गीतसार

    11-Jun-2026
Total Views |

Gita Saar Spiritual Philosophy

ईश्वरांश जीवात्मा, शरीराशिवाय म्हणजेच प्रकृतीशिवाय फार काळ राहू शकत नाही. याचे एक अतींद्रिय उदाहरण पाहा. एक खरा योगी समाधी अवस्थेत जातो, तेव्हा त्याच्या शरीराच्या सर्व क्रिया संपूर्णतः बंद राहतात. जशा श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, हृदय आणि शरीर व्यापारसुद्धा. असे समाधिस्थ शरीर कितीही दिवस व्यवस्थित ठेवले, तरी त्या शरीराच्या चेहर्‍यावरचे केस कधीच वाढणार नाहीत. कारण, त्या योग्याच्या समाधी अवस्थेबरोबर त्याची प्रकृती म्हणजे, शरीरसुद्धा समाधी अवस्थेत जाते. जीवात्म्यासह शरीर किंवा प्रकृतीसुद्धा कार्य थांबविते, कारण त्या शरीराची चालक शक्ती, जीवात्मा सार्‍या विश्वाशी सम होऊन शरीरभावाच्या वर राहतो. अशा प्रकारचे समाधिस्थ शरीर आपल्या नियमित कार्यास म्हणजे श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, केशवृद्धी आदी सर्व शरीर कार्यास तेव्हाच प्रारंभ करेल, जेव्हा त्या शरीराचा स्वामी, जीवात्मा पुन्हा शरीरभावावर येईल. ही अतींद्रिय अवस्था असे सांगते की, पुरुष आणि प्रकृती स्वयंभू अवश्य आहेत; परंतु पुरुषाशिवाय प्रकृती अधिक काळ राहू शकत नाही.
 
जीवात्मारूप इंद्र अशा प्रकारे अनेक जन्म घेऊन आपली उत्क्रांती करून पूर्ण पुरुष होतो. परंतु, त्यासाठी दुर्वासांच्या मंत्राची म्हणजेच कठीण साधनेची आवश्यकता आहे. याच इंद्राचा पुत्र अर्जुन म्हणजे, जीवनाची क्रियाशक्ती क्रिया-उन्मेष आहे. वर उल्लेखलेल्या ऋग्वेदातील ऋचेचा आणखी एक आशय महत्त्वपूर्ण आहे. त्या ऋचेत सांगितले आहे की, "जे अगदी जवळ आहे, ते अति दूर आहे आणि जे अति दूर आहे, ते अगदी जवळ आहे.” या ऋचेमध्ये स्थळ आणि काळ याचा महान सिद्धांत सांगितला आहे. स्थळ आहे, म्हणून काळ आहे, नाही तर ‘काळ’ नावाची अवस्थाच असणार नाही. नागपूर आणि लंडनमध्ये काही किमीचे अंतर आहे, म्हणूनच ते अंतर पार करण्यासाठी विमानाला आपल्या गतीनुसार काही वेळ लागेल. त्याचप्रमाणे वेगवान विमानास, पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासही काही काळ लागेलच. नागपूरहून सरळ पुढे जाऊन, पुन्हा नागपूरला परत येण्यासही काही काळ जरूर लागेल. कारण नागपूरहून निघून परत नागपूरला येईपर्यंत, पृथ्वीची प्रदक्षिणा पुरी होते. म्हणजेच, पृथ्वीच्या परीघाइतके म्हणजे ४० हजार किमी अंतर कापावे लागेल. जर विमानाचा वेग ताशी चार हजार किमी असेल, तर त्या विमानास पृथ्वी प्रदक्षिणेस दहा तासांचा अवधी लागेल. अंतराळास टाळून मागे वळून नागपूरला परत येण्यास काहीच वेळ लागणार नाही; कारण नागपूर हे नागपूर याच ठिकाणी आहे. विख्यात वैज्ञानिकांनीसुद्धा सांगितले आहे की, सार्‍या गती या वर्तुळाकार आहेत, म्हणूनच अति दूर स्थानी जाण्यास मुळीच वेळ लागणार नाही. वैदिक शास्त्रसुद्धा हेच सांगते, "अखंड मंडालाकारं व्योमं येन माम् उपयान्ति ते|”
 
सर्व गती आणि व्योम मंडलाकार आहे, म्हणूनच कोणी कोठे जात नाही व कोणी कोठून येत नाही. देश नाही, म्हणूनच त्याला पार करण्यासाठी काळही नाही. पृथ्वीवर येणार्‍या उडत्या तबकड्या या दूरवरच्या आकाशगंगेपलीकडे असणार्‍या पृथ्वीसदृश ग्रहावरून येत असाव्यात, असे काही लोक मानतात. प्रकाशवेगाने प्रवास केला, तरी त्या तबकड्यांना तेथून पृथ्वीवर येण्यास प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे करोडो वर्षे लागतील. परंतु उपरोक्त ऋचेनुसार ज्यांच्यासाठी अंतराळच नाही, त्यामुळे अशा उडत्या तबकड्यांना पृथ्वीवर येण्यास व पृथ्वीवरून परत आपल्या ग्रहावर जाण्यास काहीच वेळ लागणार नाही. प्रकाशवेगाद्वारे काळ मोजला जातो; परंतु जी अवस्था प्रकाशाच्या कितीतरी पट वेगवान आहे, अशा अति वेगवान अवस्थेद्वारे प्रवास करणार्‍या उडत्या तबकड्या आपल्या ग्रहावरून ज्यावेळी आपला ग्रह सोडतील, त्या वेळाच्या आधीच त्या परत जातील. हा सिद्धांत समजणे अति कठीण आहे. परंतु, उपरोक्त ऋग्वेदाच्या ऋचेमध्ये हाच अर्थ गर्भित आहे. इंद्रपुत्र अर्जुनाचा हाच संदेश आहे, जो भगवान वेदव्यास सार्‍या विश्वास देत आहेत.
 
आता अर्जुन अवस्थेद्वारे सांगितलेला वेदव्यासांचा आणखी एक सिद्धांत पाहा. अर्जुन नेमबाजीत निष्णात दाखविला आहे. तो असा धनुर्धर आहे की, ज्याचा बाण लक्ष्यापासून कधीही दूर नसतो. ज्या स्थळी अर्जुनास शर मारावयाचा असेल, त्याच स्थळी अर्जुनाचा अचूक शर लागत असे. अर्जुनाचे धनुष्य, शर आणि शराच्या लक्ष्याच्या बाबतीत उपनिषदात सांगितले आहे, "प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यम् उच्चते” "आत्मसाधना धनुष्य आहे, आत्मा शर आहे, जो ब्रह्मरूप लक्ष्याचा अचूक वेध घेतो.” अर्जुन आपले शरसंधान नेहमीच याच ब्रह्मरूप लक्ष्यावर करतो. म्हणूनच, त्याचा शर कधीच वाया जात नाही. भगवान रामही असेच धनुर्धारी दाखवले आहेत, ज्यांचा शरसुद्धा कधी चुकत नसे. पंडुची प्रथम पत्नी कुंती हिला, इंद्र देवतेपासून मिळालेला हा तिसरा पुत्र ज्याचे नाव व्यासांनी अर्जुन ठेवले आहे. या वीर अर्जुनाचे गुरू, सखा आणि सर्व काही भगवान गोपाळकृष्ण मानले गेले आहेत. त्या गोपाळकृष्णास सर्व पांडवांमध्ये, अर्जुनच प्रिय दाखविला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतात, ज्या बाबतीत उपनिषदे सांगतात,
 
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु|
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च॥
कठोपनिषद. श्लो. ३
या शरीररूपी रथाचा मालक आत्मा आहे, बुद्धी रथाची सारथी आहे आणि मन त्या रथाला चालविणार्‍या घोड्यांचा लगाम आहे. वैदिक परंपरेत बुद्धीला भगवानांचे स्थान दिले असून, जी परंपरा व्यासांनी भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करायला लावून दाखविली आहे. म्हणूनच, सर्व पांडवांमध्ये अर्जुन प्रमुख आणि उत्तम दाखविला आहे.
 
नकुल, सहदेव
 
पुत्रप्राप्तीसाठी आता माद्रीची वेळ आली. माद्रीचा व्यास आशय असा आहे. ‘मा’ म्हणजे नाही आणि अद्र म्हणजे स्थिर, जो गतिमान आहे, त्याला ‘माद्री’ म्हणतात. भारतात या ‘अद्रि’वरूनच पश्चिम घाटाचे नाव ‘सह्याद्री’ असे ठेवले गेले आहे. याच ‘अद्रि’वरून युरोप व अमेरिकेत ‘अ‍ॅण्ड्रिज’, ‘अ‍ॅण्डिज’ नावाच्या पर्वताचे नामांकन झाले आहे. याच माद्रीच्या मुलाला ‘माद्रज’ म्हटले गेले. याच ‘माद्रज’ शब्दावरून झालेले ‘मद्रास’ शहर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. जे द्रुत गतीने आपली उन्नती करतात, त्यांना द्रुविद (द्रविड) अथवा ‘मद्रज’ (मद्रास) म्हणतात. दक्षिण भारतातील लोकांनी स्वतःला उगाचच ‘अनार्य’ न मानता श्रेष्ठ आर्य, द्रुविद किंवा मद्रज मानावे; कारण दक्षिण भारतीय लोक पुरातन ज्ञानमय वैदिक परंपरा चालविण्यात सार्‍या विश्वात प्रसिद्ध होते व आहेत.
 
-योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७