चार धाम यात्रा मनःशांतीचा प्रवास!

    11-Jun-2026
Total Views |
Char Dham Yatra India 
 
भारतीय संस्कृतीची ओळख तिच्या परंपरा, उत्सव, तीर्थयात्रा आणि अध्यात्मिक जीवनदृष्टीतून घडते. वर्षभर साजरे होणारे विविध सण, त्यातून निसर्गाशी विणले जाणारे अतूट नाते आणि श्रद्धेने जोपासलेल्या धार्मिक परंपरा हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य. अशाच सनातन परंपरेचा अविभाज्य भाग म्हणजे सध्या सुरु असलेली उत्तराखंडातील चारधाम यात्रा. या लेखामध्ये या यात्रेचे महत्त्व, चार धामांचा इतिहास आणि त्याचे महत्त्व याचा घेतलेला मागोवा..
 
उत्तराखंडमधील हिमालयाच्या उत्तुंग शिखरांच्या कुशीत होणारी ’चार धाम यात्रा’ ही केवळ एक भौगोलिक प्रवास नसून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि श्रद्धेचा सर्वोच्च अविष्कार आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र स्थळांचा समावेश असलेल्या या यात्रेचा इतिहास, अतिशय प्राचीन आणि तितकाच गौरवशालीही आहे. या यात्रेची परंपरा नेमकी कधी सुरू झाली, याबद्दल निश्चित ऐतिहासिक तिथी उपलब्ध नसली, तरी सनातन धर्मातील ग्रंथांनुसार सत्ययुगापासून या स्थळांचे अस्तित्व आहे. ही यात्रा सुरू होण्यामागे मुख्य कारण म्हणजे, हिमालयातील या अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य वातावरणात मानवाला ईश्वरी तत्त्वाची अनुभूती यावी; तसेच तिथल्या खडतर प्रवासातून मानवामध्ये संयम, तितिक्षा आणि भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी!
 
हिंदू धर्मशास्त्रानुसार, या चार धाम यात्रेचे फळ अत्यंत महान सांगितले गेले आहे. असे मानले जाते की, जो व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी खर्‍या श्रद्धेने ही यात्रा पूर्ण करतो, त्याच्या जन्मांतराची सर्व पापे नष्ट होतात. ही यात्रा मानवाला सांसारिक मोहातून मुक्त करून आत्मिक शांती प्रदान करते आणि मृत्यूनंतर जीव पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होऊन मोक्षास पात्र ठरतो. म्हणूनच, प्रत्येक सनातनी हिंदूच्या मनात आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी या देवभूमीची वारी करण्याची तीव्र इच्छा असते.
या पवित्र यात्रेचा मार्ग भौगोलिक आणि धार्मिकदृष्ट्या एका विशिष्ट क्रमाने ठरवलेला आहे, ज्याला शास्त्रात ‘प्रदक्षिणा मार्ग’ असे म्हटले जाते. हिंदू परंपरेनुसार ही यात्रा नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केली जाते. या नियमानुसार यात्रेकरू सर्वप्रथम यमुनोत्री या धामचे दर्शन घेतात, जे यमुनेचे उगमस्थान आहे. त्यानंतर उत्तरकाशी मार्गे गंगोत्री येथे जाऊन, पतितपावनी गंगामातेचे दर्शन घेतले जाते. तिसर्‍या टप्प्यात भाविक बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी, दुर्गम हिमालयाची चढण पार करतात आणि शेवटी भगवानविष्णूंचे निवासस्थान असलेल्या बद्रीनाथ धामामध्ये, यात्रेची सांगता होते. हा क्रम आध्यात्मिक प्रवासाचे टप्पे दर्शवतो, जिथे आधी नदीरूपातील मातृशक्तीचे पूजन, नंतर संहारक व वैराग्याचे प्रतीक असलेल्या शिवशंकराची आराधना आणि शेवटी सृष्टीचे पालनहार विष्णूंच्या चरणी शरणागती पत्करून, मोक्षाची प्राप्ती केली जाते. ऋषिकेश किंवा हरिद्वार हे या यात्रेचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते, येथूनच पर्वतीय प्रवासाला सुरुवात होते.
 
यमुनोत्री हे चार धाम यात्रेचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. गढवाल हिमालयात सुमारे ३ हजार, २९३ मीटर उंचीवर वसलेले हे धाम, यमुना नदीचे उगमस्थान मानले जाते. येथील मुख्य मंदिर देवी यमुनेला समर्पित असून, त्यामध्ये काळ्या रंगाच्या संगमरवरी दगडातील यमुनेची मूर्ती प्रस्थापित आहे. पौराणिक कथेनुसार, यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि यमराजाची बहीण आहे. त्यामुळे यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करणार्‍या व्यक्तीला, यमलोकाची यातना सहन करावी लागत नाही. शिवय, अकाली मृत्यूचीही भीती उरत नाही, अशी दृढ श्रद्धा आहे.
 
यमुनोत्री मंदिराच्या अगदी जवळ ‘सूर्य कुंड’ नावाचा एक नैसर्गिक गरम पाण्याचा झरा आहे, ज्याचे तापमान नेहमी अत्यंत उष्ण असते. या कुंडात भाविक कापडी पोटलीमध्ये भात आणि बटाटे टाकून ते शिजवतात आणि हा शिजलेला भातच, देवीचा मुख्य प्रसाद म्हणून घरी नेला जातो. यमुनोत्रीचा प्रवास हा शारीरिकदृष्ट्या एक परीक्षाच असतो; कारण मुख्य रस्त्यावरील ‘जानकी चट्टी’ या ठिकाणाहून पुढे सुमारे पाच ते सहा किमीची अत्यंत तीव्र आणि खडतर पायी चढण पार करावी लागते. आजूबाजूला असलेल्या बर्फाच्छादित पर्वतांच्या रांगा, कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि यमुनेचा खळाळणारा आवाज यात्रेकरूंचा सगळा थकवा दूर करतो.
 
यमुनोत्रीचे दर्शन घेतल्यानंतर यात्रेचा दुसरा टप्पा म्हणजेच गंगोत्री धाम! उत्तरकाशी जिल्ह्यात भागीरथी नदीच्या काठावर, सुमारे ३ हजार, ४८ मीटर उंचीवर हे भव्य मंदिर वसलेले आहे. पांढर्‍याशुभ्र ग्रॅनाईट दगडांनी बनवलेले हे मंदिर, अमरसिंह थापा या गोरखा कमांडरने १८व्या शतकात बांधले होते. हे धाम भारताची जीवनवाहिनी असलेल्या गंगा नदीचे उगमस्थान मानले जाते. गंगेचे मूळ भौगोलिक उगमस्थान इथून १९ किमी पुढे असलेल्या ‘गोमुख’ हिमनदीमध्ये आहे. पौराणिक परंपरेनुसार, राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली. ज्याच्या फळामुळे गंगामाता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. गंगेचा वेग इतका प्रचंड असल्याने पृथ्वीचा विनाश होऊ नये, म्हणूनच भगवान शिवशंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले आणि तिथूनच एक संथ धारा पृथ्वीवर सोडली, जी ‘भागीरथी’ म्हणून ओळखली जाते. गंगोत्री मंदिराच्या परिसरात ‘भगीरथ शिळा’ आहे, जिथे बसूनच राजाने तप केले होते. येथील विशेष बाब म्हणजे, हे मंदिर रस्त्याने थेट जोडलेले असून, वृद्ध आणि लहान मुलांनाही वाहनाने अगदी मंदिराच्या दारापर्यंत सहज पोहोचता येते. देवदाराच्या घनदाट जंगलांनी वेढलेला हा परिसर मनाला नितांत शांतता देतो. गंगोत्रीच्या पवित्र दर्शनानंतर यात्रेकरू अत्यंत दुर्गम आणि आध्यात्मिकदृष्ट्या सर्वोच्च मानल्या जाणार्‍या केदारनाथ धामाकडे वळतात.
 
समुद्रसपाटीपासून ३ हजार, ५८३ मीटर उंचीवर, मंदाकिनी नदीच्या तीरावर आणि केदार पर्वताच्या पार्श्वभूमीवर वसलेले केदारनाथ, हे भगवान शिवशंकरांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सर्वांत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. हे मंदिर कशामुळे आणि कधी बांधले गेले, याविषयी महाभारतात कथा आढळते; कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर आपल्याच बांधवांच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी, पांडव शिवशंकराचा शोध घेत हिमालयात आले. परंतु, शिव त्यांच्यावर रुष्ट असल्याने त्यांनी बैलाचे रूप घेतले. जेव्हा भीमने त्यांना ओळखले, तेव्हा शिव जमिनीमध्ये अंतर्धान पावले; परंतु त्यांच्या पाठीचा त्रिकोणी उंचवटा केदारनाथमध्येच राहिला. जो आज ज्योतिर्लिंग रूपात पूजला जातो. आजचे मंदिर अत्यंत विशाल आणि राखाडी रंगाच्या अवाढव्य दगडांनी बनवलेले आहे. जे हजारो वर्षे जुने असून, २०१३च्या प्रलयकारी पुरातही जसेच्या तसे सुरक्षित राहिले, हा एक चमत्कार मानला जातो. केदारनाथला जाण्यासाठी ‘गौरीकुंड’ येथून, सुमारे १६ ते १८ किमीचा अत्यंत कठीण, उभा आणि बर्फाळ ट्रेक करावा लागतो. हा ट्रेक चालत, घोड्यावरून, पालखीतून किंवा हेलिकॉप्टरने पूर्ण करता येतो. मंदिरात प्रवेश करताच, मिळणारे शंकराचे दर्शन भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणते.
 
चार धाम यात्रेचा अंतिम आणि सर्वांत भव्य टप्पा म्हणजे बद्रीनाथ धाम! ज्याला ‘विशाल बद्री’ असेही म्हटले जाते. अलकनंदा नदीच्या काठावर, नर आणि नारायण या दोन पर्वतरांगांच्या मध्ये, ३ हजार, १३३ मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर भगवान विष्णूंचे आहे. बद्रीनाथ हे केवळ उत्तराखंडच्या चार धामांचा भागच नाही, तर भारतातील मुख्य मोठ्या चार धामांपैकीसुद्धा एक आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान विष्णू या हिमालयाच्या अत्यंत थंड वातावरणात ध्यान करत बसले होते, तेव्हा त्यांची पत्नी देवी लक्ष्मीने स्वतः ‘बद्री’ (बोराच्या) झाडाचे रूप घेऊन त्यांच्यावर सावली धरली आणि त्यांचे थंडीपासून रक्षण केले. लक्ष्मीच्या या समर्पणामुळे प्रसन्न होऊन विष्णूंनी या स्थानाला ‘बद्रीनाथ’ असे नाव दिले. मंदिराच्या आत भगवान विष्णूंची शाळीग्राम दगडापासून बनलेली चतुर्भुज मूर्ती ध्यानमग्न मुद्रेत आहे, जी आद्य शंकराचार्यांना जवळच असलेल्या अलकनंदा नदीच्या नारद कुंडातून मिळाली होती. मंदिराच्या अगदी खाली ‘तप्त कुंड’ नावाचा गरम पाण्याचा झरा आहे, जिथे बर्फाळ थंडीतही पाण्याचे तापमान जवळपास ४५ अंश असते; मंदिरात जाण्यापूर्वी येथे स्नान करण्याची प्रथा आहे. हे धामही रस्त्याने थेट जोडलेले असून, येथून जवळच भारताचे शेवटचे गाव ‘माणा’ आहे. जिथे व्यास गुफा आणि सरस्वती नदीचे उगमस्थान पाहायला मिळते.
उत्तराखंडची ही चार धाम यात्रा केवळ धार्मिक कर्मकांड किंवा पर्यटन नाही, तर तो मानवी मनाचा ईश्वराकडे जाण्याचा एक खडतर, पण सुखद प्रवास आहे. हिमालयातील निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप पाहात, शारीरिक कष्टांवर मात करत जेव्हा एक भाविक बद्रीनाथमध्ये यात्रेची सांगता करतो, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक सकारात्मक बदल झालेला असतो. ही यात्रा मानवाला निसर्गाशी जोडते, जीवनाची क्षणभंगुरता शिकवते आणि अंतर्मनात भक्तीचा दीपही प्रज्वलित करते. म्हणूनच, अनेक शतकांपासून चालत आलेली ही पवित्र परंपरा आजही कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचे आणि भारताच्या सांस्कृतिक एकतेचे सर्वांत मोठे केंद्र बनून राहिली आहे.
 
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज