ञानशक्तीचे प्रतीक मानले जाते. त्याचे विस्तारित, पूर्णत्वप्राप्त स्वरूप म्हणजे ‘ई.’ म्हणून ‘ईं’ हे केवळ ज्ञान नव्हे, तर ज्ञान, इच्छा आणि क्रिया या तिन्ही शक्तींच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. श्रीविद्या परंपरेत असे मानले जाते की, संपूर्ण विश्वाची निर्मिती या एका सूक्ष्म स्पंदनातून झाली आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून कामकलेचे स्वरूप तीन बिंदूंनी दर्शविले जाते. हे तीन बिंदू सूर्य, चंद्र आणि अग्नी; तसेच इच्छा, ज्ञान आणि क्रिया; तसेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. या त्रिबिंदूंच्या संयोगातून निर्माण होणारा त्रिकोण म्हणजेच कामकला. म्हणूनच श्रीचक्रातील अंतर्गत त्रिकोण हा कामकलामय मानला जातो. हा त्रिकोण सृष्टीच्या उत्पत्तीचा मूलाधार आहे. ललिता सहस्रनामामध्ये देवीला कामकलारूपा, कामकलात्मिका अशी नावे दिली आहेत. याचाच अर्थ देवी स्वतःच कामकलेचे स्वरूप आहे. ती केवळ सृष्टीची निर्माती नसून निर्मितीची प्रेरणा, प्रक्रिया आणि परिणाम या तिन्ही स्वरूपांत कार्यरत असते. त्यामुळे ‘ईं’ हे बीज जपताना, साधक प्रत्यक्ष देवीच्या सर्जनशक्तीशी संपर्क प्रस्थापित करीत असतो.
आध्यात्मिक साधनेमध्ये ‘ईं’ बीजाचे आणखी एक महत्त्व आहे. सामान्य माणसामध्ये काम हा शब्द प्रामुख्याने इंद्रियभोगाशी जोडला जातो. परंतु, तंत्रशास्त्रात काम म्हणजे सर्जनाची इच्छा, उत्क्रांतीची प्रेरणा आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची आकांक्षा. जेव्हा ही इच्छा शुद्ध होते, तेव्हा ती कामकला बनते. म्हणून ‘ईं’ बीज साधकाच्या वासनांचे रूपांतर आध्यात्मिक ऊर्जेमध्ये करण्याची क्षमता ठेवते. योगशास्त्रीय दृष्टीने पाहिले, तर ‘ईं’ बीज आज्ञाचक्र आणि सहस्रार यांच्यामधील सूक्ष्म शक्तीला जागृत करते, असे मानले जाते. हे बीज साधकाच्या अंतःकरणातील सुप्त सर्जनशक्ती, अंतर्ज्ञान आणि दिव्य प्रज्ञा प्रकट करते. अनेक श्रीविद्या साधकांच्या अनुभवामध्ये या बीजाच्या उपासनेमुळे ध्यानातील सूक्ष्मता, मंत्रसिद्धीची क्षमता आणि देवीप्रति अखंड भक्तिभाव वाढतो, असे वर्णन आढळते. ‘ईं’ हे केवळ एक अक्षर नाही किंवा मंत्रातील एक ध्वनी नाही, तर ते संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीमागील आदिसंकल्पाचे, परमशक्तीच्या प्रथम स्पंदनाचे आणि त्रिपुरसुंदरीच्या सूक्ष्मतम स्वरूपाचे प्रतीक आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून ते साधकाच्या आत्मसाक्षात्कारापर्यंतचा संपूर्ण प्रवासच, या एका बीजामध्ये सामावलेला आहे. म्हणूनच श्रीविद्या परंपरेत ‘ईं’ या कामकला बीजाला सर्व मंत्रांचे हृदय, सर्व शक्तींचे मूळ आणि परमदेवीचे सर्वांत गूढ स्वरूप मानले जाते.
सुजीत भोगले
(क्रमश:)
९३७००४३९०१