पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यशस्वीपणे १२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या काळात भारताने केवळ आर्थिक प्रगतीच साधलेली नाही; तर प्रशासन, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण, सामाजिक कल्याण आणि जागतिक नेतृत्व या सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय परिवर्तन अनुभवले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मूलमंत्रावर आधारित शासन व्यवस्थेमुळे विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचा आढावा घेणारा लेख.
२०१४ मध्ये देशासमोर आर्थिक मंदी, भ्रष्टाचार, धोरणात्मक अडथळे आणि विकासाचा असमतोल अशी अनेक आव्हाने होती. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने सुशासन, पारदर्शकता आणि विकासकेंद्रित निर्णयप्रक्रिया यांना प्राधान्य देत, देशाच्या प्रगतीला नवी गती दिली. आज भारत जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला असून, लवकरच तिसर्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीचे निरीक्षण जर केले, तर खर्या अर्थाने ‘अंत्योदया’चा साक्षात्कार कृतीमधून देशाने पाहिला, असे म्हणावे लागेल. गेल्या १२ वर्षांत देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व वेग मिळाला. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ९१ हजार किमीवरून १.४६ लाख किमीहून अधिक झाले. महामार्गबांधणीचा वेग तिपटीने वाढला. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विस्तारल्यामुळे शेतीमालाची वाहतूक, शिक्षण, आरोग्य आणि उद्योगांना मोठी चालना मिळाली.
रेल्वे क्षेत्रातही मोठे बदल घडून आले. ‘ब्रॉडगेज’ रेल्वेमार्गांचे जवळपास संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाले. ‘वंदे भारत’ एसप्रेस, ‘अमृत भारत स्टेशन’ योजना, मालवाहतूक कॉरिडोर आणि आधुनिक रेल्वे स्थानकांमुळे भारतीय रेल्वेची प्रतिमा बदलली. देशभरात १६० पेक्षा अधिक ‘वंदे भारत’ गाड्या धावत असून, प्रवाशांना वेगवान आणि सुरक्षित सेवा मिळत आहे.
डिजिटल क्रांतीचा जागतिक आदर्श
मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्व प्राप्त केले आहे. ‘डिजिटल इंडिया’ अभियान, ‘जनधन’ खाते, आधार आणि मोबाईल (गअच) त्रिसूत्री, यामुळे शासनातील पारदर्शकता वाढली. शासकीय अनुदाने थेट लाभार्थींच्या खात्यात पोहोचल्याने भ्रष्टाचाराला मोठा आळा बसला. ‘यूपीआय’ आधारित डिजिटल व्यवहारांमध्ये भारत आज जगात अव्वल स्थानावर आहे. ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहार सर्वसामान्य झाले आहेत. ‘भारतनेट’ योजनेद्वारे लाखो ग्रामपंचायती ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’शी जोडल्या गेल्या असून, डिजिटल सेवांचा विस्तार वेगाने होत आहे.
शेतकरी केंद्रस्थानी
मोदी सरकारने शेतकर्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’, ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन’ योजना, ‘पीक विमा’ योजना, सूक्ष्म सिंचन आणि कृषी क्षेत्रातील विविध सुधारणांमुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे. देशाचे अन्नधान्य उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. भारत आज जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश असून, दुग्ध उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. ‘प्रत्येक थेंबातून अधिक पीक’ या संकल्पनेमुळे लाखो हेटर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली आहे.
‘आत्मनिर्भर भारता’ची मजबूत पायाभरणी
‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना यांच्या माध्यमातून भारताला उत्पादन क्षेत्रात नवी ओळख मिळाली आहे. मोबाईल उत्पादन, इलेट्रॉनिस, संरक्षण साहित्य आणि सेमीकंडटर उत्पादनात भारत झपाट्याने पुढे जात आहे. २०१४ मध्ये भारत मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन आयात करत होता. आज भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. देशभरात शेकडो उत्पादन युनिट्स उभारले गेले असून, लाखो रोजगार निर्माण झाले आहेत.
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता
संरक्षण क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेला भारत, आता स्वदेशी उत्पादनाकडे वाटचाल करत आहे. संरक्षण औद्योगिक कॉरिडोर, स्वदेशी शस्त्रनिर्मिती आणि वाढती संरक्षण निर्यात, यामुळे भारताची सामरिक क्षमता अधिक बळकट झाली आहे. आज भारतीय संरक्षण साहित्याची निर्यात शेकडो देशांपर्यंत पोहोचत असून, भारत जागतिक संरक्षण बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण करीत आहे.
गरीब कल्याणाला प्राधान्य
गरीब, महिला, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. ‘उज्ज्वला’ योजना, ‘प्रधानमंत्री आवास’ योजना, ‘जल जीवन मिशन’, ‘आयुष्मान भारत’, ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘मोफत धान्य’ योजना यांसारख्या उपक्रमांनी कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला. घर, गॅस, शौचालय, नळाचे पाणी आणि आरोग्य सुरक्षा या मूलभूत सुविधांचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचला.
जागतिक पटलावरील भारताची वाढती प्रतिष्ठा
मोदी सरकारच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी धार मिळाली. जगातील प्रमुख देशांशी संबंध अधिक मजबूत झाले. ‘जी-२०’ अध्यक्षपदाचे यशस्वी नेतृत्व, जागतिक मंचांवरील प्रभावी भूमिका आणि भारताविषयी वाढलेला विश्वास, यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा उंचावली आहे. आज जगातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर भारताचे मत निर्णायक मानले जाते. आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक क्षेत्रात भारत एक प्रभावी शक्ती म्हणून उदयास येत आहे.
विकासासोबत सांस्कृतिक पुनर्जागरण
मोदी सरकारने विकासाबरोबरच भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशालाही प्राधान्य दिले. अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, केदारनाथ धाम पुनर्बांधणी आणि विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ झाला आहे.
निष्कर्ष
मोदी सरकारची १२ वर्षे ही केवळ सत्तेची वर्षे नसून विकास, सुशासन, आत्मनिर्भरता आणि जनविश्वासाची वर्षे म्हणून ओळखली जातील. पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, कृषी, संरक्षण आणि सामाजिक कल्याण या सर्व क्षेत्रांत झालेली प्रगती भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी देश आज नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. गेल्या १२ वर्षांनी भारत बदलू शकतो, प्रगती करू शकतो आणि जगाचे नेतृत्व करू शकतो, हा विश्वास देशवासीयांच्या मनात दृढ केला आहे. हा १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सामर्थ्याचा आणि नव्या भारताच्या उदयाचा प्रवास आहे.
- राम कुलकर्णी