पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाई आणि वीज दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने निर्घृण हल्ले चढवले. भारताने या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला. त्यामुळे एका बाजूला मोदींनी १२ वर्षांत घडवलेला प्रगत काश्मीर, तर दुसरीकडे नेहरूंनी बिघडवलेला आणि पाकिस्तानने ओरबाडलेला नरकयातना भोगणारा काश्मीर, असा हा विरोधाभास!
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जो भडका उडाला आहे, तो एका दिवसाचा किंवा एका घटनेचा नक्कीच संताप नाही. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानी राजवटीने तिथल्या नागरिकांवर जो अन्याय केला, त्यांचे शोषण केले आणि अनन्वित अत्याचार केले, त्याचा साचलेला ज्वालामुखी आता फुटतो आहे. पिठासारख्या अत्यंत प्राथमिक आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, गगनाला भिडलेली महागाई आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी असह्य अशी वीज दरवाढ, यामुळे तिथल्या सामान्य माणसाचे जगणे अक्षरशः मुश्कील झाले. आपल्या न्याय्य हक्कांसाठी जेव्हा हे गरीब नागरिक रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्या हाती कोणतेही शस्त्र किंवा दगड नव्हते, तर पोटाची खळगी भरण्यासाठीची याचना होती. मात्र, स्वतःला या तथाकथित ‘आझाद काश्मीर’चे तारणहार म्हणवणार्या आणि जगात काश्मीरच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळणार्या पाकिस्तानी सैन्याने या निष्पाप आंदोलकांवर थेट गोळ्या झाडल्या. या अमानुष आणि पाशवी दडपशाहीने पाकिस्तानचा क्रूर, हिंस्त्र आणि दुटप्पी चेहरा पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर उघडा पाडला. ज्या भूभागाला ते स्वतःचा मानतात, तिथल्याच जनतेला ते अत्यंत हीन दर्जाची आणि गुलामासारखी वागणूक देतात, याला इतिहास साक्ष आहेच. या अमानुष अत्याचारांवर भारताने अतिशय कठोर शब्दांत तीव्र निषेध नोंदवला. आज पाकव्याप्त काश्मीरमधील जनता भारताकडे आशेने आणि अपेक्षेने पाहत असून, आम्हाला या पाकिस्तानी नरकातून मुक्ती द्या, अशी आर्त हाक ती देत आहे.
आजच्या या विदारक परिस्थितीचे मूळ शोधायचे असेल, तर आपल्याला इतिहासात डोकावणे अनिवार्य. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अत्यंत भोंगळ, दूरदृष्टीचा अभाव असलेल्या आणि स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्याच्या आत्ममग्न धोरणांमुळेच काश्मीरचा हा अत्यंत जटिल प्रश्न निर्माण झाला. नेहरूंच्या याच एका हिमालयीन चुकीमुळे काश्मीरचा अत्यंत मोठा, साधनसंपत्तीने युक्त आणि मोयाचा भूभाग पाकिस्तानच्या घशात गेला, जो आज ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणून ओळखला जातो. इतकेच नाही, तर ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’सारखी विषारी कलमे संविधानात लादून नेहरूंनी भारतातील काश्मीरलाही उर्वरित देशापासून मानसिक, घटनात्मक आणि भावनिकदृष्ट्या कायमचे तोडून ठेवले होते. या आत्मघातकी धोरणांमुळेच काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवाद फोफावला आणि हजारो निष्पाप भारतीयांना, तसेच शूर जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
नेहरूंनी बिघडवलेला हा काश्मीर अनेक दशके भारताच्या छातीवरील भळभळती जखम बनून राहिला आणि पाकिस्तानला तिथे दहशतवादाचे कारखाने उघडण्याची मोकळीक मिळाली. मात्र, देशपातळीवर मोठे राजकीय स्थित्यंतर झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवत काश्मीरचे हे रक्तरंजित चित्र पूर्णपणे गेल्या १२ वर्षांत बदलून टाकले.
गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने काश्मीरमध्ये जे आमूलाग्र परिवर्तन आणि नवनिर्माण घडवून आणले आहे, ते खर्या अर्थाने ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असेच. दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ कायमचे हद्दपार करून मोदी सरकारने नेहरूंची ती ऐतिहासिक चूक सुधारली आणि काश्मीरला खर्या अर्थाने भारताशी घटनात्मकरीत्या एकरूप केले. आज काश्मीर खोर्यात दर शुक्रवारी होणार्या दगडफेकीच्या घटना, दहशतवाद्यांनी पुकारलेले बंद आणि फुटीरतावाद्यांच्या रक्तपाताच्या धमया पूर्णपणे इतिहासजमा झाल्या आहेत. बंदुकीच्या गोळ्यांच्या आणि बॉम्बस्फोटांच्या आवाजाने धास्तावणारे खोरे आज देश-विदेशातील पर्यटकांच्या वर्दळीने गजबजून गेले आहे. श्रीनगरच्या लाल चौकात ‘तिरंगा’ आता वर्षभर डौलात फडकतो आहे. गेल्या १२ वर्षांच्या कालखंडात काश्मीरने विकासाची नवनवी आणि अभिमानास्पद अशी शिखरे सर केली आहेत. काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या बैठकांनी या बदललेल्या आणि सुरक्षित काश्मीरची साक्ष संपूर्ण जगाला दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत आणि विक्रमी मतदानासह पार पडून तिथे खर्या अर्थाने लोकशाही रुजली आहे.
आज सीमेच्या दोन्ही बाजूंच्या काश्मीरमधील हा विरोधाभास अत्यंत स्पष्ट असाच असून, तो जगाचे डोळे उघडणाराही ठरला आहे. एका बाजूला मोदींच्या प्रबळ नेतृत्वाखालील भारतातील काश्मीर विकासाची, शांततेची आणि समृद्धीची फळे चाखत आहे; तर दुसर्या बाजूला पाकिस्तानने बेकायदेशीर ताब्यात घेतलेल्या काश्मीरमध्ये जनतेला एक वेळच्या जेवणासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी रक्ताचा सडा सांडावा लागत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील त्रस्त जनतेला आता हा विकासाचा आणि स्वातंत्र्याचा फरक स्पष्टपणे समजू लागला आहे. म्हणूनच, त्यांच्या आंदोलनांमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘आम्हाला पुन्हा भारतात विलीन करा,’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. भारताची वेगाने वाढती आर्थिक ताकद, अजेय लष्करी सामर्थ्य आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रस्थापित झालेली शांतता पाहता, तो सुवर्ण दिन आता फार दूर नाही, जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला कायमचे उलथून टाकेल आणि भारताच्या मूळ प्रवाहात सन्मानाने सामील होईल. तेव्हाच खर्या अर्थाने नेहरूंनी केलेली ऐतिहासिक चूक कायमची पुसली जाईल आणि अखंड भारताचा नकाशा पूर्णत्वास जाईल!