महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील ३ दिवसांत प्रगतीची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट...
11-Jun-2026
Total Views |
मुंबई: (Monsoon Update) राज्यातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या वाटचालीला गेल्या दोन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती सध्या मंदावली असून, पुढील तीन ते चार दिवसांत तो राज्यातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Monsoon Update)
सोमवारी ८ जून रोजी मान्सूनने सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांपर्यंत मजल मारत रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरच्या काही भागांपर्यंत प्रगती केली होती. मात्र त्यानंतर त्याच्या वेगाला खीळ बसली आहे. सध्या मान्सूनची सीमा रत्नागिरीतील हर्णे, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नांदयाल, तामिळनाडूतील चेन्नई आणि पश्चिम बंगालमधील सिलिगुडीपर्यंत पोहोचली आहे. (Monsoon Update)
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मान्सूनपूर्व सरी आणि हलका पाऊस सुरू असला तरी राज्यातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या होत असलेला पाऊस हा सर्वत्र आणि सातत्याने पडणारा मान्सूनचा पाऊस नसून, तो पूर्वमोसमी आणि वादळी स्वरूपाचा आहे. (Monsoon Update)
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज विदर्भासह राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उकाडा कायम राहणार आहे. (Monsoon Update)
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनने संपूर्ण ईशान्य भारत आणि सिक्कीम व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागातही मान्सून दाखल झाला आहे. मात्र, अरबी समुद्रातील अनुकूल वातावरणाचा अभाव आणि हवामानातील बदलांमुळे महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती मंदावल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Monsoon Update)
पुढील काही दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, संपूर्ण तामिळनाडू तसेच छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये मान्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. (Monsoon Update)