काँग्रेसचा अंतर्गत कलह थेट रुग्णालयात; अमरावती विधानपरिषदेच्या उमेदवारावर आरोप

    11-Jun-2026   
Total Views |
Congress Candidate Hospital Controversy
 
मुंबई (Congress Candidate Hospital Controversy): विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख निवडणूकीच्या आधी अचानक वैद्यकीय कारणास्तव नागपूर येथील रुग्णालयात दाखल झाल्याने पक्षातील अंतर्गत कलह आता थेट रुग्णालयापर्यंत गेला आहे.
 
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्हाध्यक्षांसह पक्षातील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर अचानक ९ जून रोजी ते नागपूरमधील रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी पुढे आली. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतच हर्षजीत देशमुख थेट रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेसच्या नेत्यांनीच त्यांच्या आजारपणाबद्दल शंका व्यक्त केली.(Congress Candidate Hospital Controversy)
 
त्यानंतर हर्षजीत देशमुख यांनी रुग्णालयातूनच अस्वस्थ वाटत असल्याने ते रुग्णालयात दाखल झाल्याची प्रतिक्रिया दिली. शिवाय त्यांची अँजिओग्राफी झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख यांनी कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, हे आरोप फेटाळून लावत देशमुख यांनी मी निवडणूकीतून माघार घेतली नसल्याचे जाहीर केले.(Congress Candidate Hospital Controversy)
 
काँग्रेस हायकमांडने या प्रकरणाची दखल घेतल्याचेही समजते. विधानपरिषदेसारख्या महत्वाच्या निवडणूकीत अमरावतीतील प्रकरणामुळे काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाल्याचे दिसते.

अमरावतीत तिरंगी लढत
 
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसने अमरावती मतदारसंघातून हर्षजीत देशमुख यांना रिंगणात उतरवले आहे. तर, भाजपतर्फे प्रवीण पोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे नीलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे. मात्र, या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहणार की, नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वीच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया विधानपरिषदेतून काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता हर्षजीत देशमुख यांनीही माघार घेतल्यास महाविकास आघाडीची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.(Congress Candidate Hospital Controversy)
  




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....