कमळातल्या देवा’ तूच सांग!

    11-Jun-2026   
Total Views |
Maharashtra Politics Farmers Protest
 
२०१७ ते २०१९ सालीही कर्जमाफीपासून जे शेतकरी पात्र असूनही काही कारणांमुळे वगळले गेले, त्यांची कर्जे माफ व्हावीत म्हणून मी रोहित पवार शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी दि. १२ जूनपासून अन्नत्याग आंदोलन करणार होतो. पण, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ आणि २०१९च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या पात्र शेतकर्‍यांना आणि त्यांच्या वारसांना लाभ देण्याचा निर्णय दिला. काय-काय म्हणून दुःख सोसावे मी? मला नेता व्हायचे आहे, थोरल्या आणि मुख्य पवार साहेबांनंतर मीच, हे मला सिद्ध करायचे आहे. पण, देवेंद्र फडणवीस तसे काही होऊच देत नाहीत. सुप्रिया आत्याबाई ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा’ असे ऐतिहासिक वाक्य बोलून गेल्या. पण, आम्हाला भोगावे लागते ना?
 
सत्ताधारी राहणे हा आमचा पारंपरिक हक्कच! सत्तेत राहण्यासाठी पूर्वी लोकांना आम्ही आश्वासने दिली किंवा आपण त्यांच्यासोबत आहोत, हे दाखवण्यासाठी जातिपातीच्या उखाळ्यापाखाळ्या केल्या तरी चालायचे. आमच्या आज्जाने तर फक्त पावसात भिजून सत्ता आणली होती. तेव्हाची लोक त्यांना ‘जाणता राजा’ आणि काय-काय म्हणायची. पण, आता सगळे-सगळे संपले. आश्वासन आणि काम करून घेण्यापुरत्या मारलेल्या बाता आता लोकांना चालतच नाहीत. आम्हाला कुठे ही सवय होती. मोदी आणि फडणवीस यांनी लोकांची पार चव बदलून टाकली. काय गरज होती का, लोकांना जागृत करण्याच्या नावाने त्यांचे हक्क द्यायची. आता लोक शहाणे झाले, तर त्यांना मूर्ख कसे बनवणार? बरे तर बरे, आता गपगुमान लोकांची कामे करायला जावे; तर जे काम हाती घ्यावे म्हणतो, ते काम आधीच या महायुतीच्या सरकारने करून टाकलेले असते. आतापणशेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग करीन म्हणतोय, तर त्याला फडणवीसांनी आधीच खिंडार पाडले. मागे म्हणालो होतो की, पुढच्या सरकारमध्ये मला गृहमंत्री व्हायला आवडेल. पण, आता ती आशा मावळत चालली आहे. त्यामुळे आमचेच काही लोक म्हणतात, दादा, कशाला चिंता करता; सुनेत्राकाकू आपल्याच आहेत आणि सुप्रियाताईंचे व्याहीपण आहेतच की. आता लोक असे म्हणतात, काय करावे? सत्तेत नसणे म्हणजे ‘जल बिना मछली...’ काय करावे? कमळातल्या देवा तूच सांग!
 
...यांची उत्तरे काय?
 
याता वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांच्या किंवा तत्सम कागदांमध्ये विक्रेते विकू शकत नाहीत. तसे केले तर त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई होणार आहे. कारण, वर्तमानपत्रांमध्ये छपाईसाठी जी शाई वापरली जाते, त्यात शिसे असते आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. अत्यंत स्तुत्य उपक्रम. पण, वडापावच्या गाडीबरोबरच सगळीकडेच अनेक अनधिकृत टपर्‍या ‘पैशापासरी’ झाल्या आहेत. नाल्याच्या आणि कचराकुंडीच्या बाजूला अतिशय दुर्गंधी आणि घाणीतही सुरू असलेली खाद्यपदार्थांची दुकाने यांचे काय? शोरमा, बिर्याणी आणि चायनीजच्या नावाने सुरू असलेल्या या टपर्‍यांमध्ये कोणत्या प्रकारची स्वच्छता आणि दर्जेदार आरोग्यपूर्ण अन्ननिर्मिती होत असेल? न्याय सगळ्यांना सारखाच हवा, तसेच कारवाई सगळ्यांना सारखीच हवी.
 
कष्ट करून पोट भरण्याचा हक्क सगळ्यांनाच आहे आणि कुणीही कुणाच्या पोटावर पाय आणूच नये. मात्र, आपण जो व्यवसाय निवडला आहे, तो व्यवसाय थेट ग्राहकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी संबंधित आहे, हे वास्तव खाद्यपदार्थविक्रेत्यांनी आणि संबंधित प्रशासन यंत्रणांनीही लक्षात ठेवायलाच हवे. वडापाव वगैरे विकणारे हातावरचे पोट असलेले लोक. पण, रस्त्याच्या कडेला, नाल्याच्या बाजूला अनधिकृतरीत्या ठाण मांडून बसलेले आणि तिथे शाकाहारी कमीच; पण मांसाहारी सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ विकणारे लोक आहेत. खरेतर ती जागा अडवणारा एकजण असतो आणि तिथे खाद्यपदार्थ विकणारा दुसराच असतो. याठिकाणी काम करणारे लोक मुख्यतः तरुण असतात आणि त्या परिसरातले नसतातच, बाहेरून कुठून तरी आलेले असतात. ते इथेच राहतात, इथेच झोपतात आणि इथेच काम करतात. त्यांच्या कष्ट आणि वंचिततेबद्दल सहानुभूती आहे. मात्र, तरीही त्यांच्याबाबत शंका आहेच.
 
परिसरअंतर्गत सुरक्षिततेसाठी या खाद्यपदार्थविक्रेत्यांकडे अधिकृत परवाना आहे का? त्यांच्याकडे भेसळ न करता खाद्यपदार्थ बनवले जातात का? त्यांच्याकडे काम करणारे ते युवक कोण आहेत? ते कुठून आले, त्यांची नोंद आहे का? या सगळ्यांची उत्तरे काय आहेत?




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.